बलात्कार, लैंगिक छळवणुकीच्या खटल्यात असांजचे अपील फेटाळले

विकिलिक्सचा संस्थापक ज्युलियन असांज याने बलात्कार व लैंगिक छळाच्या आरोपावरून दाखल असलेल्या खटल्यात केलेले अपील स्वीडनच्या सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले आहे.

विकिलिक्सचा संस्थापक ज्युलियन असांज याने बलात्कार व लैंगिक छळाच्या आरोपावरून दाखल असलेल्या खटल्यात केलेले अपील स्वीडनच्या सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले आहे. स्वीडनने २०१० मध्ये एका स्वीडिश महिलेच्या तक्रारीवरून त्याच्यावर अटक वॉरंट बजावले होते. या महिलेने असांजवर बलात्कार व लैंगिक छळाचा आरोप केला होता.
ऑस्ट्रेलियाचा माजी हॅकर २०१२ पासून इक्वोडोरच्या लंडन येथील दूतावासात आश्रयास असून अटक टाळण्याचेच त्याचे प्रयत्न आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, ज्युलियन असांज याचे लंडन येथून जाबजबाब घेण्याचे प्रयत्न चौकशीकर्त्यांनी केले आहेत व त्याच्यावरील अटक वॉरंट मागे घेण्याची कुठलीही कारणे दिसत नाहीत.
स्वीडिश फिर्यादी पक्षाने लंडन येथे असांज याचे जाबजबाब घेण्याचे ठरवले होते. असांज याने आरोपांना उत्तरे देण्यासाठी स्वीडनमध्ये यावे ही अपेक्षा त्यांनी सोडून दिली आहे. गेली पाच वर्षे याच मुद्दयावर हा खटला अडकून पडला होता. इक्वेडोरच्या दूतावासातून बाहेर पडला तर असांजला अटक होईल. पण त्याने बलात्काराचा आरोप फेटाळला असून संमतीने शरीरसंबंध ठेवल्याचा दावा केला आहे. स्वीडनमध्ये गेल्यास आपल्याला अमेरिकेच्या हवाली केले जाईल अशी भीती त्याला आहे. असांजने २०१० मध्ये अफगाणिस्तान व इराक युद्धाबाबत अमेरिकेची पाच लाख वर्गीकृत कागदपत्रे जाहीर केली होती व राजनैतिक संवादाचे अडीच लाख नमुने जाहीर केले होते, त्यामुळे अमेरिकेची पंचाईत झाली होती. स्वीडिश अधिकाऱ्यांनी लंडनमध्ये येऊन जाबजबाब घेण्यास हरकत नाही, असे असांजने मान्य केले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Swedish supreme court rejects assange appeal in sexual assault case