तामिळनाडूच्या राजकीय पटलावर सध्या दोन नावं बरीच चर्चेत आली आहेत. ती नावं म्हणजे कमल हसन आणि रजनीकांत. अभिनय क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या या दोन दिग्गज अभिनेत्यांनी राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेत त्या दिशेने वाटचालही सुरु केली. रजनीकांत यांनी नव्या वर्षाचे औचित्य साधत नव्या पक्षाची स्थापना केली. त्यांच्या या घोषणेनंतर कमल हसनही भविष्यात त्यांच्यासोबत युती करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं. पण, खुद्द कमल हसन यांनी एक अट ठेवत रजनीकांत यांच्या पक्षासोबत युती न करण्याचा इशाराही दिला आहे.

रजनीकांत यांच्या पक्षावर केशरी रंगाचा म्हणजेच भाजपाचा जास्त प्रभाव दिसून येत असल्याचे सूचक वक्तव्य हसन यांनी केले. ‘रजनीच्या राजकीय कारकिर्दीवर केशरी रंगाचा जास्त प्रभाव दिसून येत असून, ही परिस्थिती अशीच राहिली तर मी त्याच्यासोबत युती करणार नाही’, असे त्यांनी स्पष्ट केले. रजनीकांत आणि आपल्यामध्ये खूप चांगली मैत्री असून, राजकारण आणि मैत्री या दोन्ही गोष्टी पूर्णपणे वेगळ्या असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

आपल्या राजकीय प्रवेशाविषयी कमल हसन यांनी केलेले हे वक्तव्य पाहता रजनीकांत यांच्यासोबत त्यांची युती होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांची निराशा झाली आहे असेच म्हणावे लागेल. काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपण तूर्तास युतीचा निर्णय घेतला नसल्याचेही स्पष्ट केले होते. राजकीय प्रवेशाविषयी बऱ्या गोष्टी गुलदस्त्यात ठेवणारे हसन येत्या काळात रजनीकांत यांच्या विरोधात राजकारणाच्या मैदानात उतरणार का, हाच प्रश्न सर्वसामान्य जनता आणि राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे. या बहुचर्चित प्रश्नाचे उत्तर २१ फेब्रुवारीला मिळण्याची चिन्हं आहेत. कारण, याच दिवशी कमल हसन त्यांच्या निर्णयाविषयी काही महत्त्वाच्या गोष्टींबद्दल घोषणा करतील, असे म्हटले जातेय.

वाचा : हल्लीचे राजकारणी कशातूनही वाद निर्माण करु शकतात- कमल हसन

देशाच्या राजकारणासोबतच सध्या अनेकांचे लक्ष तामिळनाडूकडेही लागून राहिले आहे. जयललिता यांच्या निधनानंतर तेथील राजकारणात निर्माण झालेली पोकळी पाहता आता या दोन्ही दिग्गजांकडून सर्वसामान्यांना बऱ्याच अपेक्षा आहेत. तेव्हा आता युती होणार की मित्रासोबतच सुपरस्टार रजनीकांत यांना राजकीय द्वंद्व खेळावे लागणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.