ई. पलानीस्वामी यांनी गुरूवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर तामिळनाडूच्या राजकारणाने आणखी एक नाट्यमय वळण घेतले आहे. या अनपेक्षित वळणामुळे काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार असणारे ओ. पनीरसेल्वम पूर्णपणे एकटे पडल्याचे चित्र आहे. मोजक्या खासदारांचा पाठिंबा वगळता अण्णाद्रमुकमधील सर्वजण त्यांच्यापासून दुरावले आहेत. काल राजभवनात ई. पलानीस्वामी यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीला सर्व आमदारांनी झाडून लावलेली उपस्थिती याबद्दल बरेच काही सांगून जाणारी होती.

पनीरसेल्वम यांनी व्ही. शशिकला यांच्याविरुद्ध बंड पुकारल्यानंतर अण्णाद्रमुकमधील काही आमदार त्यांच्या गोटात आले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने बेहिशेबी संपत्ती प्रकरणात शशिकला यांना दोषी ठरवल्यानंतर पक्षाची सर्व सूत्रे आपल्या हाती येतील, असा पनीरसेल्वम यांचा होरा होता. मात्र, त्यांचा हा अंदाज पूर्णपणे चुकला. शशिकला तुरूंगात गेल्यानंतरही पक्षातील आमदार त्यांच्या गोटात सामील झाले नाही. त्यामुळे त्यांची संपूर्ण योजनाच फसली आणि सध्या ते एकाकी पडले आहेत. पलाईस्वामी यांच्या शपथविधीनंतर इतर पक्षांमधील हितचिंतकांनीही पनीरसेल्वम यांच्यापासून अंतर राखणेच पसंत केल्याचे दिसते. काल पलाईस्वामी यांच्या शपथविधीनंतर विरोधकांकडून पनीरसेल्वम यांच्या घरावरही हल्ला करण्यात आला होता. दरम्यान, या सगळ्या घडामोडींनंतर पनीरसेल्वम यांनी मात्र संयमी धोरण स्विकारल्याचे दिसते. गेल्या काही दिवसांत पाठिंबा देणाऱ्यांचे आभार मानताना पनीरसेल्वम यांनी अम्मांच्या समर्थकांसह आपण एक दिवस ही लढाई नक्कीच जिंकू, असा विश्वास व्यक्त केला आहे. शशिकला आणि त्यांच्या कुटुंबियांविरुद्धची माझी लढाई यापुढेही सुरू राहील. आपण सगळ्यांनी एकत्र येऊन पक्षाची सूत्रे पुन्हा एका कुटुंबाच्या हातात जाण्यापासून रोखले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी समर्थकांना केले होते.

दरम्यान, एका भाजप नेत्यानेही यासंदर्भात सूचक वक्तव्य केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने शशिकला यांना दोषी ठरवल्यानंतर परिस्थिती बदलेल, असे आम्हाला वाटत होते. अण्णाद्रमुक पक्षात उभी फूट पडेल. किमान ५० टक्के आमदार पनीरसेल्वम यांच्या पाठिशी उभे राहतील, असा आमचा अंदाज होता. मात्र, ही सर्व समीकरणे चुकल्यामुळे पनीरसेल्वम यांचे बंड अपयशी ठरल्याचे या भाजप नेत्याने सांगितले.

राज्यपालांच्या सूचनेनुसार, पलानीस्वामी यांना येत्या १५ दिवसांत बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. पलानीस्वामी हे व्ही. शशिकला यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आहेत. त्यामुळे आगामी काळात अण्णा द्रमुकची सूत्रे ही शशिकला यांच्याच हातात राहणार आहेत, हे स्पष्ट झाले आहे.