एका बारा वर्षीय  मुलाची पोलीस दलात भरती होण्याची इच्छाशक्ती व चिकाटी पाहून, इंदुर येथील पोलीस दलातील स्टेशन हाऊस ऑफिसर या मुलासाठी आता मार्गदर्शक व शिक्षकही बनला आहे. दिवसा आपले पोलिसाचे कर्तव्य बजावून रात्री हा पोलीस अधिकारी या मुलास त्याचे ध्येय गाठता यावे यासाठी शिक्षकाचीही भूमिका निभावत आहे. राज नाव असलेल्या या मुलाला स्टेशन हाऊस ऑफिसर विनोद दिक्षीत यांच्या रुपात एक आदर्श शिक्षक सापडला आहे. जो आपल्या या विद्यार्थ्याची नियमीत शिकवणी घेत आहे.

लॉकडाउन दरम्यान पलासिया येथील स्टेशन हाऊस ऑफिसर (एसएचओ) दिक्षीत हे शेजारील भागात गस्त घालत असताना, राज  त्यांच्याकडे आला व यानंतर जणूकाही त्याचे आयुष्यच बदलून गेले.

”लॉकडाउन दरम्यान मी एका भागात गस्त घाल असताना, त्या भागातील एक मुलगा माझ्याकडे आला व मला पोलीस अधिकारी बनायचे आहे, मला अभ्यास करण्याची इच्छा आहे, परंतु माझ्याकडे शिक्षणासाठी पैसे नसल्याचे त्याने सांगितले.” असे दिक्षीत यांनी इंडयिन एक्स्प्रेसशी बोलताना म्हटले.

आणखी वाचा- दोन वेळच्या जेवणाची भ्रांत, पहाटे चार वाजता उठून धुवायचा गाड्या; बारावीत मिळवले ९१.७ टक्के मार्क

पोलीस दलात जायचं हे एकमेव स्वप्न उराशी बाळगलेल्या राजचे वडील कामगार आहेत, तर आजोबा रस्त्याच्या कडेला बसणारे विक्रेता आहेत. ”लॉकडाउनच्या काळात पोलीस कशाप्रकारे काम करत आहेत, हे मी पाहिलं व मला प्ररेणा मिळाली. यामुळे मी देखील पोलीस दलात भरती होण्याचं ठरवलं व दिक्षीत काकांकडे गेलो. त्यांनी मला शिकवण्याची तयारी दर्शवली.” असं राज म्हणतो.

मात्र पुढील प्रवास सोपा नव्हता, कुठलीही वर्गखोली, खुर्ची, बाकड्याची सोय नसल्याने, दिक्षीत हे वर्ग घेण्यासाठी एखाद्या चांगल्या  ठिकाणाच्या शोधात होते. अखेर, मागील दोन महिन्यांपासून दिक्षीत हे राजला एका एटीएम जवळ तर कधी त्यांच्या जीपच्या बोनेटवर पुस्तकं ठेवून  इंग्रजी व गणित शिकवत आहेत.

आणखी वाचा- १०० रुपयांसाठी पालिका कर्मचाऱ्यांनी हातगाडी पलटी केलेल्या ‘त्या’ मुलाला मदतीचा ओघ; घर आणि शिक्षणाची सुविधा

”जेव्हा केव्हा मी त्यांच्या परिसराजवळ असतो, तो मला शोधतो व जिथे कुठं लाईट असेल तिथं आम्ही बसतो, उभा राहतो व तिथंच अभ्यास सुरू करतो.” असं दिक्षीत सांगतात.

दिक्षीत यांच्याबद्दलची एक विशेष गोष्ट म्हणजे, राज हा काही त्यांचा पहिला विद्यार्थी नाही. माझी धार व रतलाम येथे नियुक्ती असताना मी अनेकांना शिकवले आहे. त्यातील काहीजण पोलीस दलात भरती देखील झाले आहेत. असं दिक्षीत सांगतात. पोलीस दलात भरती होऊ इच्छित असणाऱ्या कोणत्याही मुलास मदत करण्याची त्यांची तयारी आहे. माझ्याकडून शक्य होईल तेवढे प्रशिक्षण मी त्यांना देईल, असंही देखील त्यांना बोलून दाखवलं.