देशात सध्या करोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचं संकट कायम आहे. संसर्गाचा वेग जरी कमी झालेला असला, तरी देखील अद्यापही नवीन करोनाबाधित आढळून येत असून, करोनाबाधितांच्या मृत्यू संख्येतही वाढ सुरूच आहे. दुसरीकडे देशात सुरू असलेल्या लसीकरण मोहीमेस अधिक गती देण्याची गरज आहे. पंतप्रधान मोंदीनी देखील लसीकरण मोहीमेसाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेऊन, लसीकरणास वेग देण्याच्या सूचना केल्या आहेत. दरम्यान, आज नेहमीप्रमाणे पंतप्रधान मोदी त्यांच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

“फक्त प्रत्येक देशवासी पर्यंत लस पोहचवा, मग हवं तर मन की बात पण सांगा!” असं राहुल गांधी यांनी आज ट्विटद्वारे म्हटलं आहे.

COVID19 : देशभरात मागील २४ तासांत ५७ हजार ९४४ रूग्ण करोनामुक्त ; रिकव्हरी रेट ९६.७५ टक्के

पंतप्रधान मोदी आज ११ वाजता मन की बात या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. देशात सध्या करोना पाठोपाठ डेल्टा प्लस या नव्या आजारानेही डोकं वर काढलं आहे. तर, अनेक ठिकाणी अद्यापही पुरेशा प्रमाणात लस पुरवठा होताना दिसत नाही. त्यामुळे आज पंतप्रधान मोदी नेमकं काय बोलाणार? याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

स्वयंसेवी संस्थांच्या सहभागाने लसीकरणाला चालना द्या- मोदी

तसेच, देशात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या लसीकरण मोहीमेचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल आढावा बैठक घेतली होती. या बैठकीला करोना टास्क फोर्सचे अधिकारी व पीएमओ उपस्थित होते. पंतप्रधानांनी आतापर्यंतच्या लसींची उपलब्धता आणि येत्या काही महिन्यांत राज्यांना लसींचा पुरवठा यासह अनेक माहिती घेतली. सरकारी सूत्रांच्या म्हणण्यानुसार लसीची संपूर्ण व्यवस्था हातात घेतल्यानंतर केंद्र सरकारला लसीकरणाचा वेग वाढवायचा आहे. सरकारला यावर्षी डिसेंबरपर्यंत देशातील संपूर्ण लोकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करायचे आहे.