“दिल्लीमध्ये २६ जानेवारी रोजी जे काही घडलं, त्याला आमचा पाठिंबा नाही. जर सरकार संवेदनशील असतं तर असं काही घडलंच नसतं. यामुळे काही लोकं फायदा घेत आहेत.” असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. प्रजासत्ताक दिनी शेतकरी ट्रॅक्टर मोर्चा दरम्यान उफाळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पवार बोलत होते.

या अगोदर दिल्लीतील हिंसाचारावर प्रतिक्रिया देताना, आंदोलनात सहभागी असलेल्या प्रामुख्याने पंजाबींना केंद्र सरकारने बदनाम करु नये, त्यांच्याकडे सामंजस्याने पहावे. पंजाबला पुन्हा अस्थिर करण्याचं पातक मोदी सरकारने करु नये, असं आवाहन शरद पवार यांनी केलं होतं.

पंजाबला पुन्हा अस्थिर करण्याचं पातक मोदी सरकारने करु नये – शरद पवार

“इतके दिवस शांततेत आंदोलन करुनही तोडगा निघत नसल्याने यासंदर्भात मोठं आंदोलन करावं यासाठी त्यांनी ट्रॅक्टर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. शांततेत आंदोलन करणारे हे लोक रस्त्यावर उतरणार होते म्हणून केंद्रानं त्यांच्याकडे समंजसपणानं बघण्याची गरज होती. मात्र, तसं घडलेलं नाही. शेतकऱ्यांच्या या आंदोलनात येणं आणि जाणं याबाबत जाचक अटी लादल्या गेल्या. त्याला प्रतिकार झाला पण तिरीही सरकारनं ६० दिवसांचा त्यांचा समंजसपणा लक्षात घ्यायला हवा होता. हे वातावरण चिघळलं आहे, पण हे का घडलं याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही.” असं पवार म्हणाले होते.

संसदेवरील मोर्चा रद्द

प्रजासत्ताकदिनी ‘ट्रॅक्टर मोर्चा’ला हिंसक वळण लागल्याने शेतकरी आंदोलनाला तडा गेला आहे. दोन शेतकरी संघटनांनी आंदोलनातून माघार घेतली असून, शेतकऱ्यांचा १ फेब्रुवारीचा संसदेवरील नियोजित मोर्चाही रद्द करण्यात आला आहे.