केंद्रीय निमलष्करी दलांचा भाग असलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात (सीआयएसएफ) सर्व महिला भरती मेळावा प्रथमच घेण्यात येणार आहे. यात किमान हजार महिलांना या दलात स्थान मिळणार आहे. केंद्रीय दलांमध्ये औद्योगिक सुरक्षा दलात महिलांची संख्या जास्त आहे. आता तर पुरूषांसाठी असलेल्या जागाही महिलांना दिल्या जाणार आहेत. एकूण एक हजार महिलांना त्यामुळे सीआयएसएफमध्ये स्थान मिळणार आहे.
केंद्रीय निमलष्करी दलात इतक्या मोठय़ा प्रमाणात महिलांची भरती होण्याची ही पहिलीच वेळ आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे संचालक राजीव यांच्या सूचनेनुसार याबाबतचा प्रस्ताव गृहमंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.
आमच्या दलात सध्या महिलांचे प्रमाण ४.३ टक्के आहे व आता हे प्रमाण दहा टक्क्यांपर्यंत नेण्याचा आमचा विचार आहे. सर्व महिला भरती मोहीम आम्ही जनरल डय़ुटीच्या पदांसाठी घेणार आहोत. जून-ऑगस्ट दरम्यान हा मेळावा होईल व त्याची जाहिरातही वृत्तपत्रांतून दिली जाईल. विमानतळे, सार्वजनिक वाहतुकीची दिल्ली मेट्रोसारखी ठिकाणे येथे सीआयएसएफची सुरक्षा सध्या आहे.
गृह खाते व संसदीय खात्याच्या समित्यांनी या दलात जास्तीत जास्त महिलांना भरती करण्याच्या आवश्यकतेवर याअगोदरच भर दिला आहे.
 यात लैंगिक समानता हा एक मुद्दा आहे, शिवाय स्त्रियांविरोधी गुन्ह्य़ांनाही आळा घालता येईल.  केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात १.४७ लाख जवान असून त्यात महिलांचे प्रमाण जास्त आहे. महिलांची झडती महिलाच घेऊ शकतात, त्यामुळेही या दलात महिलांची पुरेशी संख्या ठेवणे गरजेचे आहे.