काँग्रेस शिष्टमंडळ केंद्रीय गृहमंत्र्यांच्या भेटीला

पुडुचेरी येथील एका निवडणूक जाहीर सभेत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना ठार मारण्याची धमकी देणारे पत्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व्ही. नारायणसामी यांना मिळाल्याने खळबळ माजली आहे.

पुडुचेरीतील कराईकल येथे मंगळवारी राहुल गांधी काँग्रेस-द्रमुक आघाडीच्या जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. राहुल गांधी यांना ठार मारण्याची धमकी देणारे पत्र मिळाल्यानंतर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांची दिल्लीत भेट घेतली आणि त्यांना राहुल गांधी यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची विनंती केली.

राहुल गांधी यांना पुरेसे संरक्षण दिले जाईल, असे आश्वासन गृहमंत्री राजनाथसिंह यांनी काँग्रेसच्या शिष्टमंडळाला दिले.

पुडुचेरीतील निावासस्थानी आपल्याला एक निनावी पत्र मिळाले, त्यामध्ये आपल्याला आणि राहुल गांधी यांना धमकी देण्यात आली आहे. तामिळ भाषेत लिहिण्यात आलेल्या या निनावी पत्रात म्हटले आहे की, पुडुचेरीतील उद्योग बंद होण्यास तुमचा पक्ष कारणीभूत आहे. त्यामुळे आम्ही तुमच्यावर आणि राहुल गांधी यांच्यावर हल्ला करून जाहीर सभेतच तुम्हाला उडवून देऊ, असे पत्रात म्हटल्याचे नारायणसामी म्हणाले.

याबाबत आपण पोलिसांकडे तक्रार नोंदविली असून याची पक्षश्रेष्ठींना कल्पना दिली आहे, असे नारायणसामी म्हणाले.