केंद्र सरकारने ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला असून यामध्ये टिकटॉकचाही समावेश आहे. वापरकर्त्यांची माहितीचोरी, तिचा गैरवापर, राष्ट्रीय सुरक्षेला धोका आणि नागरिकांची मागणी यांच्या आधारे बंदी घालण्यात आल्याचे माहिती तंत्रज्ञान खात्याने निवेदनाद्वारे स्पष्ट केलं आहे. बंदीची घोषणा कऱण्यात आल्यानंतर टिकटॉकने निवेदन जारी केलं असून आम्ही चिनी सरकारला भारतीयांची माहिती दिलेली नाही असं म्हटलं आहे.

टिकटॉकने आपली बाजू मांडताना काय म्हटलं आहे ?
“भारत सरकारने एकंदर ५९ अ‍ॅप्स ब्लॉक करण्यासंदर्भात अंतरिम आदेश जारी केला असून यात टिकटॉकचाही समावेश आहे. आम्ही या आदेशाचे पालन करत आहोत. आम्हाला याबाबत सरकारच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी बैठकीचे निमंत्रण आले असून या बैठकीत आम्हाला आमची बाजू मांडण्याची व स्पष्टीकरण देण्याची संधी मिळणार आहे. डेटा प्रायव्हसी व डेटा सिक्युरिटीबाबतच्या सर्व भारतीय अधिनियमांचे टिकटॉक काटेकोरपणे पालन करत असून आमच्या भारतातील वापरकर्त्यांची कोणतीही माहिती आम्ही कोणत्याही परदेशी सरकारला दिलेली नाही, चिनी सरकारलाही नाही. भविष्यात आमच्याकडे अशी मागणी करण्यात आली, तरीही आम्ही अशी माहिती कोणत्याही परिस्थितीत देणार नाही. आमच्या दृष्टीने वापरकर्त्यांची गोपनीयता व अखंडता याला अनन्यसाधारण महत्त्व आहे,” असं टिकटॉक इंडियाचे प्रमुख निखिल गांधी यांनी म्हटलं आहे.

“टिकटॉकने १४ भारतीय भाषांमध्ये सेवा देत इंटरनेटमध्ये लोकशाहीच आणली आहे. यात कोट्यवधी सामान्य वापरकर्ते, कलाकार, गोष्टी सांगणारे, शिक्षणक्षेत्रातील मंडळी, व टिकटॉकच्या माध्यमातून उदरनिर्वाह चालवणाऱ्या असंख्य लोकांचा समावेश आहे. यातले अनेकजण तर पहिल्यांदाच इंटरनेटचा वापर करणारेही आहेत,” असंही त्यांनी सांगितलं आहे.

आणखी वाचा- भारताचा चीनवर डिजिटल स्ट्राइक… TikTok सह ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी

५९ अ‍ॅपवर बंदी
लडाख सीमेवरील धुमश्चक्रीनंतर भारत-चीन यांच्यात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सोमवारी टिकटॉक, शेअरइट, ब्युटी प्लस या लोकप्रिय चिनी अ‍ॅपसह एकूण ५९ अ‍ॅपवर बंदी घातली. वापरकर्त्यांची माहितीचोरी, तिचा गैरवापर, राष्ट्रीय सुरक्षेला धोका आणि नागरिकांची मागणी यांच्या आधारे बंदी घालण्यात आल्याचे माहिती तंत्रज्ञान खात्याने निवेदनाद्वारे स्पष्ट केले.

आणखी वाचा- “देश वाचवल्याबद्दल आभार, टिकटॉक नावाच्या व्हायरसला पुन्हा परवानगी देऊ नका”

देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोकादायक असलेले घटक या माहितीचा गैरवापर करीत असून त्याद्वारे देशाची एकात्मता आणि सार्वभौमत्वाला धक्का पोहोचत आहे. ही अतिशय गंभीर आणि चिंताजनक बाब असून त्यावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे केंद्रीय प्रसारण मंत्रालयाने बंदीचे आदेश जारी करताना म्हटले आहे. हे हानीकारक अ‍ॅप बंद करण्यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयानेही सूचना केली होती. तसेच नागरिकांतूनही या अ‍ॅपबाबत तक्रारी येत होत्या, असेही मंत्रालयाने या आदेशांत म्हटले आहे.

आणखी वाचा- ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी घातल्याने भारतातील हजारो कर्मचारी होणार बेरोजगार, आकडा वाचून धक्का बसेल

भारत आणि चीन सैन्यात गलवान खोऱ्यात संघर्ष होण्याच्या आधीपासून म्हणजे देशात करोनाचा फैलाव वाढू लागल्यापासूनच चिनी वस्तूंप्रमाणे चिनी मोबाइल आणि अ‍ॅपवरही बहिष्कार घालण्यासंदर्भात समाजमाध्यमांवरून मोहीम चालवली जात होती. ही अ‍ॅप वापरकर्त्यांच्या माहितीचा गैरवापर करीत असल्याच्या तक्रारीही सातत्याने येत होत्या. विशेषत: टिकटॉक या लोकप्रिय अ‍ॅपवरून प्रसारीत केल्या जाणाऱ्या चित्रफिती आणि संवाद यांच्याविषयी अनेकदा वादंग निर्माण झाले होते.