काँग्रेसच्या सोशल मीडिया प्रमुख दिव्या स्पंदन-रम्या यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह ट्विट केले आहे. हे ट्विट काही वेळातच व्हायरल झाले. तसेच या ट्विटवर वाचकांच्या एकामागून एक प्रतिक्रीयाही यायला लागल्या आहेत.


रम्या यांच्या ट्विटमध्ये काल झालेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’च्या लोकार्पण कार्यक्रमाचा संदर्भ आहे. त्यांनी या कार्यक्रमातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक फोटो ट्विटमध्ये शेअर केला आहे. यामध्ये मोदी पटेलांच्या पुतळ्याच्या पायाजवळ उभे आहेत. या फोटोखाली रम्या यांनी आक्षेपार्ह कॅप्शन दिले आहे.

‘ही पक्षाची विष्ठा आहे का?’ असे रम्या यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. खरंतर या भव्य पुतळ्याच्या पायाशी उभे असलेले मोदी हे एखाद्या ठिपक्यासारखे दिसत आहेत. यावरच रम्याने टीकात्मक स्वरुपात भाष्य केले आहे. टीका करण्याच्या नादात त्यांनी आक्षेपार्ह विधान केल्याने सोशल मीडियावर त्यांना चांगलेच ट्रोल व्हावे लागले आहे.

स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या (३१ ऑक्टोबर) जन्मदिनी पंतप्रधान मोदींनी जगातील सर्वात उंच (१८२ मीटर) ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ या त्यांच्या भव्य पुतळ्याचे लोकार्पण केले.