आज सकाळच्या सुमारास बसलेल्या तीव्र भूकंपाच्या धक्क्यामुळे संपूर्ण नेपाळ हादरून गेले आहे. या भूकंपात येथील ऐतिहासिक वास्तूही उध्वस्त झाल्या आहेत. नेपाळची राजधानी असलेल्या काठमांडूमध्ये असणारा ‘धरहारा’ हा ऐतिहासिक टॉवर भूंकपाच्या धक्क्याने कोसळला आहे. हा टॉवर बघण्यासाठी पर्यटकांची नेहमीच गर्दी असते.  हा टॉवर ९ मजली असून, १९ व्या शतकात तो बांधण्यात आला होता. नेपाळमधील कुतुबमिनार अशी याची ओळख होती.  धरहरा टॉवर हा वास्तुकलेचा उत्तम नमुना होता, ज्याची नोंद युनेस्कोनंही घेतली होती. तसेच, भूकंपामुळे नेपाळमधील जनकपुरा येथील जानकी मंदिराची प़डझड झाली आहे. अनेक छोटी मोठी मंदिरे भूकंपाच्या तीव्र धक्क्याने जमिनदोस्त झाली आहेत.  धरहारा टॉवरखाली शेकडो लोक अडकले असून त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे.