गॉड पार्टिकल म्हणजे हिग्ज बोसॉनच्या प्रयोगातील वैज्ञानिकांच्या मते सर्नच्या त्या प्रयोगात दोन नवीन कण सापडले आहेत. युरोपियन ऑर्गनायझेशन फॉर न्युक्लीयर रीसर्च म्हणजे सर्नच्या अ‍ॅटलास प्रयोगात जी माहिती मिळाली होती त्याच्या विश्लेषणाअंती दोन प्रकारचे हिग्ज बोसॉन सदृश कण सापडले आहेत. त्या दोघांचेही वस्तुमान वेगळे आहे, असे डेली मेलच्या वृत्तात म्हटले आहे.
हिग्ज बोसॉनसारखे जे दोन कण सापडले आहेत त्यातील एकाचे वस्तुमान १२३.५ गिगॅइलेक्ट्रॉन व्होल्ट आहे. दुसरा हिग्जबोसॉन सदृश कण हा १२६.६ गिगॅइलेक्ट्रॉन व्होल्ट इतक्या वस्तुमानाचा आहे.
प्रमाणात प्रारूपातील हरवलेला तुकडा म्हणजे हिग्ज बोसॉन असून त्याची संकल्पना १९६४ मध्ये मांडण्यात आली. प्रमाणित प्रारूप म्हणजे स्टँडर्ड मॉडेल हा विश्वाच्या मूलभूत निर्मिती घटकांचे वर्णन करणारा सर्वमान्य सिद्धांत आहे.
या प्रारूपानुसार हिग्ज बोसॉनमुळे इतर मूलभूत कणांना वस्तुमान प्राप्त होते. तथापि त्याचा शोध लावणे लार्ज हैड्रॉन कोलायडरच्या मदतीशिवाय लावणे शक्य नव्हते. सर्न येथील प्रयोगात काम करणाऱ्या वैज्ञानिकांनी हिग्ज बोसॉनचा शोध लावल्याचे सांगितले होते; पण तो हिग्ज बोसॉनसदृश कण होता. ‘सायंटिफिक अमेरिकन’ या नियतकालिकात याबाबत प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार हिग्ज बोसॉनसदृश अशा दोन कणांचे अस्तित्व दिसून आले आहे. अ‍ॅटलास प्रयोगातील वैज्ञानिकांना सुरूवातीला असे वाटत होते की, माहितीच्या विश्लेषणात काही चूक झाली असावी. पण दोन महिन्यांच्या अभ्यासाअंती त्यात काही चूक नसल्याचे दिसून आले आहे.