स्मार्ट सिटी बनवण्यापेक्षा लोकांचे पाण्याचे प्रश्न सोडवा असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जळगावमध्ये झालेल्या सभेत भाजपला लगावला.
उद्योगपतींच कर्ज माफ होतं मग, शेतक-याचं कर्ज का माफ होत नाही ? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी जळगावमध्ये झालेल्या सभेत विचारला. महात्मा फुलेंच्या महाराष्ट्रात मुलींना शिक्षणासाठी पैसे नाहीत, ही शरमेची बाब आहे, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली. प्रवासासाठी पैसे नाहीत म्हणून विद्यार्थीनीने आत्महत्या करणे हे दुर्देवी बाब आहे. स्वाती पिटलेच्या आत्महत्येनंतर तातडीने परिवहन मंत्री दिवाकर रावतेंना फोन करुन यावर उपाययोजना करण्याचे आदेश दिले आणि चार लाख ६० हजार विद्यार्थ्यांचा प्रवास शुल्क शिवसेनेच्या पुढाकाराने माफ करण्यात आल्याचे सांगत उद्धव ठाकरेंनी दिवाकर रावतेंच्या निर्णयाचं कौतुक केलं. तसेच, शेतक-यांच्या प्रश्नावर शिवसेना गुलाबराव पाटलांच्या पाठिशी असल्याचेही त्यांनी मह्टले. कितीही याचिका झाल्या तरी घाबरु नका, असं सांगत उद्धव यांनी एकनाथ खडसेंवर हल्ला चढवला.
शेतकऱ्यांचे जीवन सुसह्य करणं, हे शिवसेनेचे ध्येय आहे. राज्यातील जनतेने आमच्यावर दाखवलेला विश्वास आम्ही सार्थ करुन दाखवू, असे उद्धव ठाकरे म्हणाले. सरकार अस्थिर होऊ नये म्हणून स्वाभिमान बाजू ठेऊन सत्तेत सामील झालो असल्याचं उध्दव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.