नवी दिल्ली : करोना प्रतिबंधक लशींची वर्धक मात्रा देण्याची मागणी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून तसेच, महाराष्ट्रसारख्या राज्यांकडून होत असली तरी हा निर्णय शास्त्रीय सल्लय़ानंतर घेण्यात येईल, असे स्पष्ट करत केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी शुक्रवारी लोकसभेतील बहुतांश सदस्यांच्या प्रश्नाला बगल दिली.

करोनाच्या विविध मुद्दय़ांवर लोकसभेत गुरुवारी सलग १२ तास झालेल्या चर्चेत ७५ सदस्य सहभागी झाले होते. दुपारी १२ वाजता सुरू झालेली चर्चा मध्यरात्री साडेबारा वाजता संपली. त्यामुळे या चर्चेवर केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी शुक्रवारी उत्तर दिले. या चर्चेमध्ये बहुतांश सदस्यांनी वर्धक मात्रा कधी दिली जाईल, हा प्रश्न प्रामुख्याने विचारला होता. चर्चेची सुरुवात करताना शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनीही राज्य सरकारने वर्धक मात्रा देण्याची मागणी केल्याचा मुद्दा मांडला होता. मात्र ‘लहान मुलांचे लसीकरण आणि वर्धक मात्रा देण्याचा निर्णय शास्त्रीय सल्ल्यानुसार घेण्यात येईल. देशातील शास्त्रज्ञांवर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी विश्वास ठेवावा’, असे मंडाविया म्हणाले.

जगभरातील अन्य देशांच्या तुलनेत भारतात करोनामुळे झालेले मृत्यू सर्वात कमी असल्याचे मंडाविया म्हणाले. करोनापूर्व काळात देशातील आरोग्य क्षेत्रातील पायाभूत विकासाची हेळसांड झाली होती, तत्कालीन केंद्र सरकारांनी आरोग्य क्षेत्राकडे पुरेसे लक्ष दिले नाही, त्याचे परिणाम करोना काळात देशाला भोगावे लागले. मात्र, गेल्या दोन वर्षांत पंतप्रधान मोदी यांनी आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा विकास करण्याचा निर्णय घेतला असून त्यामध्ये गुंतवणूकही केल्याचे आरोग्यमंत्री म्हणाले.

प्राणवायूअभावी चार संशयित मृत्यू

प्राणवायूच्या तुटवडय़ामुळे किती करोना रुग्णांचा मृत्यू झाला, याची माहिती पाठवण्याची विनंती सर्व राज्यांना पत्राद्वारे केली होती. मात्र १९ राज्य सरकारांपैकी फक्त पंजाब सरकारने प्रतिसाद दिला असून ४ रुग्णांचा प्राणवायूअभावी मृत्यू झाला, अशी माहिती मंडाविया यांनी दिली. काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता. करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये प्राणवायूच्या पुरवठय़ावरून राजकारण केले गेले.मात्र प्राणवायूची मागणी वाढत गेली तशी निर्मितीक्षमताही वाढवली गेली. आता प्रतिदिन ४५०० मेट्रिक टन प्राणवायू निर्मितीची क्षमता असल्याची माहिती मंडाविया यांनी दिली.