उत्तराखंड येथील जलप्रलयानंतर सुरू असलेल्या बचावकार्यात सहभागी असलेले भारतीय हवाई दलाचे एमआय-१७ हे हेलिकॉप्टर मंगळवारी कोसळले. या अपघातात हवाई दल कर्मचारी, निमलष्करी दलाचे जवान आणि भाविक यांच्यासह १९ जम दगावल्याची भीती व्यक्त केली जात असून आठ जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. प्रथम दर्शनी तरी पाऊस आणि धुके यामुळे झालेल्या खराब हवामानामुळे सदर अपघात घडला असावा, अशी शक्यता हवाई दलातर्फे वर्तविण्यात आली आहे.
एमआय-१७ हे हवाई दलाचे हेलिकॉप्टर बचावकार्य करीत होते. अडकलेल्या लोकांना गौचर येथून गुप्तकाशी आणि केदारनाथ येथे नेण्याचे काम हे हेलिकॉप्टर करीत होते. केदारनाथ येथून परतत असताना गौरीकुंडच्या उत्तर भागात सदर हेलिकॉप्टर दुपारी पाऊणच्या सुमारास कोसळले, अशी माहिती भारतीय हवाई दलाच्या प्रवक्त्याने दिली. यावेळी हेलिकॉप्टरमध्ये भारतीय हवाई दलाचे अधिकारी- कर्मचारी, राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरण आणि इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस अशा निमलष्करी दलांच्या जवानांसह १९ जण बसले होते. हे सर्वजण ठार झाल्याची भीती व्यक्त केली जात असून, आठ जणांचे मृतदेह हाती लागले आहेत.