उत्तराखंडला गेल्या आठ दिवसांपासून बसलेल्या महाप्रलयाच्या तडाख्यात अद्यापही जवळपास नऊ हजार यात्रेकरू अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली असून मंगळवारी सकाळी मुसळधार पाऊस आणि दाट धुक्यामुळे अडकून पडलेल्या यात्रेकरूंना सुरक्षित स्थळी हलविण्याच्या मोहिमेला विलंब लागला. मात्र हेलिकॉप्टरच्या सहाय्याने यात्रेकरूंना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे काम वेगाने सुरू झाले आहे. केदारनाथ येथून आणखी १२७ मृतदेह मिळाल्याने या महापुरातील बळींची संख्या आता ८२२ वर पोहोचली आहे. तेहरी जिल्ह्य़ात दरडी कोसळल्याने एक महिला आणि एक लहानगा ठार झाल्याचे वृत्त आहे.
डेहराडूनमध्ये दाट धुक्याचे साम्राज्य पसरले असल्याने महापुरात अडकलेल्या यात्रेकरूंना हेलिकॉप्टरच्या सहाय्याने बाहेर काढण्याच्या मोहिमेला मंगळवारी विलंब झाला. मात्र हवामानात लक्षणीय सुधारणा होताच सहस्रधारा हेलिपॅड आणि जॉली ग्रॅण्ट विमानतळ येथून मदतकार्याने वेग घेतला. चार हेलिकॉप्टरच्या सहाय्याने बद्रीनाथ येथून ६० यात्रेकरूंना बाहेर काढण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
केदारनाथ परिसरातून सोमवारपासून १२७ मृतदेह मिळाले आहेत. मुझफ्फरनगर, बुलंद शहर आणि बिजनोर येथे गंगा नदीत किमान १५ यात्रेकरूंचे मृतदेह तरंगताना आढळल्याचे हृदयद्रावक दृश्य पाहावयास मिळाल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. त्यामुळे महाप्रलयातील बळींची संख्या आता ८२२ वर पोहोचली आहे. वेगाने सुरू करण्यात आलेल्या मदतकार्यात कोणतेही अडथळे निर्माण होऊ नयेत यासाठी पूरग्रस्त परिसरात कोणत्याही अतिमहत्त्वाच्या व्यक्तीला जाण्याची परवानगी न देण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सकाळी पाटणा येथे सांगितले. उत्तराखंडमधील पूरस्थिती हळूहळू सुधारत असून मदतकार्य वेगाने सुरू झाले आहे. केदारनाथ आणि बद्रीनाथ येथून अनेक भाविकांना बाहेर काढण्यात आले असून अद्याप अडकून पडलेल्या भाविकांच्या सुटकेसाठी हेलिकॉप्टरची मदत घेण्यात येत आहे.