हेलिकॉप्टर खरेदी करार

अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी हेलिकॉप्टर खरेदी करार प्रकरणातील आरोपी असलेला ब्रिटनचा नागरिक ख्रिस्तियन मायकेल जेम्स याच्यावर दिल्ली न्यायालयाने गुरुवारी अजामीनपात्र वॉरण्ट बजावले. या करारातील महत्त्वाच्या बाबींची पडताळणी करण्यासाठी जेम्स यांची चौकशी करण्याची गरज आहे, असे सीबीआयने सांगितल्यानंतर हे वॉरण्ट बजावण्यात आले आहे.
या संपूर्ण प्रकरणात जेम्स याला किती दलाली मिळाली याची माहिती जाणून घेण्यासाठी त्याची चौकशी करणे गरजेचे आहे, हे सीबीआयचे म्हणणे विशेष सीबीआय न्यायमूर्ती अजयकुमार जैन यांनी मान्य केले. जेम्स सध्या दुबईत वास्तव्याला असल्याची माहिती ब्रिटनच्या अधिकाऱ्यांनी दिली.
या पाश्र्वभूमीवर जेम्स याच्याविरुद्ध तारीख नसलेले अजामीनपात्र वॉरण्ट बजावण्याचे आदेश न्यायमूर्तीनी दिले. चौकशीत सहकार्य करण्यासाठी आणि खटल्याशी संबंधित दस्तऐवज गोळा करण्यासाठी मॉरिशसमधील सक्षम अधिकाऱ्यांना विनंतीपत्र पाठवावे यासाठी सीबीआयने केलेल्या अर्जावर १ ऑक्टोबर रोजी विचार करण्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
मे. ऑगस्टा वेस्टलॅण्ड इंटरनॅशनल लि. आणि मे. फिनमेक्कानिका या कंपन्यांनी सदर कंत्राट ऑगस्टा वेस्टलॅण्ड कंपनीला मिळावे यासाठी जेम्स आणि अन्य काही जणांना दलाल म्हणून नियुक्त केले होते. जेम्स याने तयार केलेला काही दस्तऐवज स्विस अधिकाऱ्यांनी जप्त केला असून त्यामध्ये हाताने लिहिलेल्या ताळेबंदाचा समावेश आहे, असा दावाही सीबीआयने केला आहे.