अमित शहा यांचे वक्तव्य; सुधारित नागरिकत्व कायद्यावर ठाम

‘‘जवाहरलाल नेहरू विद्यापीठात देशविरोधी घोषणा देण्यात आल्या. अशा घोषणा देणाऱ्यांना तुरुंगात पाठवू’’, असे वक्तव्य गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी केले.

सुधारित नागरिकत्व कायदा आणि ‘जेएनयू’मधील हल्ल्याच्या मुद्दय़ावरून विरोधकांकडून टीकेचे लक्ष्य ठरलेल्या अमित शहा यांनी आक्रमक पवित्रा घेतला. देशातील कोणत्याही नागरिकाचे नागरिकत्व हिरावून घेण्याबाबतची एक तरी तरतूद सुधारित नागरिकत्व कायद्यात दाखवा, असे आव्हान काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना देत शहा यांनी या कायद्याचे जोरदार समर्थन केले. काँग्रेससह विरोधकांनी या कायद्याला कितीही विरोध केला तरी पाकिस्तानातून भारतात आलेल्या पीडित निर्वासितांना भारतीय नागरिकत्व देणारच, असे शहा म्हणाले. पाकिस्तानातून आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, ख्रिश्चनांचा भारतावर आपल्याप्रमाणेच हक्क आहे. भारत या निर्वासितांना आपलेसे करणार आहे. तसे करण्यास आम्हाला कोणी रोखू शकत नाही, असे शहा यांनी सांगितले.

राहुल गांधी, ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल हे सुधारित नागरिकत्व कायद्यावरून जनतेची दिशाभूल करत आहेत. या कायद्याद्वारे कोणाचेही नागरिकत्व हिरावून घेणार नसून, उलट नागरिकत्व देण्यात येणार आहे, असा पुनरुच्चार शहा यांनी केला.सुधारित नागरिकत्व कायदा मागे घ्यावा आणि एनपीआर प्रक्रिया स्थगित करावी, अशी मागणी काँग्रेसने केली होती