पश्चिम बंगालमधील नॉर्थ २४ परगना जिल्ह्यात मंगळवारी आक्षेपार्ह फेसबुक पोस्टमुळे तणाव निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने निमलष्करी जवानांची तुकडी पश्चिम बंगालमध्ये पाठवली आहे.

एका धार्मिक स्थळाबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आली होती. या पोस्टमुळे अवघ्या काही तासांमध्ये नॉर्थ २४ परगना जिल्ह्यातील बदुरिया तणाव निर्माण झाला. दोन गटांमध्ये हाणामारी झाल्याने परिस्थिती आणखी तणावपूर्ण झाली. शेवटी निमलष्करी दलाच्या तीन तुकड्या पश्चिम बंगालमध्ये रवाना करण्यात आल्या. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हिंसाचारावरुन दोन्ही समाजाच्या स्थानिक नेत्यांना जबाबदार ठरवले आहे. संबंधीतांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

दरम्यान, हा हिंसाचार सुरु असताना ममता बॅनर्जी आणि राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. ‘केशरीनाथ त्रिपाठी यांनी हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर माझ्याशी दुरध्वनीवरुन चर्चा केली. पण यादरम्यान ते भाजपच्या बाजूने बोलत असल्याचे जाणवले. ते मुख्यमंत्र्यांशी अशा पद्धतीने बोलू शकत नाही’ असे ममता बॅनर्जींनी सांगितले. त्यांचे म्हणणे ऐकून मला राजीनामा द्यावासा वाटत होता असेही त्यांनी नमूद केले. तर त्रिपाठी यांनी हे आरोप फेटाळून लावले आहे. भाजपनेही या हिंसाचारावर प्रतिक्रिया दिली आहे. सुमारे दोन हजार जणांनी हिंदूबहुल वस्तीवर हल्ला केल्याचा आरोप भाजपने केला आहे. राज्यातील पोलीस परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरले असून केंद्र सरकारनेच आता हस्तक्षेप करावा अशी मागणी त्यांनी केली. बहुरिया, गोलाबारी आणि अन्य भागांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती आहे. शेकडो घर आणि दुकानांचे या हिंसाचारात नुकसान झाले आहे.