जगभरात करोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. करोना व्हायरसचे पुढचे केंद्र अमेरिका असू शकते, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. भारतात लॉकडाउन झाल्यानंतर WHO कडून हा सूचक इशारा देण्यात आला आहे. रॉयटर्सने हे वृत्त दिले आहे.

अमेरिकेत करोनाची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. पुढच्या काही दिवसात युरोपपेक्षा अमेरिकेत जास्त रुग्ण आढळून येतील असा जागतिक आरोग्य संघटनेचा अंदाज आहे. करोना व्हायरस पॉझिटिव्ह रुग्णांची जी नवीन आकडेवारी समोर आली आहे, त्यात ८५ टक्के प्रकरणे युरोप आणि अमेरिकेतील आहेत असे डब्लूएचओच्या प्रवक्त्या मारग्रेट हॅरिस यांनी पत्रकारांना सांगितल्याचे एएफपीने आपल्या वृत्तात म्हटले आहे.

सोमवारी रात्री प्रसिद्ध झालेल्या डब्लूएचओच्या ताज्या आकडेवारीनुसार मागच्या २४ तासात युरोपमध्ये २०,१३१ करोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. अमेरिकेत हीच संख्या १६,३५४ आहे. युरोपच्या तुलनेत अमेरिकेत करोना वैगाने फैलावत असल्याबद्दल हॅरीस यांना पत्रकारांनी विचारले, त्यावेळी त्या म्हणाल्या की, अमेरिकेत वेगाने करोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. अमेरिकेत एकाच दिवसात १० हजार करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत १५० अमेरिकन नागरीकांचा मृत्यू झाला आहे.