पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांवर काँग्रेसने जोरदार टीका केली. केंद्रीय मंत्रिमंडळात मनुष्यबळ विकास राज्यमंत्री म्हणून नुकतेच नियुक्त झालेले रामशंकर कथेरिया यांचे गुणपत्रक बनावट असल्याच्या मुद्दय़ावरून काँग्रेस सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी टीकेची झोड उठवली. न केलेल्या कामाचे श्रेय घेणारे पंतप्रधान मोदी हे आपल्या कार्याचे ‘तुणतुणे’ वाजवत असल्याचा आरोप त्यांनी या वेळी केला. त्यांनी ट्विट केले आहे, ‘की प्रथम मनुष्यबळ विकासमंत्री म्हणून इराणी आणि आता राज्यमंत्री म्हणून नियुक्त केलेले कथेरिया हे दोन्हीही पदवीधर नाहीत, हे सिद्ध झाले आहे. यावर कळस म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शालेय पुस्तके आणि देशाचा इतिहास बदलायचा आहे’.
काँग्रेस महासमितीच्या प्रसिद्धी विभागाचे अध्यक्ष अजय माकेन यांनीही ‘ट्विट’ केले आहे. ते लिहितात, की राज्यमंत्र्याचे खोटे प्रतिज्ञापत्र ही शिक्षण मंत्रालयाला भाजपने दिलेली भेट आहे. हेच का मोदींचे स्वच्छ राजकारण?
काँग्रेसच्या दोन्ही नेत्यांनी भाजपवर शरसंधान साधताना स्मृती इराणी यांनी आपल्या शिक्षणाविषयी निवडणूक आयोगाला परस्परविरोधी प्रतिज्ञापत्रे सादर केल्याकडेही लक्ष वेधले आहे.