देशात करोना रुग्णसंख्येच्या वाढत्या आकड्यांनी चिंतेचे ढग होत असल्याचं दिसत असून, त्यातच काही माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनाही घडत आहे. करोना केंद्रामध्ये अत्याचार झाल्याच्या घटना दिल्ली, मुंबईत घडल्याचं समोर आलं होतं. केरळमध्येही अशीच घटना घडली असून, करोना बाधित महिलेला रुग्णालयात घेऊन जाताना चालकानं रुग्णवाहिकेतच बलात्कार केला.

केरळमधील पथाणमथिट्टा जिल्ह्यात ही घटना घडली आहे. एका महिलेला करोनाचा संसर्ग झाला होता. या महिलेला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी शनिवारी रात्री रुग्णवाहिका आली होती. यावेळी रुग्णवाहिकेत महिलेसोबत आणखी एक करोना संक्रमित रुग्ण होता. रुग्णवाहिकेचा चालक नोफाल याने आधी दुसऱ्या रुग्णाला कोविड सेंटरमध्ये सोडलं. त्यानंतर महिलेला दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जात असताना, चालकानं रुग्णवाहिका एका निर्जनस्थळी नेली.

तिथे रुग्णवाहिका चालकानं महिलेवर बलात्कार केला. अत्याचार केल्यानंतर त्याने पीडित महिलेला कोविड केअर सेंटरमध्ये सोडलं. तिथे गेल्यानंतर महिलेनं घटनेची माहिती तिथल्या कर्मचाऱ्यांना दिली. त्या कर्मचाऱ्यांनी घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून रुग्णवाहिकेच्या चालकाला अटक केली, अशी माहिती पथाणमथिट्टाचे पोलीस अधीक्षक के. जी. सिमोन यांनी दिली.

रुग्णवाहिकेचा चालक नोफाल याला पोलिसांनी आलापूझा जिल्ह्यातून अटक केली. नोफाल आरोग्य विभागात कार्यरत असून, १०८ रुग्णवाहिकेवर काम करतो. नोफाल याच्यावरही यापूर्वी एक गुन्हा दाखल असल्याचं पोलिसांनी सांगितलं. नोफालवर २०१९ मध्ये हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे. दरम्यान, करोनाकाळात महिलांवरील कौटुंबिक अत्याचार वाढल्याची आकडेवारी समोर येत असतानाच कोविड केंद्रातही अत्याचाऱ्याच्या घटना घडत आहे. दिल्ली मुंबईत अशा प्रकारच्या घटना मागील काही दिवसापूर्वी घडल्या होत्या.