आजारी येस बँकेला मदत करण्याच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या निर्णयावर वरिष्ठ काँग्रेस नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी शंका उपस्थित केली आहे. येस बँकेची या संकटातून सुटका करण्यासाठी एसबीआयला हुकूम देण्यात आल्याचे माझे मत आहे असे चिदंबरम पत्रकार परिषदेत म्हणाले.

“ज्याप्रमाणे एलआयसी स्वेच्छेने आयडीबीआय बँकेची सुटका करण्यासाठी तयार नव्हती, तसेच एसबीआय सुद्धा येस बँकेच्या सुटकेसाठी स्वेच्छेने तयार आहे असे मला वाटत नाही. एसबीआयला तसे निर्देश देण्यात आले आहेत” असे चिदंबरम म्हणाले. आर्थिक संस्थांमध्ये भाजपा सरकारच्या गैरव्यवस्थापनामुळे ही परिस्थिती ओढवल्याचा आरोप चिदंबरम यांनी केला.

“कुठल्याही आर्थिक संकटाच्याकाळात बाजारच सर्व काही सांगून जातो. काल सेन्सेक्स ८८४ अंकांनी कोसळला. एसबीआयच्या शेअरचा भाव १८ रुपयांनी तर, येस बँकेच्या शेअरचा भाव ३६.८ रुपयांवरुन १६ रुपये झाला” असे चिदंबरम म्हणाले.

ढासळत्या आर्थिक स्थितीमुळे आरबीआयने येस बँकेवर निर्बंध लादले आहेत. ग्राहकांना महिन्याभरासाठी बँकेतून फक्त ५० हजार रुपये काढता येणार आहेत.

एकही पैसा बुडणार नाही – अर्थमंत्री सीतारामन
नव्या पिढीची खासगी बँक असलेल्या येस बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून, तिच्या आर्थिक व्यवहारांवर रिझव्‍‌र्ह बँकेने निर्बंध आणल्यानंतर, शुक्रवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ठेवीदारांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला. येस बँकेतील ठेवीदारांचा एकही पैसा बुडणार नाही, पै न् पै परत दिली जाईल, अशी ग्वाही सीतारामन यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.

येस बँकेवर ३० दिवसांसाठी म्हणजे ३ एप्रिलपर्यंत निर्बंध आले असून खातेदारांना जास्तीत जास्त ५० हजार रुपयेच बँकेतून काढता येतील. त्या परिणामी देशभरात सर्वत्र पैसे काढण्यासाठी ‘एटीएम’समोर खातेदारांच्या रांगा लागल्या होत्या. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या येस बँकेच्या ठेवीदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने येस बँकेला कोणत्याही नव्या कर्जवाटपास तसेच, कर्जाच्या फेररचनेस मनाई केली आहे. मात्र, बँकेच्या २० हजार कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन देण्याची मुभा दिली आहे.