भारत आणि पाकिस्तान या दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये होणारा क्रिकेटचा सामना नेहमीच चर्चेचा विषय असतो. मात्र, यंदाच्या वर्ल्डकपमध्ये झालेल्या सामन्यामध्ये पाकिस्ताननं भारताचा पराभव केल्यामुळे या चर्चेला वेगळं वळण मिळालं आहे. उत्तर प्रदेशमध्ये काही लोकांनी पाकिस्तानचा विजय साजरा केल्यामुळे त्यावरून वातावरण चांगलंच पेटलं असून आता त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालणार असल्याचं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून मोठी चर्चा सुरू झाली आहे.

योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून यासंदर्भातली माहिती दिली आहे. “पाकिस्तानचा विजय साजरा करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होईल”, असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. पाकिस्ताननं भारताचा दुबईमध्ये सुरू असलेल्या टी-२० वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात पराभव केला. वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदाच पाकिस्ताननं भारताला पराभूत केल्यामुळे पाकिस्तानसाठी हा ऐतिहासिक विजय मानला जात आहे.

दरम्यान, पाकिस्तानचा विजय साजरा करणाऱ्या एकूण ७ जणांना उत्तर प्रदेश पोलिसांनी वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या तरुणांमध्ये तीन जण जम्मू-काश्मीरचे आहेत. आग्रामधून त्यांना अटक करण्यात आली आहे. या तिघांना महाविद्यालयातून काढून टाकण्यात आलं असल्याची माहिती देखील समोर आली आहे. याशिवाय, तीन जणांना बरेलीतून तर एका व्यक्तीला लखनौमधून अटक करण्यात आली आहे. २४ ऑक्टोबरला हा सामना झाला होता.

यासंदर्भात बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनीदेखील अशा प्रकारे सेलिब्रेट करण्यावर आक्षेप घेतला आहे. मंगळवारी माध्यांशी बोलताना संजय राऊत यांनी एक व्हिडीओ ट्वीट करून पाकिस्तानचा विजय साजरा करण्यासोबतच भारतविरोधी घोषणाबाजी झाल्याचं सांगितलं. यासोबतच, गृहमंत्री अमित शाह यांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यावेळी देखील अशी घोषणाबाजी झाल्याचा दावा केला.