News Flash

तिसऱ्या जगातील नागरिकांच्या समस्या

काही दिवसांपूर्वी विविध प्रसारमाध्यमांमध्ये एक बातमी झळकत होती,

कामावर निघाले होते, तेव्हा पुन्हा रेडियोवर हीच बातमी सांगत होते. या निर्णयाचा अनेक स्तरांतून निषेध होणार हेही जाणवलं.

काही दिवसांपूर्वी विविध प्रसारमाध्यमांमध्ये एक बातमी झळकत होती, ती बातमी म्हणजे ऑस्ट्रेलियन निवृत्ती वेतन कायदा बदलणार! ज्यांची अमुक आकडय़ाच्या वर मालमत्ता अथवा बचत आहे, त्यांचं निवृत्ती वेतन रद्द होईल का किंवा त्यांना बरंच कमी निवृत्ती वेतन दिलं जाईल का?  सरकारला खात्री पटली आहे की, ज्येष्ठ नागरिकांवर ऑस्ट्रेलिया बराच खर्च करते आणि त्यामुळे सरकारला अर्थसंकल्पाचा समतोल राखणं कठीण होऊन बसलंय.

कामावर निघाले होते, तेव्हा पुन्हा रेडियोवर हीच बातमी सांगत होते. या निर्णयाचा अनेक स्तरांतून निषेध होणार हेही जाणवलं. तसंच काही मिनिटांत रेडियोवर एक निषेध मंडळ पोटतिडकीने बोलू लागले. त्यात मग रेडियो स्टेशनबाहेरचे लोक दूरध्वनीद्वारे त्यांचा विरोध दर्शवत होते. हा सारा गोंधळ सुरू असताना एक फोन वाजला. तो घेतल्यावर रेडियोवरील निवेदक तावातावातच म्हणाला, ‘वी आर रनिंग आऊट ऑफ टाइम, सो व्हेरी क्विकली टेल अस व्हॉट यू थिंक ऑफ धिस?’ फोनच्या दुसऱ्या बाजूनं कापऱ्या आवाजात एक व्यक्ती बोलू लागली, ‘हॅलो, माय नेम इज गॅरी. आय एम नाइन्टी फोर इअर ऑफ एज, बाय गॉड्स ग्रेस अँड हार्डवर्क ऑफ माय लेट वाइफ अ‍ॅण्ड मी, वुई हॅव सेव्हड् इनफ टू सरव्हाइव.’ या वाक्यानंतर तो रेडियो निवेदक जरा त्रासूनच गॅरीला म्हणाला, ‘वी वाँट टू नो व्हॉट यू थिंक, नॉट व्हॉट यू हॅव.’ त्यावर गॅरीचं उत्तर मोठं मार्मिक होतं, ‘प्रीसाईजली इज व्हॉट आय थिंक , नॉट एव्हरी एल्डरली पर्सन इन अ थर्ड वर्ल्ड कंट्री गेट्स गव्हर्नमेंट सपोर्ट. सो हाऊ डू दे लीव्ह लाइक मी.. वेक अप ऑस्ट्रेलिया, वर्क हार्ड. सेव्ह मोर.’ या संभाषणानंतर दोन सेकंद नीरव शांतता झाली. नक्की गॅरीनी केलेली कानउघडणी कुठेतरी त्या सगळ्यांना बोचली असणार पण पटली असणार.

माझं रुग्णालय आलं आणि मी काम सुरू केलं. पण कामावरदेखील तीच चर्चा. लंचटाइमला स्टाफ रूममध्ये इतर पाच-सहा जणांसोबत बसले, तर त्यांच्यातही याच गप्पा सुरू असायच्या, सेराह माझी सहकारी- वय वर्षे २२. अगदी सहजरीत्या म्हणाली, ‘थँक गॉड! आधीच कळलं. आता मुलं, नवरा हे लटांबर नकोच, मजेनं एकटी राहीन. विल सेव्ह इनफ फॉर मायसेल्फ’. त्याला दुजोरा देत एमिली म्हणाली, ‘ग्रेट! आय गॉट डिव्होस्र्ड. किड्स आर बिग नाऊ. सो इट्स माय मनी.’ टीम रागानेच म्हणाला, ‘वी पे हाय टॅक्स, इफ आय डोन्ट गेट लुक्ड आफ्टर, व्हाय वर्क नाऊ?’ गप्पा काही पटत नव्हत्या, पण उगीच स्मितहास्य ठेवून जेवण आटोपलं व समजुतीच्या स्वरात म्हटलं, ‘लेट्स सी व्हॉट हॅपन्स, व्हेन इट हॅपन्स, टिल दॅन रिलॅक्स,’ असं म्हणून वॉर्डवर गेले.

घरी परतताना केवळ गॅरीच आठवत होता. असे अनेक गॅरी इंग्लंड, स्कॉटलंडहून जहाजाद्वारे ऑस्ट्रेलियाला आले. त्यांनी खडतर आयुष्य पाहिलं असेल. काम केल्यावरच मिळकत असते, हे त्यांना ठाऊक होतं. त्यामुळेच आज ते माझ्या पिढीला हे बोधवाक्य ऐकवतात. केवढं तथ्य आहे गॅरीच्या सुचनेत! आजही भारतात सरकारी नोकरी नसेल तर कसले पेन्शन आणि कसली मदत? आहे ते पुरवून वापरायचं, मुलंबाळं साथीला असली तर ठीक, नाहीतर येईल त्या परिस्थितीला तोंड देत दिवस घालवायचे. हे दाहक सत्य मी सेराह, एमिली, टीम यांना काय सांगणार व सांगितले तरी त्याचे गांभीर्य ते काय!

विवंचना, व्यथा मनुष्यजन्माला काही चुकल्या नाहीत. मग कुठल्याही देशात जन्माला आलो तरी थोडय़ाफार फरकाने ते असणारच. त्यावर तोडगा कसा काढायचा, हे आपल्यावरच अवलंबून आहे. घरकाम करणारी बाई दोन दिवस येत नाही म्हणून जेव्हा फोनवर माझ्या आईने मला सांगितलं तेव्हा मलाच कसंतरी झालं. एकटीवर सगळं काम पडणार म्हणून वाईट वाटलं. ‘आता तू काय करणार?’ असं विचारल्यावर आई सहजपणे म्हणाली, ‘अगं मी करणार.. तसंच तर नाही ठेवता येत. मग ही बाई आली तर ठीक, नाहीतर दुसरी मिळेपर्यंत करावंच लागेल.’  खरंच आहे. त्या दिवशी गॅरीदेखील रेडियोवरून हेच सांगत होता. पण इतकी र्वष सरकारी मदत उपभोगत असलेल्या इथल्या काही जणांना ते मान्य होत नव्हतं. आपल्यापेक्षा इतर कुणीतरी आपले जीवन सावरू शकते, हा त्यांचा समज आड येत असावा कदाचित. त्यांनाही होईल सवय हळूहळू.

वास्तविक भारतासारख्या प्रगतिशील देशाला ‘थर्ड वर्ल्ड कंट्री’ संबोधायला मन मानतच नाही मुळात. काही गोष्टी आपण पाळल्या किंवा त्याची सवयच लावून घेतली, तर सुसह्य बदल घडायला वेळ लागणार नाही. उदाहरणार्थ, परिसर स्वच्छतेची आपणच काळजी घ्यायला हवी. मग पालिका कर्मचाऱ्यांवर अवलंबून राहायची वेळ येणार नाही. तसंच स्त्री सुरक्षा हा दैनंदिन जीवनातला अत्यंत गंभीर प्रश्न आहे. त्यासाठी पोलीस यंत्रणा कार्यरत आहेच, पण आपण प्रत्येकाने आपल्या सोबत बाजूच्यालाही आधार दिला, तर रोज कामानिमित्त बाहेर पडावे लागणाऱ्या स्त्रियांना थोडय़ा अंशी तरी दिलासा मिळेल. तसे घडत असेलही कदाचित. मात्र या सकारात्मक दृष्टीचे प्रमाण वाढले पाहिजे, हे नक्की.

सध्या महाराष्ट्राला भेडसावणारी समस्या ‘शेतकरी बांधवांची आत्महत्या’. आपल्या कलावंत मंडळींनी पुढाकार घेऊन ज्या तडफदारीने ही समस्या हाताळली आहे ही बाब खरोखरच कौतुकास्पद आहे. सरकारी मदतीवर अवलंबून न राहता थेट मदत करण्याचे जे धाडस त्यांनी दाखवले आहे ते वाखाणण्याजोगे आहे. आमच्या ऑस्ट्रेलियन मराठी मित्र परिवारानेसुद्धा मदतीचा हात पुढे केला आहे व निर्विवादपणे आम्ही त्यांना सर्वतोपरी सहकार्य करणारच. मदतीची अपेक्षा न ठेवता आपण बदल घडवून आणला तरच प्रश्न सुटतील, निदान कमी तरी होतील. एवढी तळमळ जागृत ठेवली तर भारताला नुसते विकसित राष्ट्र संबोधणाऱ्यांना भारत ‘द फर्स्ट वर्ल्ड कंट्री’ म्हणण्याशिवाय पर्याय उरणार नाही.

  –  kulkarnimona@hotmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 18, 2015 1:37 am

Web Title: monica kulkarni article on citizens of third world
Next Stories
1 कोलंबस आणि अमेरिका
2 सेल्फी  ‘स्वयं’सेवक
3 इंग्लंडची हृदयसम्राज्ञी
Just Now!
X