03 August 2020

News Flash

नव्या वळणांकडे जाण्यापूर्वी

मध्ययुगाच्या पूर्वीच भारतीय उपखंडात आलेल्या इस्लामी व्यापारी-राजकीय समूहांनी इथे बस्तान बसवून इथल्या घडामोडींना आणखी वेगळी दिशा दिली.

प्राचीन धारणा

‘संस्कृती’ हा शब्द मानवी इतिहासाविषयीच्या लोकप्रिय धारणांच्या चौकटीतला एक अतिशय महत्त्वाचा शब्द आहे. इतिहासाविषयीच्या अस्मिता आणि आकस दोन्ही समांतर आणि टोकाच्या जाणिवा या शब्दाविषयीच्या धारणांतून आकाराला येतात. ‘सं’ हा उपसर्ग (prefix) आणि ‘कृ’ (करणे) हा धातू यांच्या संयोगातून बनलेला हा शब्द मानवी समूहांच्या जाणिवांच्या इतिहासाच्या उत्क्रांतीचे निदर्शन करण्यासाठी बनला असावा. पृथ्वीवरच्या जीवसृष्टीमध्ये तुलनेने उशिरा निर्माण झालेला, दोन पायांवर चालणारा, ताठ कणा असलेला मानवप्राणी आपल्या जाणिवा, संवेदनशीलता आणि बुद्धी यांच्या जोरावर इतर प्राण्यांच्या-पशूंच्या तुलनेत आपले वेगळेपण सांगतो, ते या बुद्धिजन्य जाणिवा आणि संवेदनशीलतांतून स्वत:च्या पशुत्वावर केलेली मात आणि त्यातून घडवलेल्या नतिक-मूल्याधिष्ठित धारणांच्या जोरावर. वैयक्तिक आणि सामूहिक पातळीवर स्वत:च्या मनातील उपजत धारणांना, ऊर्मीना आणि रागलोभादिक संवेदनांना वैयक्तिक आणि सामूहिक पातळीवर नियमित करण्यासाठी विशिष्ट चौकटींच्या कक्षांत सार्वजनिक जगात वावरताना जाणवलेल्या जाणिवांच्या कसोटीवर घासूनपुसून सं+कृत अर्थात संस्कृत-संस्कारित करण्याच्या अविरत वैयक्तिक अथवा सामूहिक प्रयत्नांचे मूर्त रूप म्हणजे एखाद्या विशिष्ट भूभागातील संस्कृती. इंग्रजीतला ‘कल्चर’ हा शब्द आणि क्रियापद संस्करण अथवा संस्कार या शब्दाचे अक्षरश: प्रतिरूप. म्हणूनच धारणांच्या विकसनाचा आपण पाहात असलेला हा प्रवास वेगवेगळ्या काळात उपजलेल्या संवेदनांच्या चौकटीत सिद्ध केलेल्या मूल्यांच्या विकसनांची आणि मानवी समाजाच्या संस्करणाच्या बहुविध प्रक्रियांचीच अभ्यासचर्चा आहे.

भारतीय उपखंडामधल्या मानवी समूहांच्या या इतिहासाची चर्चा करत इथवर येताना, गेल्या भागातल्या राजव्यवस्था आणि त्याअनुषंगाने राजनीती, दंडनीती आणि राजकीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी बलहिंसा इत्यादींच्या वापराविषयीच्या चौकटी आखणाऱ्या राज्यव्यवहारशास्त्रपर ग्रंथातील काही महत्त्वाच्या तत्त्वांचा आढावा घेतला. स्वत:च्या आणि आपल्या राज्याच्या राजकीय आकांक्षांच्या पूर्तीसाठी, संरक्षणासाठी कूटनीती, दंड, हिंसा इत्यादी साधनांचा वापर हा राजनीतिज्ञ आचार्याना मान्य असून, त्यांनी त्याविषयी केलेल्या सूचना आणि कूटनीतिपर चाले, त्याविषयीचा विवेक आणि ऐतिहासिक उदाहरणांद्वारे त्याची केलेली चर्चा यांचा परामर्श आपण घेतला. इ.स.पू. ६०० ते इ.स. ६०० या काळातल्या या राजकीय-सामाजिक इतिहासात यज्ञीय पशुहिंसा, युद्धातील नरिहसा आणि मृगया-शिकार, इत्यादी खेळांतून होणारी पशुहिंसा अशा वेगवेगळ्या स्तरावरील हिंसा आणि त्यांच्या समर्थनांविषयीच्या चर्चा त्या त्या शास्त्राविषयीच्या ग्रंथात दिसून येतात. विविध स्तरावरील हिंसेच्या-बलप्रयोजनाच्या या प्रकारांना राजकीय-सांस्कृतिक परिप्रेक्ष्यात राजधर्म-यज्ञधर्माच्या कोंदणात बसवून (‘यज्ञीय हिंसा ही हिंसा ठरत नाही’ यासारख्या समजुतींद्वारे) त्यांना प्रमाणित करण्यात आले. आणि राजाच्या किंवा धर्मविधींच्या अधिकाराच्या चौकटीत त्या हिंसांना गौरवास्पदच स्थान प्रदान करण्यात आल्याचं दिसतं. पृथ्वीच्या लाभासाठी आणि पालनासाठी मार्गदर्शन करणाऱ्या या शास्त्रांनी अधिकारप्राप्त राजाला सर्वसामथ्र्यवान राहाण्यासाठी सुचविलेल्या नीतिमार्गाच्या पृष्ठभूमीवर मानवी इतिहासांत विशिष्ट अधिकार (authority), बल (power) आणि समूहविवेक यांच्या संतुलनाविषयीच्या कल्पनांचा इतिहास व त्यातील विरोधाभास पाहात- तपासत राहणं तितकंच महत्त्वाचं ठरतं. विशिष्ट वर्णाना असलेल्या अधिकारकक्षेत प्रवेश केल्याबद्दल शंबूक या वन्य समूहातील मनुष्याचा मर्यादापुरुषोत्तम या नावाने ओळखल्या जाणाऱ्या रामाने केलेला वध असो. किंवा शांतीचे आणि समावेशकतेचे प्रतीक मानल्या गेलेल्या सम्राट अशोकाने आपला राज्यातील वन्यजमातींविषयीची शत्रुत्वाची भावना आणि त्यांविषयी शिलालेखांतून दिसून येणारं लक्षणीय चित्रण, त्यांच्यातल्या संघर्षांचे उल्लेख असोत, उपखंडातील इतिहासात विविध समूहांतले संघर्ष, सामूहिक अस्मिता आणि व्यवस्थांतून निर्माण झालेले मतभेद आणि संघर्ष लक्षणीय ठरतात. हे संघर्ष तत्कालीन प्रादेशिक-सामाजिक व्यवस्थाविषयीच्या धारणा आणि मूल्यप्रणालींच्या चष्म्यातून पाहिले असता अनेक रोचक बाबी दृष्टीस येतात. पुरोहित वर्गाला झालेल्या आश्रम-अग्रहारांच्या वाटपातून त्या त्या लाभधारकांचा आणि संबंधित वन्यप्रदेशातील वन्य जमातींचा झालेला संघर्ष, अशोककालीन राजव्यवस्थेला वाटत असलेला सीमावर्ती वन्यजमातींविषयीचा वैरभाव, महाभारतात खांडववनप्रसंगीचे नागांचे शिरकाण.. अशा वेगवेगळ्या प्रसंगातून हे संघर्ष ठळक दिसून येतात. उपखंडातील प्राचीन काळातील बलवत्तर ठरलेल्या राजकीय व्यवस्थेचे प्रमाणीकरण हे वैदिक धर्माच्या चौकटीत घडून आले. रामायण-महाभारतात वर्णन केलेले वर्णाश्रमधर्मी राजे किंवा वर्णधर्मानुसार क्षत्रिय (खत्तीय) जातीतील राजपुत्राने, बुद्धाने स्थापन केलेल्या बौद्ध धर्माचे पालन करणारा प्रमुख राजा अशोक हे त्याअर्थाने प्रस्थापित-नागर समाजाचेच प्रतिनिधी ठरतात. या पृष्ठभूमीवर त्यांचा वन्य जमातीतील मानव समूहांविषयी असलेला वैरभाव हा लक्षणीय ठरतो. आश्रम-अग्रहार किंवा मठांना दिलेल्या वन्य प्रदेशांतील जमिनी, त्यांचे अर्थकारण आणि त्या वन्य प्रदेशांत पूर्वीपासून रहिवास असलेल्या वन्य समूहाचे संघर्ष हे बलवत्तर समाजाकडून वन्य समूहांच्या अधिवासाच्या, आजीविकेच्या आणि संस्कृतीच्या व्यवस्थांसमोर बलवत्तर ठरल्या. अर्थात, तत्कालीन नागर व्यवस्थांमधील समूह आणि वन्य समूह यांच्या संपर्कातून केवळ वन्य संस्कृतींचा नाशच झाला असे म्हणणे काहीसे अस्थायी ठरेल. कोणत्याही दोन मानवी समूहांचा संपर्क आल्यावर त्यातून होणाऱ्या संघर्षांसोबतच, सांस्कृतिक आदानप्रदान आणि वेगवेगळ्या परिप्रेक्ष्यात आकाराला येणारे संबंध ओघाओघाने आकाराला येतात. उपखंडामधल्या प्राचीन इतिहासात वरील समूहांच्या संपर्कातून राजकीय-सामाजिक संघर्षांना समांतर असे आदानप्रदान आणि काही प्रमाणात समावेशनदेखील झाले असणार याविषयी काही शंका नाही.

आपल्याकडच्या उपलब्ध लिखित, मौखिक ऐतिहासिक साधनांवर मुख्य नागरी समाजातून प्राप्त झालेल्या साधनांची उपलब्धी आणि वर्चस्व कायमच अधिक राहिले आहे. केवळ स्मृतींद्वारे पिढय़ान् पिढय़ा हस्तांतरित झालेल्या संघर्षांच्या इतिहासातदेखील नागरी समूहांच्या संघर्षांच्या इतिहासालाच अधिक लोकप्रियता प्राप्त झाली. त्यामुळे नागरी राज्यव्यवस्थांच्या तुलनेत वन्य जमातींशी झालेल्या नागरी संपर्काचा राजकीय-सांस्कृतिक इतिहास नगण्य प्रमाणात उपलब्ध/संकलित झालेला आहे. त्यामुळे त्यांच्या शोषणाचा, नगर व्यवस्थेतील समावेशनाचा आणि बहिष्करणाचा इतिहास म्हणावा त्या प्रमाणात अजूनही प्रकाशात आलेला नाही. या समूहांपकी कुणी नागर व्यवस्थेत केवळ दलप्रमुखपदापासून राजपद हस्तगत केले असू शकेल, अनेक सातवाहन कुळासारख्या तथाकथित निम्नजातीय वंशांनी इथल्या नागर व्यवस्थेतील सर्वोच्च स्तरावर विराजमान होऊन ज्याप्रमाणे अनेक शतके नागरव्यवस्थांवर अधिराज्य गाजवले, त्याप्रमाणे वन्यजमातींतील कुणा कर्तबगार समूहा-व्यक्तींविषयीचे संदर्भ वन्य जमातींच्या मौखिक अथवा अन्य पद्धतीतून जतन झालेल्या इतिहासातून अद्याप गवसलेले नाहीत. अगदी वर्तमान काळातील घडामोडींचा इतिहास पाहाता या वन्य प्रदेशांतील अनेक समूहांनी आपल्या नागरी राष्ट्र राज्यव्यवस्थेविरोधात पुकारलेल्या संघर्षांचा इतिहास वर दिलेल्या उदाहरणांकडे पाहाता तितका आधुनिक आणि वरवरचा नाही, हेच दिसून येतं.

आपल्या मूळ चच्रेचा रोख भारतीय उपखंडातील संस्कृतीतील राजव्यवस्था, तिचे दमनशीलत्व आणि त्या अनुषंगाने झालेल्या हिंसेविषयीच्या कल्पनांकडे आहे. त्यासंदर्भात राज्यव्यवस्था आणि राजगादीचे अधिकार सांभाळताना हिंसा हा अपरिहार्य असते हे ‘सत्य’ बहुतांश राजनीतिकारांनी स्वीकारल्याचे दिसून येते. त्यामुळेच मर्यादापुरुषोत्तम रामाचे चित्रण करताना शंबूकाची हत्या हे त्या मर्यादांचे पालनच ठरते आणि अशोकाचे वन्य जमातींविषयीच्या धारणादेखील राजकीय व्यवस्थेच्या नियमनाचा एक भाग ठरतो. कोणतीही विशिष्ट सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक विचारसरणी संघटितरूपात व्यवस्थेच्या चौकटीत बसवताना तिच्यात व्यवस्थादृष्टय़ा आखली जाणारी प्रशासन व्यवस्था त्या प्रशासन व्यवस्थेच्या संचालनासाठी आणि व्यक्तिगत-सामूहिक-सांस्कृतिक स्वार्थापोटी अधिकारांचा आणि अधिकारप्रदत्त बळाचा वापर करते आणि त्यातून व्यवस्थांतर्गत किंवा व्यवस्थेबाहेरील लोकांचे शोषण सुरू होते. प्राचीन भारतात व्यवस्थेकडून झालेल्या शोषणाविरोधात उभे राहणारे समूह फारसे दिसून येत नाहीत, त्यामुळे राजकीय व्यवस्थेविषयीचे प्रतिपक्षाकडून झालेले प्रतिवाद उपखंडात दिसून येत नाहीत. सांस्कृतिक-धार्मिक-जातीय व्यवस्थांच्या विरोधातल्या तत्त्वज्ञानांचे स्थान इथल्या समाजात स्वाभाविक विरोधासोबतच स्वीकरणीयदेखील राहिले. राजकीय व्यवस्थांतील संघर्षांवर फारसे भाष्य मात्र उपखंडातील तत्त्वज्ञानात दिसून येत नाही. पुराणे आणि महाभारतांतून राजकीय संघर्ष हा केंद्रस्थानीच राहिला आहेच, अगदी बुद्धांनीदेखील लिच्छवींविरोधात मगध राज्याला अप्रत्यक्ष कूटनीतिपर सूचना केल्याचं आपण पाहिलं आहे.

मात्र, याचा अर्थ राजकीय हिंसा किंवा बल यांविषयीचा विवेक उपखंडातील समाजात नव्हता असे म्हणणे अनुचित ठरेल. एक सामाजिक वास्तव किंवा नतिक समस्या म्हणून हिंसा या गोष्टीचा विचार बौद्ध-जैन ग्रंथांतून आणि महाभारतातून मोठय़ा प्रमाणात चíचलेला दिसून येतो. तिन्ही प्रणालींतून झालेल्या या चर्चा पुण्य-अपुण्य, कर्म आणि कर्मविपाक-पुनर्जन्मादि चौकटींशी संलग्न ठेवल्या गेलेल्या आहेत. परिपूर्ण सत्त्वाधारित अिहसाप्रवण नतिकता उपखंडातील तत्त्वज्ञानविश्वात चíचली गेली असली, तरी व्यवहारात राज्यव्यवस्था किंवा अन्य व्यवस्थांच्या संदर्भात हिंसेचे व्यवहार्यत्व विवेकाच्या आदर्श चौकटीत बसू शकत नसल्याचे भान साऱ्याच तत्त्वज्ञानप्रणालींतून दिसून येतं. समाजाचे आणि शासनव्यवस्थेचे नियमन करणारा राजा हा बल-दंडनीती आणि हिंसा यांचा नियंत्रक असल्याची धारणा प्राचीन समाजात सर्वमान्य दिसते. एककेंद्री शासनव्यवस्थेचा आणि समाजव्यवस्थेचा स्वीकार केलेल्या प्राचीन समाजातील तत्त्वज्ञानात हिंसा आणि बल यांचे अमानुषत्व आणि एककेंद्रित्व वेगवेगळ्या मार्गानी नीतिनियम-कर्मसिद्धांत, मिथके आणि अलौकिकत्वाच्या अन्य चौकटींत प्रमाणित आणि पवित्रीकृत करण्यात आले. अर्थात, राजकीय संकल्पना आणि प्रणाली त्यांच्या बहुस्तरीय ऐतिहासिक संदर्भाच्या चौकटीत बसवल्या जात असल्या तरी त्यांच्याकडे विविध प्रकारच्या धार्मिक-सामाजिक-आíथक-कालिक तात्त्विक दृष्टींनी पाहता येतं. उदाहरणार्थ, मंत्रपुष्पांजलीमध्ये समाविष्ट असलेले समुद्रापर्यंत पसरलेले एकसंध सार्वभौम राज्य किंवा कौटिल्याने कल्पिलेले सर्व मानवी समूहांना नियंत्रणाखाली आणणारे एककेंद्री बलवत्तम असे राज्य हे केवळ त्या त्या रचयित्यांच्या कल्पनाविलासाचाच भाग मानावा लागतो. महाभारतात युद्धाविषयीच्या (आणि हिंसे) कल्पनांचे शक्य त्या सर्व प्रकारे समीक्षण झाल्याचे दिसून येते. मात्र, अशोकाचा अपवाद (वरील वन्य जमातींचा संदर्भ वगळून चालणार नसले तरी) हिंसेविषयी पूर्णत: विरक्तीचे विचार अन्य कुठल्या तत्त्वज्ञानव्यूहाला संमत नाहीत.

या सगळ्या ऐतिहासिक पृष्ठभूमीवर साऱ्या राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक-आध्यात्मिक उलथापालथींच्या गदारोळात उपखंडात आलेले आफ्रिका-मध्यशिया, वायव्य आशियातून आलेल्या समूहांनी रुजवलेली मूल्ये, धर्मकल्पना आणि राजकीय व्यवस्थांचा विचार होणे गरजेचे आहे. मध्ययुगाच्या पूर्वीच भारतीय उपखंडात आलेल्या इस्लामी व्यापारी-राजकीय समूहांनी इथे बस्तान बसवून इथल्या घडामोडींना आणखी वेगळी दिशा दिली. स्थानिक धार्मिक-सांस्कृतिक संदर्भ आणि त्यांचा आवाका त्या नवीन समूहांनी स्थापन केलेल्या राजकीय-सांस्कृतिक प्रणालींच्या अवकाशात अधिक जटिल होत गेले. आणि काही शतकांतच वासाहतिक समूहांनी इथे व्यापारी आणि राजकीय बस्तान बसवायला सुरुवात केली. धारणांच्या धाग्यांचा हा प्रवास आपल्याला आता मध्ययुगातील वळणांवरून पुढे न्यायचा आहे. पण त्याकडे जाताना इथल्या स्थानिक सांप्रदायिक संदर्भाना इस्लामपूर्व काळातील मध्यआशियायी सांस्कृतिक संदर्भाची मिळालेली जोड आणि इथे रुजू पाहणाऱ्या नवीन समूहांचे आणि इथल्या समूहांचे इस्लामपूर्व अनुबंध समजून घ्यायचे आहेत. या अनुबंधांच्या आकलनातून मध्ययुगातील नव्या वळणांची घडण समजून घेणे अधिक सोपे आणि सयुक्तिक ठरणार आहे.

(लेखक ग्योटिंगेन विद्यापीठ जर्मनी येथे पीएचडी संशोधक असून ऑब्झव्‍‌र्हर रीसर्च फाउंडेशन येथे वरिष्ठ संशोधक म्हणून कार्यरत आहे.)

rajopadhyehemant@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 26, 2018 11:56 am

Web Title: before exploring new ways history of violence in india
Next Stories
1 राजनीतिशास्त्र आणि समाजधारणा
2 कौटिल्येन कृतं शास्त्रम्।
3 बदलते ‘धर्म’ आणि बदलत्या ‘जाणिवा’
Just Now!
X