जय पाटील
डबेवाल्यांना लोकल ट्रेनने प्रवास करण्याची मुभा मिळाली आणि १३० वर्षांची परंपरा असलेली ही सेवा सहा महिन्यांच्या प्रदीर्घ खंडानंतर पुन्हा सुरू झाली. पुन्हा सुरुवात अंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या नियमावलीने मुंबईकरांच्या उदरभरणाबरोबरच हातावर पोट असलेल्या डबेवाल्यांच्याही उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत, पण त्यांच्या वाटेतील अडथळे अद्याप पूर्णपणे नाहीसे झालेले नाहीत.
‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार प्रवासाची मुभा देताना घालण्यात आलेली पोलिसांकडून क्यू आर कोड मिळवण्याची अट, कमी झालेली मागणी आणि अनेक महिने धुळीत पडल्यामुळे गंजलेल्या सायकल, अशा अनेक समस्यांना डबेवाले सध्या तोंड देत आहेत.

मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर क्यू आर कोड मिळवण्याची प्रक्रिया जाणून घेण्यासाठी पोलिस आयुक्तांच्या कार्यालयात गेले होते. ते सांगतात, ‘आम्हाला रेल्वेने प्रवास करण्याची मुभा मिळाली आहे. पण क्यू आर कोड म्हणजे काय, हे सुद्धा मला माहीत नाही. तो मिळवू आणि वापरू इच्छिणाऱ्यांकडे स्मार्टफोन असणे अनिवार्य आहे का, हे देखील मला माहीत नाही,’ असे त्यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेसला’ सांगितले.
शाळा, महाविद्यालये बंद म्हणजे डबेवाल्यांचा अर्धा अधिक व्यवसाय बंद. टाळेबंदीपूर्वी एका डबेवाल्यालपा दिवसाला सरासरी १५ डबे पोहोचवण्याचे १५ हजार रुपये मिळत. पण सध्या एक डबेवाला सरासरी चारच डबे पोहोचवतो. अवघ्या चार हजारांत मुंबईत एखाद्या कुटुंबाचा खर्च भागणे शक्य तरी आहे का, असा प्रश्न तळेकर करतात.

त्यांच्या अंदाजाप्रमाणे डबेवाल्यांना क्यू आर कोड मिळताच सर्वांत आधी कोणते काम करावे लागणार असेल, तर ते म्हणजे नवी सायकल खरेदी करणे. गेले सहा महिने रेल्वे स्थानकांच्या बाहेर उन्हा-पावसात पडून असलेल्या त्यांच्या सायकल गंजून गेल्या आहेत. त्यांची अवस्था दुरुस्तीच्या पलिकडे गेली आहे.

डबेवाले रोज घरोघरी जाऊन डबे गोळा करतात. मग सायकलवरून जवळचे रेल्वे स्थानक गाठतात. विविध स्थानकांत गोळा होणारे सर्व डबे लगेजच्या डब्यात ठेवून संबंधित ग्राहकाचे कार्यालय, शाळा, महाविद्यालय जिथे आहे, तिथल्या स्थानकावर उतरवले जातात. तिथून त्या-त्या भागात सेवा देणारे डबेवाले सायकलवरून ते संबंधित ग्राहकाला पोहोचवतात. अर्थात या प्रक्रियेत डबे अनेक हातांतून जातात. अनेक गृहनिर्माण संकुलांनी अद्यापही बाहेरच्या व्यक्तींना प्रवेशबंदी कायम ठेवली आहे. अनेक ग्राहकांच्या मनात भीती आहे, की त्यांनी प्रियजनांसाठी पाठवलेले अन्न संसर्गित होईल. अनेक ग्राहक सध्या घरून काम करत आहेत. त्यामुळे डबेवाल्यांच्या व्यवसायाला फारच मोठा फटका बसला आहे. या बिकट परिस्थितीत तगून राहण्यासाठी सरकारने आर्थिक साहाय्य करावे आणि ग्राहकांनी विश्वास ठेवावा, अशी आवाहन तळेकर यांनी केले आहे.