कंदील, दिव्यांची रोषणाई, पणत्यांची आरास, दाराभोवती सुंदर रांगोळ्या, घरात विविध प्रकाराचे फराळ असं चित्र शहरी भागात दिवाळीला पाहायला मिळतं. फटाक्यांच्या आवाजांनी शहर दणाणून उठतं. बोनस मिळाल्याने कर्मचाऱ्यांची दिवाळी दणक्यात असते. व्यापारी मंडळींचा कमावायचा दिवस असल्याने त्यांचीही दिवाळी जोमात असते. बाजार विविध वस्तूंनी फुललेला असतो. वेगवेगळ्या सवलतींना भुलून पुढचे आठ दिवस दुकानांबाहेर ग्राहकांची चांगलीच लगबग पाहायला मिळते.  पण, या शहाराच्या कलकलाटापासून दूर कोकणात दिवाळीत एक वेगळंच चित्र पाहायला मिळतं. ना फटाक्यांचा आवाज, ना मोठी विद्युत रोषणाई.. अगदी शांतपणे दिवाळी साजरी केली जाते. गणपतीत जितका उत्साह जितकी लगबग येथे पाहायला मिळते, तितक्याच विरोधाभासाचं चित्र दिवाळीत येथे असतं, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.

दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे नरकचतुर्दशी दिवसाची सुरूवात आपल्याकडे अभ्यंगस्नानाने होते. पण कोकणात मात्र आजही अनेक गावांत नारळाच्या रसाने स्नान करण्याची प्रथा आहे. थंडीच्या दिवसात त्वचा रुक्ष पडते, त्वचेचा रुक्षपणा घालवण्यासाठी नारळाचं दूध वापरून स्नान केलं जातं. दिवाळीला घराला रंगरंगोटी करण्याची किंवा दाराभोवती मोठी रांगोळी काढण्याची पद्धत नसली तरी दारातल्या तुळशीभोवती शेण सारवून चुन्याची किंवा पीठाची रांगोळी काढली जाते. स्नान झाल्यानंतर घरातली पुरूष मंडळी ओल्या अंगानेच कारिट नावाचं कडू फळ तुळशीसमोर पायाने फोडतात. कारिट हे नरकासुराचं प्रतिक आहे. त्यामुळे वाईट प्रवृत्ती पायदळी तुडवून चांगल्या कामाची सुरूवात करण्यासाठी आशीर्वाद घेतला जातो.

कोकणात अनेक गावात सातीवनाचं झाडं असतं, या झाडाला नरकचतुर्दशीच्या दिवशी फार महत्त्व असतं. दिवाळीची सुरूवात तोंड गोड करून करायची असली तरी कोकणात मात्र शब्दश: तोंड कडू करून दिवाळीची सुरूवात करतात. गावातील एक व्यक्ती पहाटे लवकर उठून या झाडापाशी जाते. सातीवनाची पूजा केल्यानंतर या झाडाच्या साली काढून त्या घरी आणल्या जातात. त्यानंतर आजूबाजूंच्या घरात वाटल्या जातात. या सालीत मिरे, लसूण टाकून त्याचा रस तयार केला जातो, त्यानंतर घरातली इतर मंडळी या रसाचे प्राशन करतात. त्यात औषधी गुणधर्म असतात.

कोकणात या काळात भात कापणीची कामं सुरू असतात. कोकणातील बहुतांश कुटुंबाचा उदरनिर्वाह हा भात शेतीवर असल्याने याकाळात सगळेच कापणीच्या कामात व्यग्र असतात. भाताची कापणी झाल्यानंतर पहिल्या कापणीतल्या भातापासून पोहे तयार केले जातात. आपल्या शहरी भागात मिळणाऱ्या पोह्यांपेक्षा हे पोहे खूपच वेगळे असतात. तपकीरी आणि जाडसर पोह्यात गुळ, खोबरं आणि वेलची घालून गोडाचे पोहे तयार केले जातात. हंगामातले पहिलेच पोहे असल्याने सारं कुटुंब देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर या पोह्यांवर ताव मारतं. झटपट दिवाळीचा बेत आवरल्यानंतर सारे पुन्हा भातकापणीच्या कामाला सुरुवात करतात.

प्रतिक्षा चौकेकर

pratiksha.choukekar@loksatta.com