dwi85अमेरिकेच्या सांस्कृतिक जीवनामध्ये ‘दि न्यू यॉर्कर’ या साप्ताहिकाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. १९२५ पासून हे साप्ताहिक विविध अंगांनी अत्यंत गंभीर, क्लिष्ट, विनोदी तसंच नर्मविनोदी लेखांद्वारे आणि व्यंगचित्रांद्वारे अमेरिकेच्या जनमानसाचा, संस्कृतीचा, बदलणाऱ्या नीतिमूल्यांचा आढावा घेत आलंय असं म्हटलं तरी चालेल.

२१ फेब्रुवारी १९२५ रोजी ‘दि न्यू यॉर्कर’चा पहिला अंक बाहेर पडला. विविध प्रकारच्या लेखांबरोबरच त्यात व्यंगचित्रं, हास्यचित्रं आणि रेखाटनांना प्रचंड महत्त्व दिलेलं होतं. आणि अल्पावधीतच ‘दि न्यू यॉर्कर’ने आपलं स्थान आणि महत्त्व अधोरेखित केलं. तेव्हापासून ते आजच्या ताज्या अंकापर्यंत ‘न्यू यॉर्कर’मधली व्यंगचित्रं हा व्यंगचित्रप्रेमींचा कायम कुतूहलाचा विषय राहिला आहे. (‘न्यू यॉर्कर’मध्ये इतक्या मोठय़ा संख्येने व्यंगचित्रं, चित्रं आणि फोटो येत असत, की सुरुवातीच्या काही अंकांनंतर त्यावर टीका करताना अनेकजण म्हणत की, ‘ज्यांना वाचता येत नाही तेसुद्धा ‘न्यू यॉर्कर’ वाचू शकतात!’)
खास अमेरिकन ह्य़ूमर स्टाईलची ही व्यंगचित्रं रसिक आवर्जून पाहत असत. ‘न्यू यॉर्कर’मधील व्यंगचित्रांची ही जबरदस्त लोकप्रियता पाहून त्यातल्या निवडक व्यंगचित्रांचे संग्रह काढण्याची कल्पना मग पुढे आली. आणि दर १५, २०, २५ वर्षांनी ‘न्यू यॉर्कर कार्टुन्स’ या नावाने त्यांचे मोठय़ा आकारातले संग्रह बाजारात येऊ लागले आणि रसिकही हे आपल्या संग्रही ठेवू लागले. मुंबईतल्या एखाद् दुसऱ्या पुस्तक विक्रेत्याकडे ‘१९२५ ते ५०’ अशा प्रकारचे हे व्यंगचित्रसंग्रह पूर्वी मिळत असत. त्यातली व्यंगचित्रं पाहत असताना त्या काळातल्या सामाजिक-राजकीय परिस्थितीची जाणीव किंवा कल्पना येत असे व त्या अनुषंगाने त्या व्यंगचित्रांचा आस्वादही घेतला जात असे. विशेष म्हणजे ‘न्यू यॉर्कर’मधल्या व्यंगचित्रांतून अमेरिका वगळता इतर जग जवळपास असून नसल्यासारखंच असे. त्यामुळे या संग्रहांतल्या काही व्यंगचित्रांचे संदर्भही आपल्या माहितीचे नसतात. पण असं असूनसुद्धा ही व्यंगचित्रं जगभरचे वाचक आवर्जून पाहत असतात. याचं कारण dwi90अमेरिकन जीवनशैलीविषयी जगभरच्या लोकांना असलेली उत्सुकता आणि या व्यंगचित्रांतून हाताळण्यात येणारे वैविध्यपूर्ण विषय, त्यांचं रेखाटन, दृश्यमांडणी आणि त्यांतला तरल विनोद.
२००२ साली ‘दि न्यू यॉर्कर’च्या व्यवस्थापनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. तो म्हणजे- आजवर ‘न्यू यॉर्कर’मध्ये प्रसिद्ध झालेल्या सर्व व्यंगचित्रांचं संकलन करून त्यांचा एकत्रित संग्रह काढण्याचा. ही अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना होती. कारण आजवर जगभरातल्या अनेक नियतकालिकांनी व्यंगचित्रांचे संग्रह जरूर काढले आहेत. उदा. पंच, प्लेबॉय, मॅड, इत्यादी. पण ते ‘निवडक’ स्वरूपात. प्रसिद्ध झालेली एकूण एक व्यंगचित्रं एकत्र करून त्यांचा संग्रह काढणे याला महत्त्वाकांक्षीच (खरं तर राक्षसी महत्त्वाकांक्षी!) म्हणावं लागेल. या सगळ्या दस्तावेजीकरणाची कल्पना मनात आणणे आणि ती अत्यंत शिस्तबद्धपणे प्रत्यक्षात उतरवणं, हे फक्त अमेरिकनच करू शकतात. आणि त्यांनी ते करून दाखवलंही!
‘दि न्यू यॉर्कर’चे कार्टुन एडिटर रॉबर्ट मॅनकॉफ यांनी आपल्या ‘न्यू यॉर्कर’मधील साथीदारांसह हे अवजड आणि अवघड स्वप्न हाती घेतलं आणि दोन वर्षांत साकारही केलं. १९२५ पासून ते २००४ पर्यंतचे ‘न्यू यॉर्कर’चे सगळे अंक त्यांनी नजरेखालून घातले आणि एकही व्यंगचित्र आपल्या नजरेतून निसटू नये म्हणून कसोशीने प्रयत्न केले. अंदाजे चार लाख पाने चाळून झाल्यावर त्यातून त्यांना ६८,६४७ व्यंगचित्रांचा शोध लागला. (संपादकांनी या संग्रहाबद्दल लिहिताना गमतीने म्हटलं आहे की, ‘एवढी व्यंगचित्रं म्हणजे एखाद्या छोटय़ा शहरातील प्रत्येक नागरिकासाठी एकेक!’) इतकं करूनही एखादं व्यंगचित्र निसटलं असेल अशी भीती त्यांना वाटत होती. म्हणून त्यांनी ‘न्यू यॉर्कर’मधून असं निसटलेलं व्यंगचित्र कुणी शोधून दाखवलं तर त्यास दहा डॉलर्सचं बक्षीस देण्याचंही जाहीर केलं.
सुरुवातीला सर्वच्या सर्व म्हणजे ६८,६४७ व्यंगचित्रांचा समावेश असलेल्या पुस्तकाचा विचार ‘न्यू यॉर्कर’ करत होतं. पण ‘एका पानावर तीन’ अशी चित्रं छापली तरी ते साधारण २३ हजार पानांचं पुस्तक झालं असतं. ते अर्थातच अव्यवहार्य होतं. (कारण छोटय़ा पोस्टाच्या तिकिटाएवढी व्यंगचित्रं छापणं हा अस्सल भारतीय संपादकीय कद्रूपणा अमेरिकन लोकांना जमणं शक्यच नव्हतं!) त्यामुळे तंत्रज्ञानाचा आधार घेत ही सर्व व्यंगचित्रं दोन डीव्हीडीमध्ये बसवून अतिमोठय़ा आकाराच्या तब्बल ६५६ पानांच्या महाग्रंथासोबत ती दिली dwi86आहे. ‘दि कम्प्लीट कार्टुन्स ऑफ दि न्यू यॉर्कर’ या नावाने निघालेला हा महाग्रंथ म्हणजे अमेरिकन व्यंगचित्रकलेचा एक महत्त्वाचा दस्तावेज ठरला आहे.
अर्थात पुस्तकात छापलेली हजारो व्यंगचित्रं (कॉम्प्युटर स्क्रीनवर पाहण्यापेक्षा) प्रत्यक्ष पाहण्यात खूपच समाधान मिळतं. कारण जशी ती पूर्वी छापली होती तशीच आणि त्याच आकारात ती पुन्हा पाहायला मिळतात. अनेक व्यंगचित्रकारांची रेखाटनाची शैली- कुणाची पेनाची, कुणाची पेन्सिल वा चारकोलची, कुणाची जलरंगातील, तर कुणाचे ब्रशचे फटकारे आदी पाहणं, अनुभवणं हे खूपच आनंददायक आहे.
या महाग्रंथात ही व्यंगचित्रं वाटेल तशी छापलेली नाहीत. त्यामागे एक निश्चित असा संपादकीय दृष्टिकोन व शिस्त आहे. एक कलात्मकता आहे. आणि मुख्य म्हणजे काळाचं भान आहे. त्यासाठी त्यांनी प्रत्येकी दहा वर्षांचा कालखंड निवडला आहे आणि या काळात छापलेल्या व्यंगचित्रांचा एकेक विभाग तयार केला आहे. या ग्रंथात प्रत्येक दशकाच्या सुरुवातीला एका जाणकार लेखकाचा त्यातल्या एकूण व्यंगचित्रांचा आढावा घेणारा लेख दिलेला आहे. त्याचप्रमाणे मधूनमधून ‘न्यू यॉर्कर’च्या शेकडो व्यंगचित्रकारांपैकी ज्यांनी खरोखरच वेगळेपणामुळे आपला ठसा उमटवलेला आहे अशा निवडक व्यंगचित्रकारांविषयीचे हृद्य लेखही समाविष्ट आहेत.
डेव्हिड रेमनिक यांनी या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली आहे. त्यांनी काही मजेदार आठवणी सांगितल्या आहेत. ‘न्यू यॉर्कर’चे संस्थापक-संपादक हेरॉल्ड रॉस हे दर मंगळवारी दुपारी ‘आर्ट मीटिंग’ घ्यायचे. हाती असलेल्या शेकडो ‘रफ’ व्यंगचित्रांविषयी सविस्तर चर्चा, चिरफाड वगैरे व्हायची. (प्रत्येक आठवडय़ाला व्यंगचित्रांविषयी चर्चा म्हटल्यावर आपल्या इथल्या सध्या छपाई माध्यमात संपादकीय विभागात काम करणाऱ्या अनेकांना या विचारानेच भोवळ आल्याशिवाय राहणार नाही!) काही व्यंगचित्रांमध्ये सुधारणा करायला हवी, याबद्दलची चर्चा करण्याबरोबरच त्यांत काय सुधारणा करता येईल, याच्या सूचनाही असायच्या. यातल्या काही मान्यवर व्यंगचित्रकारांना लिहिलेल्या चिठ्ठय़ा आजही ‘न्यू यॉर्कर’च्या अर्काइव्हज्मध्ये आहेत. बरेच व्यंगचित्रकार यामुळे नाराज व्हायचे. त्यांची चिडचीड व्हायची. ते उद्विग्न होऊन वाद घालायचे. पण हे सारं व्यंगचित्रकलेच्या भल्यासाठी चाललंय, ही भावना दोघांच्याही मनात असल्याने त्यांचा एकमेकांविषयीचा आदर कायम राहिला, हे महत्त्वाचं.
खरं तर या पुस्तकावर आणि त्यातल्या व्यंगचित्रांवर व व्यंगचित्रकारांवर सविस्तर लिहायचं म्हटलं तर एक स्वतंत्र पुस्तकच तयार होईल. असो. या पुस्तकाच्या पहिल्या दशकात म्हणजे १९२५-३४ यादरम्यानच्या dwi89व्यंगचित्रांकडे नजर टाकत असताना काही विलक्षण गोष्टी लक्षात आल्या. व्यंगचित्रांतून तत्कालीन सामाजिक स्थितीचं दर्शन घडत असतं याचा नव्याने साक्षात्कार झाला.
रॉजर अँजेल हे ‘न्यू यॉर्कर’चे कथा-संपादक. त्यांनी या पहिल्या दशकाबद्दल प्रस्तावना लिहिली आहे. रॉजर यांची आई ‘न्यू यॉर्कर’मध्ये संपादकीय विभागात काम करत असे. काही काम ती घरी आणत असल्याने रॉजरना वयाच्या पाचव्या वर्षांपासूनच व्यंगचित्रं बघायची सवय लागली आणि त्यात रस निर्माण झाला. पुढे काही वर्षांनंतर एकदा वडिलांशी बोलताना त्यांनी ‘न्यू यॉर्कर’मधल्या जवळपास सगळ्या व्यंगचित्रांच्या कॅप्शन्स आपल्याला माहीत असल्याचं त्यांना सांगितलं आणि ते सिद्धही करून दाखवलं.
रॉजर लहान असतानाच न्यूयॉर्क शहराने आपले रूप पालटायला सुरुवात केली होती. अक्षरश: दहा-पंधरा वर्षांत या शहराचा संपूर्ण चेहरामोहरा बदलून गेला. एम्पायर स्टेट बिल्डिंगसारख्या अतिउंच इमारती उभ्या राहिल्या. रस्ते मोठे झाले. अनेक मोठे पूल, सबवेसाठी सगळीकडे खणणं सुरू झालं. आणि शहरातल्या नागरिकांच्या एकूणच जीवनशैलीत कमालीचा बदल घडला.
या बदलांचं चित्रण साहित्यातून, कलेतून होणं अपेक्षित असतं. त्यातही व्यंगचित्रकार हे असले बदल झटकन् टिपतो अन् त्यावर परखड भाष्यही करतो. अर्थातच चित्रातील विनोदाच्या साहाय्यानेच! ‘न्यू यॉर्कर’च्या अनेक व्यंगचित्रकारांनी हे बदल अनेक अंगांनी टिपले. उंच इमारती, क्रेन्स, लोखंडी अवजड तुळया, खोल खड्डे, असंख्य कामगार हे सारं चित्रांतून प्रकटू लागलं. त्यापूर्वी असं कधीही झालेलं नव्हतं. नेहमी चार-पाच मजली इमारती पाहणारे आणि त्यांत राहणारे लोक अचानक चाळीस-पन्नास मजली इमारतींत जाऊन राहू लागले. आजूबाजूच्या खेडय़ांतून, बकाल वस्त्यांतून लोक शहरातल्या नव्या उंच उंच इमारतींत येऊन राहू लागले. या साऱ्यांचंच आयुष्य आमूलाग्रपणे बदललं. या उंच इमारतींची सुरुवातीला कुणालाही भीतीच वाटेल! ही भीतीच खरं तर व्यंगचित्रकारांना चित्र रेखाटण्यास प्रवृत्त करते.
आपल्याकडे मुंबईत नरिमन पॉइंट येथे बॅकबे योजना सत्तरच्या आसपास राबविली गेली. त्या काळात तिथे अचानक अशा उंचच उंच इमारती दाटीवाटीने उभ्या राहू लागल्या. त्याचं अत्यंत प्रभावी व्यंगचित्रण ज्येष्ठ व्यंगचित्रकार वसंत सरवटे यांनी केलंय. ‘न्यू यॉर्कर’मधील व्यंगचित्रं पाहताना सरवटेंच्या या चित्रमालिकेची प्रकर्षांने आठवण वाचकांना (त्यांनी ती पाहिली असल्यास) येईल. पण ‘बॅकबे’मधल्या इमारती या प्रामुख्याने कार्यालयांसाठी होत्या व आहेत. त्यानंतर गेल्या दहा वर्षांत- आणि त्यातही गेल्या पाच वर्षांत मुंबईचा नकाशा, चेहरा, उंची हे पूर्णपणे बदलत चाललंय. आजघडीला मुंबईतील साठ-सत्तर मजली उत्तुंग इमारतींची संख्या हजारभर तरी झाली असावी. तसेच आणखीन हजारभर तरी इमारतींची कामे सुरू आहेत. यातल्या बहुतेक इमारती या निवासी आहेत. त्यात राहणाऱ्यांची जीवनशैली ही दहा-पंधरा वर्षांपूर्वीच्या मुंबईच्या dwi87जीवनशैलीपेक्षा संपूर्णत: भिन्न आहे. या सगळ्या बदलांचं चित्रण किमान व्यंगचित्रकलेत तरी होणं अपेक्षित आहे. पण ‘न्यू यॉर्कर’च्या व्यंगचित्रकारांनी जी सर्जनशीलता ऐंशी वर्षांपूर्वी दाखविली, तशी इथे कधी निर्माण होईल की नाही, शंकाच आहे. अर्थात ही अपेक्षा चुकीचीच आहे. कारण त्यासाठी कलाकारांमध्ये सर्वच पातळ्यांवरची संवेदनशीलता असावी लागते. असो.
आता थोडं या व्यंगचित्रांविषयी.. या सर्व व्यंगचित्रांतील विचारांतला आणि रेखाटनातला पस्र्पेक्टिव्ह पाहण्यासारखा आहे. एखाद्या उंच इमारतीमध्ये नोकरी करणं म्हणजे आपण कोणीतरी श्रेष्ठ आहोत, अशी भावना अनेकांच्या मनात असते. तसाच काहीसा प्रकार हा ‘वॉलस्ट्रीट’वरच्या इमारतीच्या काचा पुसणाऱ्याच्या बाबतीत झालेला दिसतोय. एका चित्रात क्रेनने वरच्या मजल्यावरच्या कामगार मित्राला सॅण्डविच पाठविणारा कामगार दिसतोय. दुसऱ्या एका चित्रात उंचच उंच इमारतींमुळे हल्ली इथे लवकर अंधार पडतो, असं संभाषण आहे. या चित्रातील रेखाटन पाहण्यासारखं आहे. शेडिंगमुळे वातावरण झाकोळले गेले आहे आणि घडय़ाळात मात्र दुपारचे साडेतीन वाजलेले दाखवलेत.
एका चित्रात तर अशा उंच इमारतीत मुलांना खेळायला जागाच नसल्याने मुलं स्वत:च एक खेळ शोधून काढतात. त्यातला हा मुलगा खिडकीतून बाहेर पडून हॉटेलच्या जाहिरातीच्या अक्षरांवर खाली-वर चढ-उतर करण्याची उचापत करतोय. त्याची आईसुद्धा त्याला फक्त इतकंच सांगतेय, की ‘डब्ल्यू’ या अक्षरांच्या पुढे जाऊ नकोस. (कारण पुढे आधारासाठी काहीच नाहीए!) अत्यंत भीती वाटावी असं हे व्यंगचित्र आहे. शहरीकरण आणि व्यापारीकरणामुळे लहान मुलं आणि त्यांचं भावविश्व वगैरेकडे कसं दुर्लक्ष होतं, याचंच हे चित्रण आहे. उंच इमारतीत आकाशाच्या जवळ राहणारे लोक सहसा जमिनीवरच्या लोकांकडे तुच्छतेने पाहतात.. त्याचं वर्णन एका चित्रात आहे. त्यात खाली फूटपाथवरचा कचरा अजून कसा उचललेला नाही, याबद्दल एक उच्चपदस्थ कुरकुर करतोय!
शहराचं हे जे मेकओव्हर सुरू असतं त्यात असंख्य कामं सुरू असतात. रस्ते खणलेले असतात. बांधकाम साहित्य पडलेलं असतं. क्रेन्स, ट्रक्स, कामगार यांची गर्दी असते. एक चारमजली ओळखीची इमारत dwi91जमीनदोस्त होते आणि तिथे वर्षभरात ४० मजली टॉवर येतो आणि त्या परिसराची ओळखच बदलून जाते. एका चित्रात असाच एक वैतागलेला सामान्य माणूस अधिकाऱ्याला विचारतो, ‘इथला रस्ता तुम्ही कुठे हलवलाय?’
आपल्याला मिळालेलं घर किती छान आहे, हे कुटुंबीयांना पटवून देणारा जुना अमेरिकन गृहस्थ (पाहा- डोक्यावर हॅट, तोंडात चिरूट!) पन्नासाव्या मजल्यावरून खालच्या एका छोटय़ा झाडाबद्दल फुशारकी मारून सांगतोय, ‘सगळ्याच इमारतींना हे असं झाड समोर असण्याचं भाग्य नाहीये बरं का!!’
अती उंचीमुळे दडपून जायला होतं म्हणजे नेमकं काय, हे या चित्रामुळे कळतं. स्वत:च निर्माण केलेल्या भव्य इमारतींपुढे माणूस स्वत:च किती क्षुद्र होऊन जातो, याचं यथार्थ वर्णन यात आहे.
एका उंच इमारतीतून दुसऱ्या उंच इमारतीकडे (स्पर्धा!) दुर्बिणीतून पाहून तिथे त्यांना चौपन्नाव्या मजल्यावर भाडेकरूच मिळालेला नाहीये, हे आनंदाने सांगणाराही एका चित्रात दिसतो.
त्याचबरोबर अशाच एका अतिउंच इमारतीला आग लागली असता वाचवायला गेलेल्या फायरब्रिगेडच्या जवानाकडे ‘माझ्या मित्रानेच येऊन मला सोडवावं,’ अशी विलक्षण मागणी करणारी स्त्री एका चित्रात दिसतेय. या चित्राचं रेखाटन पाहण्यासारखं आहे. जमिनीवर पाण्याच्या पाइप्सचा गुंता, अग्निशमन दलाची लगबग, राखाडी रंगाच्या धुराचे लोट, पाण्याचे जोरकस फवारे आणि यांना छेद देऊन जाणारी उंच शिडी,
धुरांमधून अर्धवट दिसणारी इमारत, त्याच्या टोकावरचा अधिकारी, अन् धाडसी मागणी करणारी ती प्रेयसी! सारंच विलक्षण!!
उंच उंच इमारतींचं बांधकाम हाही विषय खूप आकर्षकरीत्या यात हाताळला गेलाय. इतरांच्या तुलनेत एखादा कामगार काही वेळेस मागे पडतो. त्याला ‘वॉर्निग’ देणारं हे चित्र अतिशयोक्ती अलंकाराचं उत्तम उदाहरण आहे.
उंचच उंच इमारतींचं शहर हे स्वाभाविकपणे निसर्गापासून दूर जातं. या चित्रातला गृहस्थ बाल्कनीतल्या कुंडीतल्या छोटय़ा झाडाकडे पाहून उद्गारतो, ‘अरे! पानगळ सुरू झाली वाटतं!!’ अत्यंत विदारक सत्य सांगणारं हे चित्र आहे.
या पुस्तकातील सर्वच चित्रं प्रभावी आहेत. जागेअभावी सर्वाबद्दल लिहिता येणं शक्य नाही, म्हणून त्यातल्या काही चित्रांचा भावार्थ सांगतोय. एका चित्रात उंच इमारतीच्या गच्चीत दोन मित्रांमधल्या संवादात एक मित्र म्हणतो, ‘कधी कधी मला वाटतं, जाऊन म्हाताऱ्या आई-वडिलांना भेटावं! याच इमारतीत चौथ्या मजल्यावर राहतात ते!!’
टॉवर संस्कृतीमुळे विचारसंस्कृती कशी बदलते, याचं चित्रण दुसऱ्या एका चित्रात केलंय. त्यात एक मुलगी तिच्या मैत्रिणीकडे आपल्या उंच इमारतीत राहण्याचं समर्थन करते. ती म्हणते, ‘होय. आम्ही आता पंधराव्या मजल्यावर राहायला आलोय. आईला खेडय़ात मरायचं नव्हतं!!’ (शब्दश: अर्थ : खेडय़ात दफन होण्याची dwi88तिची इच्छा नव्हती!) खाली खेळायला गेलेल्या मुलांना त्यांची आई हाक मारताना म्हणते, ‘आता वर या आणि तुमचा सूर्यप्रकाश घ्या!’
‘दि न्यू यॉर्कर’च्या एका छोटय़ा कालखंडातल्या अनेकांपैकी या एका विषयावरच्या या व्यंगचित्रांनी माझं लक्ष वेधून घेतलं. ती पाहतानासुद्धा माझी चांगलीच आनंददायी दमछाक झाली.
‘दहा वर्षे सतत ‘न्यू यॉर्कर’ वाचणं म्हणजे तुम्ही केंब्रिज किंवा हार्वर्ड विद्यापीठातून डॉक्टरेट केल्यासारखंच आहे,’ असं माझ्या एका जाणकार मित्राचं मत आहे. माझ्या मते, या महाग्रंथातील ६८,६४७ व्यंगचित्रं पाहिली तरी व्यंगचित्रांच्या बाबतीत मास्टर्स डिग्री मिळवल्याचं समाधान प्रत्येकाला मिळेल.
न्यूयॉर्कमधल्या इमारतींच्या उंचीची स्पर्धा करणं आपल्याला आता १०० वर्षांनंतर हळूहळू जमू लागलंय! पण ‘न्यू यॉर्कर’मधल्या व्यंगचित्रांची उंची गाठण्यासाठी आपल्याला किती शतकं लागतील, कुणास ठाऊक!!

Ayodhya Ram Mandir Tourism
विश्लेषण: अयोध्येचे राम मंदिर ठरले ‘गेम चेंजर’, भाविकांमध्ये ५०० पटींनी वाढ; का वाजतोय धार्मिक पर्यटनाचा देशभरात डंका?
Kalakaran multifaceted history of art Venice Biennale Occidental Art History
कलाकारण: त्यांच्या भाषेत, त्यांच्या भूमीवर..
documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
Loksatta editorial indian Ambassador Akhilesh Mishra has slammed an Irish Newspaper for publishing an editorial on PM Narendra Modi
अग्रलेख: आजचा मुत्सद्दी, उद्याचा मंत्री?

(सर्व व्यंगचित्रं ‘दि कम्प्लीट कार्टुन्स ऑफ दि न्यू यॉर्कर’ या ग्रंथातून साभार. प्रकाशक- ब्लॅक डॉग अँड लेवेंथेल पब्लिशर्स, न्यूयॉर्क, कॉपीराइट- अॅडव्हान्स मॅगेझिन पब्लिशर्स इन्क.)