04 December 2020

News Flash

इसवी सन पूर्व १००० ते २०२०: जाणून घ्या ३००० हून अधिक वर्षांचा इतिहास असणाऱ्या छत्रीचा प्रवास

पुण्याजवळ काल्र्याच्या लेण्यांतील लाकडी छत्र हे दोन हजार वर्षांपूर्वीचे

प्रातिनिधिक फोटो

खूप खूप शतकांपूर्वी सीरिया, इजिप्त, रशिया, भारत व चीन या देशांत छत्र्या वापरण्यास सुरुवात झाली. उन्हापासून संरक्षण होण्यासाठी छत्रीचा वापर होत असे. महाभारतातही छत्रीचा उल्लेख आहे. ख्रिस्तपूर्व १००० वर्षांच्या काळातही चीनमध्ये छत्री परिचित होती, याचे उल्लेख मिळतात. मात्र छत्रीचा शोध कोणी लावला, हे खात्रीपूर्वक सांगता येत नाही.

राजांपासून ते समान्यांपर्यंत

पांढरी शुभ्र छत्री मस्तकावर धरण्याचा अधिकार फक्त राजांचाच होता. इतर लोक विविध रंगांपैकी कोणत्याही रंगाची छत्री वापरीत. अशा छत्र्या राजा स्वत: घेऊन फिरत नसे. छत्र सेवकांच्या हाती असे. पूर्वीच्या काळात हे छत्र अधिकार व सत्ता यांचे प्रतीक म्हणून गणले जात असे. आफ्रिकेतील अनेक भागांत आजही छत्री ही शक्ती व अधिकार यांचे प्रतीक म्हणून गणली जात असे. शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर छत्रपती ही उपाधी ग्रहण केली होती, हे तुम्हाला माहीत असेलच. या छत्रपतीचा शब्दश: अर्थ ‘छत्रीचा स्वामी’ असा आहे. युरोपमध्ये छत्रीचा वापर होऊ लागला, तो उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणूनच. तिथे तिला ‘पॅरासॉल’ किंवा ‘सन शेड’ असे म्हणत असत. मध्य युगात युरोपातून छत्री जवळजवळ अदृश्यच झाली होती. त्यानंतर सोळाव्या शतकात प्रथम इटलीत छत्रीचे पुनरुज्जीवन झाले.

लंडनमध्ये छत्री वापरणार पहिला माणूस

इंग्लंडमध्ये छत्री वापरणारा पहिला माणूस जोनास हॅनवे हा होय. त्याने १८ व्या शतकाच्या उत्तरार्धात छत्री हाती घेऊन फिरायला सुरुवात केली. लोकांना गंमत वाटे व त्याची छत्री पाहण्यासाठी मुले उभी राहत असत. १९ व्या शतकाच्या मध्यापासून छत्री हे युरोपियन महिलांच्या वेशभूषेचे एक अंगच बनले. श्रीमंत स्त्रिया छत्री (पॅरासॉल) हातात घेतल्याशिवाय बाहेर जात नसत. मोटारींचा वापर सुरू होईपर्यंत ही प्रथा होती.

बांबूच्या छत्र्या

थायलंडमध्ये बांबूंच्या माडय़ांच्या सांगाडय़ावर कागद चिकटवून छत्र्या तयार केल्या जातात. या छत्र्यांना वरून वार्निशचा थर दिला जातो. केरळ व कर्नाटकाच्या किनारपट्टीच्या भागात आजही माडाच्या झावळ्यांपासून छत्र्या बनविल्या जातात. मात्र या माडाच्या छत्र्या आपण सर्रास वापरतो त्या छत्र्यांसारखी घडी घालून बंद करता येत नाहीत. कालांतराने छत्री बदलत गेली. पावसाळा सुरू झाला की संरक्षण करणाऱ्या छत्रीला आपण लगेच शोधून ठेवतो. किंवा बाजारातून विकत आणतो. पेन, रुमाल यांसारखी छत्रीही एक विसरण्याची वस्तू, पण तरीही आपण ती खरेदी करतोच.

महत्व खास

‘छत्र’ हा ऐतिहासिक शब्द. छत्र म्हणजे काय? तर पूर्वी राज्यकर्ते, मानकरी, अमीर-उमराव यांची वापरण्याची एक मौल्यवान गोष्ट! ‘छत्री’ हा प्रकार आपल्याला देशोदेशी पाहायला मिळतो. दिल्लीचा सुलतान दूरच्या सफरीवर जाताना सात छत्र्यांच्या छायेत बाहेर पडत असे. इजिप्तमधील शिल्पांतही छत्र्या सापडतात. त्या साध्यासुध्या नव्हेत, तर अलंकारजडित, वेगवेगळ्या रंगांच्या असायच्या. राजदंड, मुकुट, तलवार यांना जसे महत्त्व, तसे छत्रालाही विशेष महत्त्व असे. म्हणूनच मराठय़ांच्या राजाला ‘छत्रपती’ असे संबोधत असत. पूर्वी छत्री ही मानमरातब, प्रतिष्ठेची मानली जाई. ईस्ट इंडिया कंपनीने तर कंपनीच्या कोणत्या अधिकाऱ्याने छत्री वापरायची, कुणी नाही, याविषयी नियम केले होते. छत्री हे ‘खास अधिकार’ असल्याचे एक प्रतीक होते. कोलकात्याचा बिशप शहरात आल्यावर त्याच्या पालखीवर लाल छत्री धरली जाई.

छत्र आणि छत्री

छत्री एक आसरा मानला गेला आहे. धर्मगुरूंचे आसन, प्रवेशद्वार, सिंहासन, महत्त्वाच्या सभा, संमेलनाच्या जागा यांच्यावरच्या छताचा आकार हा छत्रीप्रमाणे असे. पुण्याजवळ काल्र्याच्या लेण्यांतील लाकडी छत्र हे दोन हजार वर्षांपूर्वीचे असल्याचे सांगितले जाते. आजही देवीच्या पालखीवर छत्र धरले जाते. युरोपमधील छत्रीचा इतिहास पाहता चित्रकलेत या छत्र्या अनेक ठिकाणी दिसतात. १७ व्या शतकात तर छत्री वापरणे ही फॅशन झाली, पण येथे एक सांगायला हवे की, या वेळी फक्त स्त्रियाच छत्र्या वापरत असत. चुकून जरी पुरुषाने छत्री वापरली तरी त्याला सर्वजण हसत असत.

…अन् छत्री रोजच्या जीवनाचा भाग झाली

आपल्याकडे छत्र्या वापरणे हे कमीच होते. छत्रीऐवजी पोत्याची खोळ करून वापरणे, प्लास्टिकचे पोते डोक्यावरून घेऊन पायापर्यंत सोडणे हे होते, पण थोडय़ा कालावधीत शहरात छत्र्या आल्या. लेडीज, जेंटस्, किडस् अशी वर्गवारी होऊ लागली. खेडय़ातही छत्र्यांचे लोण पसरले. या सर्वाबरोबर मिनीचा जमाना असल्याने छत्री मोठी आठ आकडय़ाचा दांडा असलेली ते टू फोल्डर, थ्री फोल्डर होत गेली. पण आकार कमी होत गेल्याने, छत्रीच्या वापराने वृद्धांना हातात धरायची काठी घ्यावी लागत नसे, कुत्र्यांना दम दाखवायला छत्री उपयोगी पडत असे, असे अनेक छोटे-छोटे उपयोग कमी होत गेले. पण बदलत्या परिस्थितीत छत्रवरून छत्री मानवाने स्वीकारली तशी मिनी साइजही स्वीकारली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 17, 2020 6:32 pm

Web Title: history of umbrella scsg 91
Next Stories
1 तुमच्या जवळचं करोना चाचणी केंद्र कुठे आहे?; सांगणार गुगलचे ‘हे’ खास फिचर
2 खंडग्रास आणि कंकणाकृती ग्रहण म्हणजे काय?
3 आत्महत्येचे विचार मनात का येतात?, आपण एखाद्याला आत्महत्या करण्यापासून थांबवू शकतो का?
Just Now!
X