Hanuman Jayanti 2024 : ‘नावात काय आहे’ हे शेक्सपिअरचे जगप्रसिद्ध वाक्य आपण नेहमीच ऐकत आलेलो आहोत. मात्र एकाद्या व्यक्तीच्या, ठिकाणच्या, देशाच्या नावावरूनच आपण त्यांची ओळख पटवून घेतो; आपली ओळख पटवून देतो. अनेकदा आपण एखाद्या व्यक्तीला आपले नाव सांगितले की समोरची व्यक्ती कुतूहलाने, “या नावाचा अर्थ काय आहे?” असा एक प्रश्न करते. तुमच्याबरोबरदेखील असे झाले आहे का?

म्हणजेच काय, तर केवळ नावातच नव्हे तर ते नाव का ठेवले, त्याचा अर्थ काय, त्याचे काही खास कारण आहे का? अशा गोष्टीसुद्धा अनेकांच्या मनात कुतूहल निर्माण करतात. पण, आज नाव आणि त्याबद्दल एवढी चर्चा का? तर याचे कारण म्हणजे पुण्यातील काही सुप्रसिद्ध मंदिरे. अनेक जणांनी पुण्यातील रंजक नावं असलेल्या गणपती मंदिरांबद्दल ऐकले असले. त्यामध्ये काही निवडक नावे सांगायची झाली तर, ‘मोदी गणपती’, ‘माती गणपती’, ‘फडके / फडके हौद गणपती’, ‘हत्ती गणपती’ अशी काही मंदिरे आहेत. आज हनुमान जयंतीनिमित्त पुण्यातील प्रसिद्ध मारुती मंदिरांच्या नावामागची रंजक माहिती जाणून घेणार आहोत.

who is sanjay verma
राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्त करण्यात आलेले संजय वर्मा कोण आहेत? जाणून घ्या…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
brothers beaten up, Dombivli Kachore,
डोंबिवली कचोरे येथे पेटलेला सुतळी बॉम्ब अंगावर फेकण्याच्या वादातून दोन भावांना मारहाण
Akshay Kumar And Shreyas Talpade
“पहिल्या दिवसापासून त्याने मला…”, श्रेयस तळपदेने सांगितला अक्षय कुमारबरोबर काम करण्याचा किस्सा; म्हणाला…
prithvik pratap and prajakta lovestory
प्रसाद खांडेकरच्या नाटकामुळे झालेली पहिली भेट अन्…; ‘अशी’ जमली पृथ्वीक प्रताप अन् प्राजक्ताची जोडी! खूपच हटके आहे लव्हस्टोरी
anand dighe s image used by mahayuti
महायुतीच्या प्रचारपत्रकावर आनंद दिघे यांची प्रतिमा
Sangli, Miraj, Women Representative Miraj,
सांगली, मिरजेच्या रणांगणात ‘लाडक्या बहिणी’ची चर्चा ! रिंगणातून बाजूला करण्याचे प्रयत्न
atharvaveda bhumi suktam
भूगोलाचा इतिहास: वसुंधरेच्या कायापालटाची कहाणी

या मारुती मंदिरांना त्यांची खास आणि विचित्र अशी नावे का पडली? त्या नावांमागे काही खास इतिहास आहे का? की, त्या काळच्या स्थानिक गोष्टींमुळे तेथील मारुती मंदिरांना त्यांची नावे मिळाली? अशी सर्व रंजक माहिती आपण आज पाहू. चला तर मग हनुमान जयंतीनिमित्त आपल्या लाडक्या मारुतीरायाच्या पुण्यातील सुप्रसिद्ध मंदिरांची सुंदर माहिती जाणून घेऊ.

हेही वाचा : हडप्पा संस्कृतीमध्ये झाला का वांग्याच्या भाजीचा उदय? वाचा शेफ कुणाल कपूरने दिलेली माहिती….

१. जिलब्या मारुती

जेवणाची पंगत असो वा आपल्या लाडक्या बजरंगबलीची माहिती, सुरुवात ही ‘जिलब्यां’नीच झाली पाहिजे, नाही का? पुण्यात शनिपारावरून, मंडईच्या दिशेने प्रवास करताना ‘जिलब्या मारुती’ हे मारुतीचे मंदिर चांगलेच प्रसिद्ध आहे. अर्थात, हे नाव ऐकताच या मंदिराचे नामकरण असे का केले असेल याचा अनेकांनी अंदाज लावला असेलच. खरंतर या मारुती मंदिराजवळ एका हलवायचे दुकान होते. त्या दुकानाचा मालक हा दररोज, पहिल्या तयार झालेल्या जिलब्यांचा हार या मारुतीला अगदी श्रद्धेने अर्पण करायचा, त्यामुळेच या मारुतीचे नाव ‘जिलब्या मारुती’ असे पडले. मात्र, हे या मंदिराचे मूळ नाव नसून पूर्वी जिलब्या मारुती हे ‘विसावा मारुती’ म्हणून ओळखले जायचे.

परंतु, तुम्हाला जिलब्या मारुतीचे नाव ‘विसावा मारुती’ का होते हे माहीत आहे का? तर पुण्यातील, सध्या जिथे असंख्य वाहने भरधाव वेगात धावत आहेत, अशा पर्वती पायथा ते ओंकारेश्वर मंदिराजवळील असेल्या मुळा-मुठा नदीला जोडणारा ‘आंबील ओढा’ साधारण २०० ते २५० वर्षांपूर्वी वाहत असे. सध्याचे जिलब्या मारुती मंदिर जिथे स्थित आहे, तिथे जवळ पूर्वी एक स्मशानभूमी होती. मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्याआधी व्यक्तीच्या पार्थिवाला काही क्षण ‘विसावा’ देण्यासाठी तिथे असेल्या मारुती मंदिरापाशी ठेवले जायचे. म्हणून त्या जागेला पूर्वी ‘विसावा मारुती’ असे नाव होते.

२. डुल्या मारुती

गणेश पेठेत स्थित असलेल्या डुल्या मारुती मंदिराचा आणि पानिपतच्या युद्धाचा एकमेकांशी फार जवळचा संबंध असल्याचे लोकसत्ताच्या ‘गोष्ट पुण्याची’ या यूट्यूब मालिकेमधील एका व्हिडीओमध्ये सांगितले गेले आहे. खरंतर या युद्धामुळेच पुण्यातील प्रसिद्ध मारुती मंदिराला त्याचे नाव मिळाले असे म्हटले तरीही हरकत नाही. पानिपतचे तिसरे युद्ध हे ‘१४ जानेवारी १७६१’ रोजी सदाशिवराव पेशवे आणि अहमदशाह अब्दाली यांमध्ये झाले होते.

इ. स. १६८० रोजी, ‘नारो अनंत नातू’ यांनी गणेश पेठेतील या मंदिराची स्थापना केली होती. मात्र, १७६१ साली जेव्हा पानिपतच्या युद्धात सदाशिवराव पेशवे यांचा पराभव झाला तेव्हा अचानक मंदिरातील मारुती डुलू लागला. इतकेच नाही तर मारुतीच्या मूर्तीतून चक्क घामाच्या धारा वाहत असल्याचेदेखील तेथील नागरिकांनी पाहिले. हा सर्व चमत्कारिक प्रकार पाहिल्यानंतर, डुलणाऱ्या त्या मारुतीचे नाव तेथील स्थानिकांनी ‘डुल्या मारुती’ असे ठेवले.

डुल्या मारुती मंदिरातील मारुतीची मूर्ती ही साधारण अडीच ते तीन फूट उंच आणि अखंड पाषाणातील आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात मारुतीसह शनिदेव आणि इतर देवी-देवतांच्या पाषाणमूर्तीदेखील आहेत.

हेही वाचा : AI Animal Talk : AI सांगणार प्राण्यांच्या मनात काय चाललंय?, त्यामुळे डॉक्टरांना कशी होईल मदत? जाणून घ्या…

३. भिकारदास मारुती

काही मंदिरांची नावे ठेवण्यामागे केवळ मंदिर बांधणारी व्यक्ती कारणीभूत असते. तसेच या ‘भिकारदास मारुती’ मंदिराचे आहे. या नावामागे डुल्या मारुतीसारखा इतिहास नाही किंवा जिलब्या मारुतीसारखी काही खास गोष्ट नाही. सध्याच्या सदाशिव पेठेतील आणि महाराणा प्रताप उद्यानाजवळ असलेल्या या भिकारदास मारुती मंदिराची स्थापना साधारण दीडशे ते दोनशे वर्षांपूर्वी करण्यात आली होती. या मंदिराची स्थापना ही गुजराती नागर समाजातील ‘भिकारदास सराफ’ यांनी केली होती. साधारण १८१८ च्या सुमारास या परिसरात माळी लोकांची मोठी वस्ती होती. त्याच वस्तीच्या बरोबर मध्यभागी भिकारदास सराफांचा भलामोठा बांगला होता. ती सधन व्यक्ती कायम गोर-गरिबांना, साधू-संतांना मदत करायची. त्यांना अन्नदान करीत असे, त्यामुळे भिकारदास सराफ ही व्यक्ती लोकांमध्ये प्रसिद्ध होती. म्हणूनच भिकारदास सराफांनी बांधलेल्या मंदिराला भिकारदास मारुती असे नाव देण्यात आले. ‘भिकारदासी याचे बागेत हनुमंत’ असा १८१० साली उल्लेख असल्याचे ‘नावामागे काय दडलंय?’ या पुस्तकात सांगितले आहे.

मंदिरातील मारुतीची मूर्ती ही उभी असून, त्याची उंची ही साधारण तीन ते साडेतीन फूट अशी आहे. इतकेच नाही, तर याच भिकारदास मारुती मंदिरात भारतातील एकमेव असे नारदमुनींचेदेखील मंदिर उभारले आहे.

४. सोन्या मारुती

सोन्या मारुती हे पुण्यातील रविवार पेठ आणि बुधवार पेठेतील अनेक सोन्या-चांदीच्या दुकानांच्या भागात स्थित असल्याने या मंदिराचे ‘सोन्या मारुती’ असे नाव प्रसिद्ध आहे. मात्र, या मंदिराच्या नावापेक्षा त्या मंदिराशी संबंधित असलेल्या इतिहासामुळे हे ‘सोन्या मारुती’ मंदिर खास ठरते. खरंतर सोन्या मारुतीचा इतिहास हा त्या काळचा तसेच आत्तादेखील नाजूक विषयांमध्ये मोडतो. याचे कारण म्हणजे, पुणे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट यांनी १९३७ मध्ये दिलेला एक आदेश. डॉ. शां. ग. महाजन यांच्या ‘पुणे शहरातील मंदिरे’ यांमधील एका संदर्भानुसार, ‘२४ एप्रिल ते १५ मे १९३७ पर्यंतच्या काळात, तांबोळी मशिदीच्या परिसरात कोणीही, कोणत्याही प्रकारचे वाद्य वाजवू नये.’ असा एक आदेश जारी केला होता. मुस्लीम बांधवांना नमाज पठण करताना कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये, असा या आदेशामागील उद्देश होता. अर्थातच, या आदेशाचा कुणीही स्वीकार केला नाही, उलट आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी अनेक नागरिक एकत्र येऊन ‘सोन्या मारुती’ मंदिरातील घंटा वाजवून आदेशाविरुद्ध उभे राहिले.

या आंदोलनामुळे त्याकाळी अनेकांना तुरुंगातदेखील टाकण्यात आले होते. इतकेच नाही तर या आदेशाला विरोध दर्शवण्यासाठी त्याकाळचे प्रसिद्ध नेते आणि वकील, ‘लक्ष्मण भोपटकर’ यांनीसुद्धा या आंदोलनात सहभाग घेतला होता; तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक, डॉक्टर हेगडेवार हेदेखील त्या काळात पुण्यामध्ये एका परिषदेसाठी आले असता, त्यांनी १३ मे १९३७ रोजी सोन्या मारुती मंदिरातील घंटा वाजवून आपला विरोध आणि नाराजी व्यक्त केली होती. यासाठी त्यांना त्याकाळी २५ रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याची माहितीही लोकसत्ताच्या ‘गोष्ट पुण्याची’ या यूट्यूब मालिकेतून सांगण्यात आली आहे.

हेही वाचा : मला आई व्हायचंय… म्हणणाऱ्या शुभांगी गलांडेच्या ‘या’ धाडसी निर्णयाचे सोशल मीडियावर कौतुक; पाहा…

वरील मंदिरांव्यतिरिक्त पुण्यामध्ये पत्र्या मारुती, बटाट्या मारुती, भांग्या मारुती, गावकोस मारुती यांसारखी अनेक तर्‍हेवाईक नावाची मारुतीची मंदिरे प्रचंड प्रसिद्ध आहेत. एखादे मंदिर किंवा कोणत्याही प्रसिद्ध जागेला त्याला दिलेले ठराविक असे नाव का दिले गेले असेल, याचा आपण फार विचार करत नाही. मात्र, प्रत्येक शहरात अशा विविध आणि चित्रविचित्र नावाने अनेक जागा प्रसिद्ध असतातच. त्यामुळे आता तुम्ही जेव्हाही एखाद्या जागेचे असे विचित्र नाव ऐकाल, तेव्हा ‘नावात काय आहे?’ असे म्हणण्यापेक्षा ‘या नावामागे काय दडलंय?’ असा प्रश्न विचारून पाहा.. कदाचित तुम्हालाही एखादी रंजक माहिती किंवा कधी न ऐकलेला इतिहास ऐकायला मिळेल…

[संदर्भ – सुप्रसाद पुराणिक लिखित ‘नावामागे दडलंय काय?’ पुस्तक आणि लोकसत्ता यूट्यूब मालिका ‘गोष्ट पुण्याची’]