माझी सखी.. पल्सर

६ ऑक्टोबर २०११, विजयादशमीच्या मुहूर्तावर ती माझ्या जीवनात आली आणि लवकरच तिने माझ्या जीवनाचा ठाव घेतला. आता ती तर माझ्या जीवनाचा अविभाज्य भागच बनली आहे. अशी आहे माझी प्रिय सखी..बजाज पल्सर. त्याआधी मी मुंबईत स्कूटरवरच फिरायचो.
स्कूटरशी चांगलीच गट्टी जमली होती. जवळपास दहा-बारा र्वष मी स्कूटरवर फिरलो. त्यामुळे पायाच्या गीअरची बाइक आपल्याला जमेल का, अशी शंका यायची. अर्थात मित्रांच्या बाइक मी चालवल्या होत्या. तरीही कधी काळी चालवणे आणि सदासर्वकाळ चालवणे यात फरक असतो, म्हणून बाइकबद्दल मनात धाकधूक होती. त्यात मित्रांनी अनेक बाइकची नावे सांगितल्याने नेमकी कोणती घ्यावी यावर एकमतच होईना. अखेरीस भाचा चिन्मय याने सुचवलेली बजाज पल्सर-१३५ एलएस ही सर्व बाजूंनी चांगली वाटली. तिचा लुक आणि मायलेज मनात भरले. आणि नंतर तर आमची चांगलीच गट्टी जमली. गेल्या तीन वर्षांत मी माझ्या सखीसोबत तब्बल ३० हजार किमीचा प्रवास केला आहे. मला सगळे विचारतात स्कूटर आणि बाइक यांच्यात फरक काय, त्यावर मी गमतीने उत्तर देतो.. कालपर्यंत स्कूटरने आईसारखे सांभाळले, आता बाइक बायकोसारखी साथ देते आहे.    – मनीष कुलकर्णी, बोरिवली.


स्वप्न साकारले

मी नववीत असताना एकाला बुलेट चालवताना पाहिले. त्याच वेळी मी ठरवले की आपणही मोठे झाल्यावर बुलेटच घ्यायची. एवढी ती गाडी माझ्या मनात भरली होती. १८ वर्षांचा झाल्यावर मित्राची स्कूटर चालवायला शिकलो. त्यानंतर २४व्या वर्षी रेल्वेत नोकरीला लागलो. त्याचदरम्यान माझा एक मित्र बुलेट घेऊन कामानिमित्त माझ्याकडे आला. पुन्हा एकदा बुलेटचे स्वप्न डोळ्यांत तरळू लागले. मला बुलेट चालवायला जमेल का, अशी विचारणा मित्राकडे केली. त्यानेही मग बुलेट चालवण्याचे तंत्र समजावून सांगितले. इतर मोटरसायकलींपेक्षा बुलेटची रचना वेगळी होती, परंतु मला आवड असल्याने मी सर्व माहिती समजून घेत बुलेट चालवायला घेतली. मला खूप आनंद झाला. काही दिवसांनी मी मग जुनी मिलिटरी बुलेट विकत घेतली. बरीच वष्रे चालवली. नंतर आठ वर्षांपूर्वी मी ३५० सीसीची रॉयल एन्फिल्ड ही बुलेट विकत घेतली. त्या वेळी लहानपणीचे स्वप्न साकार झाल्याचा आनंद झाला होता. माझी बुलेट माझा जीव की प्राण आहे.
दिलीप वायंगणकर, ठाणे</p>