२०१५ हे वर्ष भारतीय ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी खूपच महत्त्वाचं वर्ष ठरणार आहे. गेल्या वर्षी डॅटसनसारख्या कंपनीने भारतात आपले पाय पसरले. त्यामुळे यंदा कोणती नवीन कंपनी भारतीय ऑटोमोबाइल क्षेत्रात आपलं स्थान निर्माण करणार, याची उत्सुकता आहेच. पण भारतात रुजलेल्या कंपन्याही आपल्या नव्या गाडय़ा बाजारात आणत आहेत..

टाटा बोल्ट
इंडिका, इंडिगो अशा गाडय़ांनंतर २०१४मध्ये टाटा कंपनीने झेस्ट ही सेडान प्रकारातील नवीन गाडी आणली. या गाडीच्या फीचर्समुळे ही गाडी लोकप्रिय झाली. आता टाटा कंपनी २०१५च्या सुरुवातीला टाटा बोल्ट ही नवीन गाडी भारतीय बाजारपेठेत आणत आहे. ही गाडी हॅचबॅक प्रकारातील आहे. भारतीय ग्राहकांना हॅचबॅक गाडय़ांचं आकर्षण जास्त आहे. याचं मुख्य कारण म्हणजे त्या किफायतशीर असतात, त्यांना पार्किंगसाठी लागणारी जागा कमी असते आणि त्यांचं मायलेज खूपच चांगलं आणि भारतीय खिशाला परवडणारं असतं. त्यामुळे टाटाच्या या नव्या बोल्ट गाडीकडून ग्राहकांना खूप अपेक्षा असतील. टाटाच्या हॅचबॅक गाडय़ांमध्ये इंडिका ही एकमेव गाडी आठवते. मात्र त्या गाडीपेक्षा ही गाडी नक्कीच आकर्षक असेल. ही गाडी १.२ लिटर पेट्रोल आणि १.३ लिटर डिझेल अशा दोन प्रकारच्या इंजिनांमध्ये उपलब्ध असेल. ही गाडी १९ ते २४ किलोमीटर प्रतिलिटर एवढा मायलेज देईल, असा दावा कंपनीने केला आहे. टाटाच्या इतर गाडय़ांच्या बाह्यरूपात आणि या गाडीच्या बाह्यरूपात फारसा फरक आढळणार नाही. तरीही हेडलाइट्स आणि ग्रिल या दोन्हींमध्ये थोडा फरक करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे मागील बाजू नवीन आय-२०च्या धर्तीवर बनवण्यात आली आहे. त्यामुळे ही गाडी नक्कीच आकर्षक दिसते. या गाडीची किंमत चार ते सहा लाख यादरम्यान असेल.

फोर्ड फोकस २डब्लूडी
अमेरिकेतील अत्यंत प्रतिष्ठित अशी फोर्ड कंपनी भारतातही आपलं नाव मोठं करण्याचा प्रयत्न करत आहे. फोर्डच्या फिएस्टा, फ्युजन, फिगो, इकोस्पोर्ट या सर्वच गाडय़ा ग्राहकांच्या पसंतीला उतरल्या. आता फोर्ड मिडसाइझ सेडान या प्रकारातील एक नवीन गाडी भारतीय बाजारपेठेत आणत आहे. फोर्ड फोकस २डब्लूडी ही गाडी फोर्ड कंपनीने जुलै १९९८मध्येच युरोपीय बाजारपेठेत उतरवली होती. दोनच वर्षांत ही गाडी युरोपमधील प्रत्येक देशात धावू लागली. आता जवळपास १४ वर्षांनंतर ही गाडी भारतीय बाजारपेठेत येत आहे. मिडसाइझ सेडान प्रकारात ही गाडी आल्यावर काही महिन्यांतच याच गाडीचं हॅचबॅक व्हर्जनही भारतात येणार आहे. या गाडीचं इंजिन २.० लिटर डय़ुराटेक प्रकाराचं असेल. त्यामुळे या गाडीची पॉवर नक्कीच चांगली असणार आहे. या इंजिनद्वारे मॅन्युअल पाच गिअर आणि ऑटोमॅटिक चार गिअर्स अशा दोन प्रकारांत ही गाडी उपलब्ध असेल. ही गाडी रस्त्यावर आल्यानंतर नक्कीच सर्वाचं लक्ष वेधून घेणार आहे. पण या सेगमेण्टमधील इतर गाडय़ांच्या तुलनेत ही गाडी काहीशी महाग असेल. २०१५च्या सुरुवातीला येणाऱ्या या गाडीची किंमत १० ते १२ लाखांच्या आसपास असेल.

महिंद्रा क्वांटो एएमटी
कॉम्पॅक्ट एसयूव्ही या प्रकारातील महिंद्राची क्वांटो ही गाडी अनेकांच्या पसंतीला पडली. याच गाडीचं पुढील व्हर्जन महिंद्रा २०१५मध्ये घेऊन येत आहे. या गाडीच्या बाह्यरूपात किंवा रचनेत फारसा बदल न करता महिंद्राने ऑटोमॅटिक मॅन्युअल ट्रान्समिशन (एएमटी) हे तंत्रज्ञान या गाडीच्या इंजिनीअरिंगमध्ये अंतर्भूत केलं आहे. कॉम्पॅक्ट एसयूव्ही या प्रकारात एएमटी ट्रान्समिशन सुरू करणारी महिंद्रा ही पहिलीच कंपनी असेल. ही गाडी पुढून दिसायला झायलोसारखीच असेल. तर मागील रचना थोडीशी वेगळी असेल. एएमटी तंत्रज्ञानाच्या अंतर्भावामुळे या गाडीच्या परफॉर्मन्समध्ये नक्कीच सुधारणा होईल. तसंच ग्राहकांसाठी एएमटी गाडी चालवणं ही वेगळीच पर्वणी ठरणार आहे. ही गाडी २०१५च्या सुरुवातीलाच भारतीय बाजारपेठेत दाखल होणार आहे. या गाडीची किंमत साडेसहा ते आठ लाख एवढी असेल.

डॅटसन गो प्लस
जपानची निसान कंपनी तिच्या मायक्रा आणि सनी अशा गाडय़ांमुळे भारतात प्रसिद्ध झाली आहे. याच कंपनीची सिस्टर कन्सर्न असलेल्या डॅटसनने आपली पहिली गाडी भारतीय बाजारपेठेत दाखल केली. डॅटसन गो या हॅचबॅक गाडीने भारतीय बाजारपेठेत आपलं स्थान निर्माण केलं आहे, पण आता हीच कंपनी डॅटसन गो प्लस ही नवीन गाडी घेऊन येत आहे. ही नवीन गाडी एमपीव्ही म्हणजेच मल्टिपर्पज व्हेइकल या प्रकारातील असेल. ही गाडी २०१५च्या सप्टेंबर महिन्यात भारतीय बाजारपेठेत दाखल होण्याची शक्यता आहे. सुरुवातीला ही गाडी फक्त पेट्रोल इंजिन प्रकारातच उपलब्ध असेल. त्यानंतर हळूहळू ही डिझेल प्रकारातही उपलब्ध होईल. या गाडीची किंमत अंदाजे साडेपाच ते सात लाख यादरम्यान असेल. १.२ लिटर, ३ सिलेंडर आणि १२ व्हॉल्व्ह असलेले पेट्रोल इंजिन या गाडीच्या ऑन रोड परफॉर्मन्समध्ये चांगलीच भर टाकेल. कंपनीने दावा केल्याप्रमाणे १९ किलोमीटर प्रतिलिटर एवढं मायलेज देईल. डिझेल प्रकारातील गाडीचे इंजिन १.५ लिटर एवढय़ा क्षमतेचे असण्याची शक्यता आहे. १५ सेकंदांमध्ये ही गाडी ०-१०० किमी एवढा वेग घेऊ शकेल. हॅचबॅक गाडीपेक्षा मोठी गाडी हवी असलेल्यांसाठी सप्टेंबरमध्ये हा पर्याय उपलब्ध झाल्यावर कदाचित भारतीय बाजारपेठेची दिशा बदलण्याची शक्यता आहे.

ह्युंदाई अवान्ते
गेल्या दशकभरात भारतीय बाजारपेठेत सर्वाधिक जम बसवलेली कंपनी म्हणजे ह्युंदाई! या कंपनीच्या सेंट्रो गाडीने तर अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली. त्याखालोखाल ह्युंदाई आय-१०, आय-२०, वेर्ना अशा गाडय़ांनीही भारतीय बाजारपेठेत नावलौकिक कमावला. आता याच बाजारपेठेत आणखी एक यशस्वी पाऊल टाकण्यासाठी ह्युंदाई कंपनी सज्ज झाली आहे. या वेळी त्यांनी आणली आहे सेडान प्रकारातील अवान्ते ही गाडी! २.० लिटर डीओएचसी पेट्रोल आणि १.६ लिटर सीआरडीआय डिझेल अशा दोन इंजिन प्रकारांमध्ये उपलब्ध असलेल्या या गाडीची चर्चा खरेतर दोन वर्षांपूर्वीच सुरू झाली होती. मात्र आता यंदा ती गाडी प्रत्यक्षात भारतीय रस्त्यांवर धावणार आहे. या गाडीची बाह्यरचना नेत्रसुखद आहेच, पण गाडीची अंतर्गत रचना सर्वच क्षेत्रातील ग्राहकांना सुखावणारी असेल. २०१५च्या सुरुवातीलाच येणाऱ्या या गाडीची भारतीय बाजारपेठेतील किंमत ११ लाखांच्या आसपास असेल.
(पुढील भागात नवीन वर्षांतील आणखी काही नव्या गाडय़ांची ओळख करून घेऊ)