तुमच्या बाइकविषयीच्या आठवणी आम्हाला कळवायच्या. त्या आम्ही शब्दबद्ध करून ‘ड्राइव्ह इट’ पानावर प्रसिद्ध करू. सोबत तुमचा व बाइकचा फोटो असणे अत्यावश्यक. ‘मी बाइकवेडा’ या सदरासाठी असा उल्लेख जरूर करा. मग, चला उचला लेखणी आणि मारा किक.. आठवणींना..! शब्दमर्यादा : २०० शब्द. ई-पत्ता : vinay.upasani @expressindia.com


मुंबई-काठमांडू बाइकवर

वयाच्या १४व्या वर्षी मी बाइक चालवायला शिकलो. त्या वेळी माझ्या भावोजींकडे १९५८ सालची बुलेट रॉयल एन्फिल्ड होती. ती चालवायची मला भारी हौस. तिच्यामुळे मला बुलेटची पॅशन निर्माण झाली. कमवायला लागल्यावर १९८५ साली मी सेकंड हँड बुलेटच घेतली. गाडी घेतल्यावर लगेचच मी व माझा मित्र प्रसाद माळवणकर (त्याच्याकडे बीएसए िस्विगग आर्म होती) आम्ही दोघेही गोव्याला जाऊन आलो. ती माझी पहिली बाइक टूर होती. प्रसादकडची बीएसए चांगली असल्याचे माझ्या लक्षात आले. लगेचच मी १९८६ मध्ये बीएसए घेतली. त्याच वर्षी आम्ही ३० बाइकप्रेमींनी एकत्र येऊन रोड रायडर्स मोटरसायकल नावाचा क्लब स्थापन केला. १४ फेब्रुवारी १९८७ रोजी सर्वानी नेपाळचा दौरा करायचा ठरवला. मात्र, १० फेब्रुवारीपर्यंत बहुतेकांनी नकार कळवला. मी व माझा मित्र, ज्याच्याकडे जावा बाइक होती, आम्ही दोघांनीच जायचे ठरवले. आणखी दोघे जण आमच्याबरोबर यायला तयार झाले. पण ते आमच्या क्लबचे सदस्य नव्हते. आम्ही चौघेही निघालो. मुंबई-नाशिक-जळगाव-नागपूर-जबलपूर-वाराणसी-गोपालगंज-रसेल बॉर्डर असा प्रवास करत २१ फेब्रुवारी १९८७ रोजी आम्ही काठमांडूत पोहोचलो. तब्बल २२०० किमीचा प्रवास झाला. परतीच्या प्रवासात आम्ही पोखरा, झाशी, इंदूर, नाशिक, मुंबई अशा मार्गाने आलो. २८ फेब्रुवारीला आमच्या दूधसागर सोसायटीत आमचे जंगी स्वागत झाले. सर्वानी आमचा सत्कार केला. या संपूर्ण प्रवासात आम्हाला रोमांचकारी अनुभव आले. सर्वानी कौतुक केल्याने आनंद गगनात मावेना. पुढच्याच वर्षी १४ फेब्रुवारी १९८८ रोजी आम्ही सर्व जण कन्याकुमारीला बाइकवरून जाऊन आलो. त्यानंतर आमचा हा सिलसिला सुरूच राहिला. आता माझ्याकडे रॉयल एन्फिल्ड ५०० सीसी बाइक आहे. वय वर्ष ५५ आहे, तरीही पूर्वीच्याच उत्साहाने बाइक चालवतो.
रमेश पाटील, गोरेगाव, मुंबई

बुलेट माझ्या दारी
वयाच्या अठराव्या वर्षी मी बाइक चालवायला शिकलो. मी अनेकदा बाबांबरोबर बाइकवर फिरायचो. त्यांच्या काही मित्रांकडे बुलेट होती, तीही मी चालवायचो. मात्र, मला खरे वेड लावले रॉयल एन्फिल्डने. रॉयल एन्फिल्डची डेझर्ट स्टॉर्म घेण्यासाठी मी बाबांकडे हट्ट धरला. मात्र, बाबांनी नकार दिला. पण मीही ठाम होतो की बुलेट घेईन तर हीच. बाबांना मनवण्यासाठी मग मी माझ्या दादाची, राहुल, मदत घेतली. त्यालाही बाइकचे वेड होतेच. अखेरीस आम्ही दोघांनी बाबांना पटवलेच. गेल्या वर्षी बुलेट घेण्यासाठी परवानगी दिली. डिसेंबर, २०१३ ला आम्ही बुकिंगही केले आणि अखेरीस मार्च, २०१४ मध्ये माझे स्वप्न साकार झाले. माझी आवडती बुलेट माझ्या दाराशी थाटात उभी होती. आम्ही सर्वानी मग बुलेटवरून पिकनिक काढली. मात्र, वाहतुकीचे आणि सुरक्षेचे सर्व नियमांचे पालन करूनच आम्ही गाडी चालवली. आताही मी सर्व नियम काटेकोरपणे पाळूनच गाडी चालवतो. हेल्मेटची सक्ती खरंच खूप आवश्यक आहे. माझ्यासारख्या बाइकवेड्यांना मी विनंती करतो की त्यांनी कधीही हेल्मेटविना बाइक चालवू नये.
रोहित मुणगेकर, खार (मुंबई)