वानखेडे स्टेडियमवर शिवसैनिकांनी घातलेला गोंधळ म्हणजे विचार दडपण्यासाठी केलेला बळाचा वापर होता. भावना व्यक्त करण्यासाठी मन किंवा विचार हे मुख्य माध्यम असते, याचा अलीकडे सर्वत्र विसर पडू लागला असावा. राजकारण त्यामध्ये आघाडीवरच आहे. भावना व्यक्त करण्यासाठी बळाचा वापर करण्याचे नवे अजब तंत्र अलीकडे फोफावले आहे. विचारांचा मुकाबला विचाराने करावा अशी सर्वसाधारण समजूत असते. मात्र, बळाचा वापर करून विचार दडपण्याची नवी पद्धती विकसित होऊ लागल्यामुळे मुद्द्यांची जागा गुद्द्यांनी बळकावली आहे. पाकिस्तानातून सातत्याने भारतविरोधी कारवाया सुरू असतात, या कारवायांमध्ये भारतातील अनेक निरपराधांचे बळी गेले आहेत, अशी एक वेदना प्रत्येक भारतीयाच्या मनात कायमच आहे. या कारवाया थांबविण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताकडून प्रयत्न सुरू असतात. मुत्सद्देगिरीने आणि चर्चेच्या माध्यमातून हे प्रश्न सुटले पाहिजेत, असा विचार करणारा एक वर्ग अजूनही देशात आग्रही आहे. तरीही, चर्चादेखील न करण्यासाठी बळाचा वापर करून दबाव आणण्याची भावनिक राजनीती नव्याने जोर धरू लागली आहे.

ही परिस्थिती आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने फारशी चांगली नाही. अशा कृतीतून काही तात्कालिक लाभ पदरात पाडून घेता येऊ शकतात, किंवा सामान्यांची सहानुभूतीही मिळविता येते. पण आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रयत्नांना मात्र यामुळे फटका बसू शकतो. चर्चा हे समस्या सोडविण्याचे सर्वमान्य माध्यम आहे, म्हणूनच आजवर शांततेचे महत्व टिकून आहे. येताजाता बाह्या सरसावून लढाईला उभे ठाकण्याने लढाऊ बाण्याची प्रतिमा निर्माण करणे शक्य असले, तरी अशा कृतीतून सामान्यांनाच होरपळ सहन करावी लागते, हा इतिहास आहे. संघर्ष हा कोणतीही समस्या सोडविण्याचा अखेरचा आणि निरुपायाचा मार्ग असतो. पाकिस्तानसोबतचे क्रिकेट सामने सुरू करण्याबाबत पाक क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष शहरियार खान यांच्याशी चर्चा करू नये यासाठी शिवसेनेने आज वानखेडे स्टेडियममध्ये गोंधळ घातला. शिवसेना मवाळ झालेली नाही, हे दाखवून देण्याचा यामागचा उद्देश असू शकतो. मात्र, विचार दडपण्यासाठी बळाचा वापर करण्याचेच तंत्र वापरण्याचा बाणा शिवसेनेने पुन्हा दाखवून दिला. हा भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न होता, असा भावनिक मुलामाही त्या कृतीला चढविला गेला. अलीकडच्या काळात देशात सर्वत्रच, भावना व्यक्त करण्याच्या नावाखाली हिंसाचार भडकलेला दिसतो. मात्र, भावना व्यक्त करण्यासाठी विचार हे पहिले साधन असते याचा विसर पडू लागला असेल, तर परिस्थिती चिंताजनक आहे असे म्हणावे लागेल. अशा रीतीने भावना व्यक्त होऊ लागल्या, तर त्यातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीची जबाबदारी घेण्याची तयारीही ठेवावी लागेल. कारण अशा परिस्थितीचे चटके शेवटी सामान्यांनाच सहन करावे लागणार असतात.