एकनाथ महाराज सांगतात की, आपलं हित कशात आहे आणि अहित कशात आहे, हे पशुपक्ष्यांनाही माहीत असतं. आता निवारा शोधणं वा तयार करणं, देहपोषणासाठीचं अन्न वा भक्ष शोधणं, देहरक्षण करणं; याबाबतचं ज्ञान अगदी मुंगीपासून ते वाघ-सिंह, हत्तीपर्यंत तसंच लहानशा चिमणीपासून ते गिधाडापर्यंतच्या प्राणीसृष्टीत उपजतच असतं. पशुपक्ष्यांचं हित/अहिताचं ज्ञान हे जीवितापुरतं मर्यादित का असेना, पण त्यांच्यातील हे ज्ञानाचं अस्तित्व नाकारता येत नाही. मग हेच ज्ञान माणसाच्या ठिकाणी का असणार नाही? निश्चित आहेच. एकनाथ महाराज सातव्या अध्यायात सांगतात, ‘‘पश्वादि योनींच्या ठायीं । हिताहितज्ञान असे पाहीं । मा पुरुषाच्या पुरुषदेहीं । ज्ञान पाहीं स्फुरद्रूप ॥२१७॥’’ आता आपलं हित कशात आहे आणि अहित कशात आहे, याचं ज्ञान माणसाला कसं असतं, हे उलगडताना एकनाथ महाराज म्हणतात, ‘‘जें कर्म करितों मी देहीं । तेणें तरेन कीं नाहीं । हें ज्याचे त्याचे ठायीं । स्फुरद्रूप पाहीं कळतसे ॥२१८॥’’ माणसाला त्याच्या आचरणातील गुण-दोषांची पक्की जाणीव असतेच. म्हणजेच, तो जे कर्म करीत आहे ते योग्य आहे की नाही, हे त्याला मनोमन उमजत असतं. माणसाला तारणारं आणि बुडविणारं दोन्ही भगवंतानं दिलं आहेच; पण नेमकं काय तारणारं आहे आणि काय बुडविणारं आहे, याची समजही दिली आहे!

आता हे तरून जाणं आहे भवसागरातून आणि बुडणंही आहे भवसागरातलंच! आणि मागेच म्हटल्याप्रमाणे, अनंत भावना, कामना, वासनांनी व्याप्त अंत:करण हाच तो अथांग भवसागर आहे! माणूस जर सदसद्विवेकबुद्धीला जागून वागला, तर तो तरून जाईल. जर मोहासक्तीनं भारलेल्या देहबुद्धीनुसार वागला, तर बुडून जाईल. माणसाच्या अंत:करणात कोणत्या विचारांची, कल्पनांची, भावनांची, वासना अर्थात कामनांची आवर्तनं अधिकाधिक होतात तशी त्याची वृत्ती आणि आचरणाची रीत बनत जाते. एकनाथ महाराज म्हणतात, ‘‘सांडूनि अशुभ वासना। जो न करी विषयकल्पना। तो आपुला गुरु आपण जाणा। नरकयातना चुकविली ॥२१९॥’’ म्हणजे अशुभ वासना आणि विषय कल्पना जो त्यागतो तो स्वत:च स्वत:चा गुरू असतो आणि तोच नरकयातना चुकवतो. नश्वर जिवातील ईश्वरी तत्त्व म्हणजे सत्याशी एकरूप असलेली सदसद्विवेकबुद्धीच! तिच्या प्रकाशात जो जगू लागतो तोच अशुभ वासना आणि वृथा कल्पनांना त्यागू शकतो. आता इथं हा ‘त्याग’ म्हणजे नेमका काय, ते माणसाच्या आवाक्यात खरंच आहे का आणि नसेल, तर पुढचा मार्ग काय; या प्रश्नांचा थोडा विचार करू. ‘श्रीमद्रामगीते’त प्रभुराम हनुमंताला सांगतात की, माणसाच्या अंतरंगात शुभ आणि अशुभ मार्गानं वासनेची नदी वाहत आहे. या नदीचा प्रवाह शुभ मार्गाकडे वळविण्याचा पुरुषार्थ माणसानं केलाच पाहिजे. कारण या मनाचा स्वभावच असा आहे की ते अशुभ वासनेतून हटविल्याशिवाय शुभ मार्गाकडे वळतच नाही आणि जर ते शुभ वासना गमावून बसलं, तर अशुभ वासनेच्या खाईत कोसळून स्थिरावल्याशिवाय राहात नाही! त्यामुळे चित्तरूपी बालकाला आंजारून-गोंजारून प्रयत्नपूर्वक शुभ वासनेच्या प्रवाहातच गुंफलं पाहिजे. आता आपल्या मनात येईल, की वासना ती वासनाच. तिच्यात शुभ-अशुभ काय असणार? प्रत्यक्षात वासना म्हणजे कामना, इच्छा. आता मग प्रश्न असा की शुभ कामना म्हणजे तरी नेमक्या कोणत्या? – चैतन्य प्रेम