06 April 2020

News Flash

२८०. भजन रहस्य

जो निरपेक्ष भजन, स्मरण करतो त्याचा सांभाळ परमात्म शक्ती करते

जो निरपेक्ष भजन, स्मरण करतो त्याचा सांभाळ परमात्म शक्ती करते. तो कसा, हे जाणण्यासाठी भजनाचं रहस्य जाणलं पाहिजे, असं गेल्या भागात म्हटलं. काय आहे हे रहस्य? ‘श्रीएकनाथी भागवता’च्या अकराव्या अध्यायात एकनाथ महाराज म्हणतात, ‘‘गर्जत नामाच्या कल्लोळीं। नामासरसी वाजे टाळी। महापातकां जाली होळी। ते वैष्णवमेळीं मी उभा॥७४०॥’’ म्हणजे, जिथं नाममंत्राचा कल्लोळ सुरू असतो, त्या नामोच्चारापाठोपाठ टाळ्यांचा गजर सुरू असतो तिथं महापातकांची होळी होते. अशा वैष्णवांच्या मेळ्यात मी उभा असतो. या टाळ्या वाजविण्याचं वर्णन करताना श्रीरामकृष्ण परमहंसांनी एक सुंदर रूपक वापरलं आहे. ते म्हणाले, बंदुकीचा बार उडताच झाडावरचे शेकडो पक्षी जसे त्या क्षणीच उडून जातात तसे नामापाठोपाठ टाळी वाजते तेव्हा वासना विकाररूपी देहभावाचे पक्षी आत्मभावाच्या झाडावरून उडून जातात. मग जिथं विकार-वासनांची ओढ खुंटते तिथं महापातकं भस्मसात होतात आणि मग अशा वैष्णवांच्या मेळ्यात भगवंत उभा असतो. या उभं राहण्यात तत्परतेचं सूचन आहे, भक्तासाठी धाव घेण्यास भगवंताच्या नित्यसज्जतेचं सूचन आहे. मग भगवंत सांगतो, ‘‘जें सुख क्षीरसागरीं नसे। पाहतां वैकुंठींही न दिसे। तें सुख मज कीर्तनीं असे। कीर्तनवशें डुल्लतु॥७४१॥’’ या भक्तसहवासात जे सुख आहे ना? ते क्षीरसागरातही नाही, वैकुंठातही नाही, ते सुख केव्ळ माझ्या संकीर्तनात आहे. त्या कीर्तनाला मी वश होतो आणि त्यात डोलतो. त्या प्रेमाची मला इतकी आवड आहे, की मी भक्तांच्या भावप्रवाहात मलाही विसरून त्या कीर्तनात नाचू-डोलू लागतो. (मज सप्रेमाची आवडी भारी। भक्तभावाचिया कुसरी। मीही कीर्तनीं नृत्य करीं। छंदतालावरी विनोदें॥७४२॥). आता जिथे साक्षात सर्वज्ञ सर्वशक्तिमान सर्वव्यापी परमात्मा सदैव हजर असतो तिथं संकट किती काळ टिकेल? आपल्या भक्तिरसात देहभान हरपलेल्या भक्ताच्या मार्गातील अडचणी, संकटं भगवंताला दिसणार नाहीत का? तो मग नुसता मूक साक्षीदार म्हणून पाठीशी उभा राहील का? तर नाही! जो त्याचा अनन्य भक्त आहे त्याच्या संकटात तोसुद्धा उडी घेतो.

आता याचा अर्थ ते संकट तो चुटकीसरशी दूर करून टाकतो, असा मात्र नव्हे! संतांच्या जीवनातली ‘दुखं’ काही लगेच दूर झाली नाहीत, पण त्या दुखभोगात भगवंताची साथ मिळते. संत सखूचा छळ काही संपला नाही, पण तिच्याबरोबर धान्य दळायला विठोबाही बसत असे! पण असं अनन्य भजन सोडून जे केवळ भौतिकाच्या लालसेनं भजन करतात त्यांची खरी भक्ती भौतिकावरच असते. एकनाथ महाराज सांगतात, ‘‘ज्यांचें धनावरी चित्त। ते केवळ जाण अभक्त। ते जें जें कांहीं भजन करीत। तें द्रव्यार्थ नटनाटय़॥७५१॥ मनसा वाचा कर्मे जाण। जेथ नाहीं मदर्पण। तें तें दांभिक भजन। केवळ जाण उदरार्थ॥७५२॥’’ ज्यांचं धनावर चित्त असतं त्यांच्या चित्तात भक्तीचं नव्हे, तर द्रव्याचंच प्रेम असतं. मग ते जे जे काही भजन करतात, भक्ती करतात ती द्रव्यप्राप्तीच्या लालसेनं होत असते. ते भक्तीचं नाटकच असतं. मन, वाचा, कर्मानं जो मला समíपत नाही त्यांचं भजन दांभिक आणि केवळ पोटापुरतं आहे. भुकेल्या पोटासाठी तर सगळी दुनिया भगवंताला आळवते, पण भुकेल्या हृदयापासून जी हाक मारली जाते ती तो सर्वप्रथम ऐकतो! – चैतन्य प्रेम

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 11, 2020 12:05 am

Web Title: article ektmayog akp akp 94
Next Stories
1 २७९. संकट आणि भजन
2 २७८. भौतिकाचं भजन
3 २७७. रास-निरास
Just Now!
X