चैतन्य प्रेम

भक्ताला जगात वावरताना प्रत्येक ठिकाणी भगवंतच दिसतो आणि याप्रमाणे दृश्याचं दर्शन झाल्यानं डोळ्यांचं पाहणं हे भजनसत्तेचाच भाग होऊन जातं आणि दर्शन हा जो दृष्टीचा विषय आहे तो भजनसत्तेला अर्पिला जातो. आता या स्थितीची कल्पनाही आपल्याला करवत नसल्यानं ती अशक्यप्राय आणि अवास्तवही वाटते. पण तरीही सर्वच साधूसंतांनी या अभेददर्शनाचं वर्णन केलं आहे. मग सर्वत्र भगवंत दिसणं म्हणजे काय? ‘रूप पाहता लोचनी’चं जे विवरण ‘अभंगधारा’मध्ये आलं आहे ते थोडं आठवून पहा. दुसरं असं की, सर्वत्र भगवंत दिसतो म्हणजे तो सगुणातच दिसत असला पाहिजे, असं नव्हे. तर प्रत्येक प्रसंगाकडे पाहताना भगवंताचंच स्मरण जर होत असेल, तर तेही भगवंताचंच दर्शन आहे. म्हणजे काय? तर, प्रत्येक प्रसंग नुसता दिसत नाही, तर त्यामागील भगवंताची योजनाही जाणवू लागते. आपल्या बाबतीतही जर काही वाईट घडलं किंवा घडत असेल, तर त्यामागेही भगवंताचा काहीतरी हेतू निश्चित आहे, हे मनात येऊ लागतं. त्यानं त्या प्रसंगाला सामोरं जाताना धैर्य, सहनशीलता आणि सकारात्मकता येऊ लागते. मग याच रीतीनं प्रत्येक इंद्रिय हे त्याच्या विषयात न अडकता भगवंत स्मरणात रमू लागलं तर इंद्रियांनीसुद्धा भगवद्भावाचंच सेवन आणि अनुसंधान होऊ लागेल. मग कानांचं ऐकणं, मुखाचं बोलणं, पायांचं चालणं, हातांचं काम करणं.. हे सारं सारं भजनच होऊन जाईल. जीवनातला प्रत्येक प्रसंग, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक परिस्थिती वेगळेपणानं प्रभाव पाडणार नाही. ती व्यक्ती आणि आपण, ती परिस्थिती आणि आपण, ते संकट आणि आपण, तो प्रसंग आणि आपण यामध्ये भगवंतच उभा ठाकेल आणि सगळ्यांचं मनातलं मोल एकच होऊन जाईल. हे अधिक स्पष्ट करणारी या अध्यायातली एक महत्त्वाची ओवी अशी : ‘‘जेवीं बुद्धिबळांचा खेळ। राजा प्रधान गजदळ। अवघे काष्ठचि केवळ। तेवीं संकल्प सकळ भगवद्रूप।।३५३।।’’ बुद्धीबळांचा खेळ पटावर सुरू असतो तेव्हा किती डावपेच त्या चौसष्ठ चौकडय़ांमध्ये खेळले जात असतात. एकमेकांना पेचात अडकवलं जात असतं, रोखलं जात असतं, मारलं जात असतं. पण मारलं जाणारं प्यादं असो की हत्ती, उंट किंवा अगदी वजीरही असो ते सारे एकाच खोक्यात पडतात. तिथं कुणी कुणाचाच प्रतिस्पर्धी  नसतो.  दुरंग उरत नाही. तिथं सर्वाची किंमत एकच.. सगळीच काष्ठं! तेव्हा जो भगवद्भावानं जगाकडे पाहतो तेव्हा तो अनेक आकार पाहतो, अनेक तऱ्हेच्या स्वभावाचे, वृत्तीचे लोकही पाहतो, पण अखेरीस जगाच्या या पटावरून दूर होताच सगळे भेद मावळून सगळ्यांची ओळख एकच उरणार आहे.. आत्मतत्त्व! हे तो जाणून असतो. हत्ती पटावर आहे तोवरच सरळ चालणार, उंट पटावर आहे तोवरच तिरका चालणार.. पण खोक्यात पडताच सगळी चाल थांबते! तद्वत भगवंतमय भक्ताची सगळी स्वओढीतून, आसक्तीतून असलेली चाल कायमची खुंटते, पण ‘चालणं’ थांबतं का? नाही! उलट.. ‘‘जेउतें जेउतें चालवी पाये। तो तो मार्गु देवोचि होये। मग पाउलापाउलीं पाहे। निजभजन होये ब्रह्मार्पणेंशीं ।।३८९।।’’ म्हणजे जिकडे जिकडे पाय नेतात! पहा हं, पाय नेत आहेत, मी स्वओढीनं चालत नाही!! तर जिथं जिथं पाय नेतात तो प्रत्येक मार्गच देव होतो आणि प्रत्येक पावला पावलाला ब्रह्मार्पणवृत्तीनं निजभजन होतं.