चैतन्य प्रेम

जगण्यातील संपूर्ण अपूर्णता नष्ट करणारी जी पूर्णप्राप्ती आहे ती भक्तीनं साध्य होते, असं कवि नारायण सांगतो, पण त्या भक्तीला विरक्तीची जोड असतेच. तो सांगतो, ‘‘आइकें विदेहा चक्रवर्ती। ऐशी जेथें भगवद्भक्ती। तीपाशीं विषयविरक्ती। ये धांवती गोवत्सन्यायें।। ६०५।। ’’ हे जनक राजा, जिथे गाय असते तिथं तिचं वासरू येतंच, त्याप्रमाणे जिथं भक्ती असते तिथं विषयविरक्ती असतेच. आता विरक्ती म्हणजे काय? तर भक्तीच्या आड जे येतं त्याची ओढ संपणं म्हणजे विरक्ती आहे आणि हे व्यावहारिक जगातही होतं बरं का. एखादा संशोधक जेव्हा एखाद्या संशोधनात गुंतला असतो तेव्हा त्या संशोधनापलीकडे त्याला दुसरं काही सुचत नाही. जागेपणातला त्याचा प्रत्येक क्षण हा त्या संशोधनासंबंधातील चिंतनातच सरत असतो. मराठीतले विख्यात रहस्यकथाकार बाबूराव अर्नाळकर हे पहाटे पाच वाजता कथा लिहायला बसत आणि सकाळी अकरापर्यंत हे लेखन चालू असे. त्यांचं घडय़ाळाचं दुकान होतं गिरगावात. तिथं एक महिला लेखनिकही असे आणि मग घडय़ाळ विकत घ्यायला किंवा दुरुस्तीला टाकायला कुणी गिऱ्हाईक येई तोवर अर्नाळकर तिला कथा सांगत आणि ती भरभर लिहून घेत असे. उजवा हात दुखला की डाव्या हातानं ती लिहीत असे! म्हणजे तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी जीवन वाहून घेता तेव्हा चराचरातली शक्तीही तुम्हाला कशी साह्य़कारी होत असते पहा! मोठमोठे संशोधक, कलावंत, समाजधुरीण हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रांत जी दीर्घ कामगिरी करतात त्यामागे त्यांच्या सहाय्यकांचा, मदतनीसांचाही श्रमसहभाग असतोच. तेव्हा असे लेखक, संशोधक, कलावंत हे आपलं जगणं असं आपल्या क्षेत्रासाठी समर्पित करीत असतात. अन्य अवांतर गोष्टींत ते वेळ घालवत नाहीत. हीसुद्धा साधनाच आहे, तपस्याच आहे. मग ज्याला अध्यात्माच्या मार्गावर प्रामाणिक वाटचाल करायची इच्छा आहे त्यालाही भक्तीच्या आड जे जे येतं ते त्यागावंच लागतं. नाहीतर जगातील सर्वच गोष्टींबाबत आसक्ती आहे, पूर्ण ओढ आहे आणि दुसरीकडे भगवंताची भक्तीही सुरू आहे, असं होऊ शकत नाही. ती भक्ती मग बेगडीच होते. भाऊसाहेब महाराज उमदीकर होते ना, त्यांच्याकडे सकाळपासून अनेक लोक येऊन गर्दी करीत. कुणाला नाही म्हणणंही शक्य नसे. मग उमदीकरांनी अंगणात एक रेघ आखून ठेवण्याची प्रथा सुरू केली. त्या रेघेपर्यंत उन्हं आली की लोकांनी जायचं, असा तो संकेत असे. मग महाराज उपासनेला बसत. आता त्यांच्यासारख्या सत्पुरुषाला उपासनेची काय गरज, असं कुणाला वाटेल. पण साधकाच्या मनावर उपासनेचं महत्त्व बिंबवण्यासाठी, उपासनेची शिस्त त्यांच्या अंगी बाणवण्यासाठी ते  स्वत:ही उपासना करीत असतात. तेव्हा ज्याला परम पूर्णत्वाच्या प्राप्तीची आस आहे त्याला अपूर्णतेच्या प्राप्तीची आस सोडावीच लागते. बरं विरक्ती म्हणजे नीरसता नव्हे. उलट खऱ्या विरक्त साधकाचं जगणं अधिक संतुलित, अधिक आनंदी आणि रसमय असतं. तो जीवनातल्या अनेक गोष्टींचा आनंद घेतो, पण त्या गोष्टींची अशाश्वतता तो कधीच विसरत नाही. त्या गोष्टींत अडकत नाही. त्या गोष्टींच्या असण्या-नसण्यावर त्याचा आनंद अवलंबून नसतो. प्रत्येक गोष्टीबाबत, व्यक्ती आणि वस्तूबाबत तो सहृदय असतो आणि म्हणूनच व्यक्तीच्या मनातील अशाश्वताच्या ओढीचं तो कधीच समर्थनही करीत नाही!