– चैतन्य प्रेम

आध्यात्मिक जीवन हेच खरं जीवन आहे, असं संतही सांगतात. पण आध्यात्मिक जीवन म्हणजे नेमकं काय? ‘अध्यात्म’ या संकल्पनेचं मूळ ‘अधि+आत्म’ आहे. म्हणजे ज्या जीवनात आत्मतत्त्वाशी सुसंगत जगण्याला अग्रक्रम आहे ते आध्यात्मिक जीवन आहे. ज्यात आत्मस्वरूपाचं प्रकटन सहज होतं, असं ते जीवन आहे. आत्मा हा परमात्म्याचा अंश आहे, परम चैतन्य तत्त्वच आत्मरूपानं या देहात नांदत आहे. ते परम तत्त्व व्यापक आहे, सूक्ष्म आहे, निर्लिप्त आहे, अखंड आहे, स्वतंत्र, पूर्णतृप्त, पूर्ण आनंदमय आहे. आणि लक्षात घ्या – प्रत्यक्षात जन्मापासून माणसाला याच सगळ्याची ओढ आहे! याचं कारण यापासून तो दुरावला आहे, हेच आहे. जो माणूस जन्मापासून गुलामीतच जन्मला, गुलामीचीच ज्याला सवय आहे आणि त्यातच ज्याला सुरक्षित वाटतं तो स्वातंत्र्यासाठी स्वत:हून पेटून उठेल का हो? तर नाही. पण ज्याला स्वातंत्र्याचाच अनुभव आणि सवय आहे त्याला गुलामी सहन होणार नाही. ती गुलामी दूर व्हावी यासाठीच त्याची तगमग होत राहील. अगदी त्याचप्रमाणे जन्मापासूनच आपली आनंद मिळविण्यासाठी तगमग सुरू आहे, याचाच अर्थ आपण मुळात आनंदस्वरूपच होतो, हाच असला पाहिजे! आपण व्यापक, अखंड, शाश्वतच असल्यानं संकुचितता, खंडितपणा आणि अशाश्वती याची आपल्याला तीव्र नावड आहे. मग ती मूळ स्थिती ज्यायोगे प्राप्त होईल, तसं जीवन हेच खरं आध्यात्मिक जीवन आहे. आणि असं दिव्य जीवन प्रापंचिकही जगू शकतोच! मुळात आपल्यातली आध्यात्मिकता विकसित व्हायला लागली की आपलं जीवन आपोआप दिव्य होत जातं! एकानं विचारलं की, ‘भव्य आणि दिव्य या दोन्हीत काय फरक आहे?’ अगदी सोपं उत्तर आहे पहा. ‘भव्य’ शब्दाची सुरूवात ‘भ’  ने म्हणजे भौतिकाने आहे, तर ‘दिव्य‘ची सुरुवात ‘द’ने म्हणजे देवापासून आहे! रावणाचा महाल भव्य होता, पण शबरीची पर्णकुटी दिव्य होती! जे भव्य असतं, ते दिव्य असतंच, असं नव्हे, पण जे दिव्य असतं त्याचा प्रभाव भव्य असतो! तर सर्वसामान्य नीतिमान जीवनापेक्षाही खरं आध्यात्मिक जीवन दिव्य आहे. कारण त्यात सद्गुरूंवर सहज प्रेम आहे. त्या सहजतेनं आणि प्रेमस्पर्शानं ते दिव्य बनलं आहे. ते दिव्यत्व आपल्या जीवनातही सहज येईल की! पण आपण शब्दांना बिचकतो. खरं तर शब्दांना बिचकण्याची काय गरज आहे? प्रामाणिक साधना आणि कर्तव्यपालन होऊ लागलं की जगण्यातला समस्त संकुचितपणा मावळू लागेल.

त्यासाठी जगण्याला जी साधनेची, अंतर्मुखतेची, चिंतन—मननाची जोड हवी ती कपोताची नव्हती. म्हणूनच प्रियेच्या आणि पिल्लांच्या मृत्यूनं तो खचून गेला आणि स्वत:चे प्राणही देता झाला. माणूस मोह आणि भ्रमाच्या गर्तेत इतका खोल कोसळतो की जीवनाचं अमूल्य वरदानच तो पायदळी तुडवतो. कपोताच्या उदाहरणावरून मानवी जन्माची कशी हेळसांड करू नये, हे आपण शिकलो आणि त्यामुळे कपोत पक्षी आपला गुरू ठरला, असं अवधूत सांगत आहे. तो म्हणतो, ‘आलिया मनुष्यदेहासी। मुक्तीचा दारवंटा मुक्त त्यासी। लव निमिष येकु दिशीं। यावज्जन्मेंसीं मोकळा।।६३६।।’ (एकनाथी भागवत, अध्याय सातवा). म्हणजे माणसाचा जन्म लाभला आहे तर मनुष्य देह म्हणजे जणू मुक्तीचा उंबरठाच जीवाला गवसला आहे! या जन्मात तो जर हा देहबुद्धीचा उंबरठा ओलांडू शकला, तर तो जगत असतानाच मुक्त होऊ शकतो!