चैतन्य प्रेम

माणसाचा या जगातला सर्वात मोठा शत्रू आणि सर्वात मोठा मित्र एकच आहे आणि ते म्हणजे-त्याचं मन! सत्शास्त्रंही सांगतात ना, की माणसाच्या बंधनांचं आणि मुक्तीचं कारण त्याचं मनच आहे. कारण या मनातच लोभ निर्माण होतो आणि हे मनच निर्लोभी होऊ  शकतं, हे मनच भय निर्माण करतं आणि हे मनच भय झटकून टाकतं. हे मनच मत्सरानं व्याप्त होतं आणि हे मनच निर्मत्सरतेचा प्रत्यय देतं, हे मनच द्वेषानं खदखदतं आणि हे मनच द्वेषाच्या पकडीतून सुटू शकतं. पण मनातला हा पालट माणसाला स्वबळावर साधता येत नाही. कारण तो मनाच्या ओढींच्या अधीन आहे. त्या सर्व ओढी या देहभावानं व्यापलेल्या आणि देहसुखाच्या पूर्तीच्या इच्छेतून उद्भवलेल्या आहेत. त्यामुळे या लोभ, मोह, भ्रमानं युक्त भावनांचा भवडोह मनातच खोलवर साचला आहे. तो पार करायला सद्गुरू बोधाचीच नौका आवश्यक आहे. त्या भवडोहातून बाहेर पडण्यासाठीचा जो जो अभ्यास आहे, तीच उपासना. या उपासनेच्या नौकेशिवाय हा भवसमुद्र पार होत नाहीच, उलट त्यात बुडून जाण्याचीच भीती अधिक असते. म्हणजे काय? तर, मन स्वबळावर आणि स्वआकलनानुसार सुचलेल्या उपायांनी मोहादिकांच्या पकडीतून सुटत नाही. उलट ज्याला तो उपाय मानतो, तो अपायच ठरतो आणि क्षणिक भावनिक निर्धारातून घडलेला त्याग मनाला पुन्हा हतबल करून त्याच आसक्तीत अधिक वेगानं अडकवतो. त्यामुळे एकनाथ महाराज माणसाला सावध करीत या आपण पाहात असलेल्या अभंगात सांगत आहेत की, ‘‘नाम हे नौका। तारक भवडोहीं। म्हणोनि लवलाही। वेग करा।।१।। बुडतां सागरीं। तारूं श्रीहरी। म्हणोनि झडकरी। लाहो करा।।२।।’’ जो समस्त भवदु:खांचं हरण करतो असा श्रीहरी या भवसागरातून तारणारा आहे, म्हणून त्याच्या प्राप्तीसाठी आणि त्याच्या बोधानुरूप जीवन घडविण्यासाठी वेगानं प्रयत्न करा. कारण हे आयुष्य काही अमर्याद नाही. ते ठरावीक काळासाठी आहे. एकनाथ महाराज सांगतात, ‘‘काळाचा तो फांसा। पडला नाहीं देहीं। म्हणोनि लवलाही। लाहो करा।।३।। एका जनार्दनीं। लाहो करा बळें। सर्वदा सर्वकाळें। लाहो करा।।४।।’’ काळाचा फास कधी पडेल काही सांगता का येतं? मृत्यूचं वास्तव सभोवती वारंवार अनुभवत असतानाही माणूस बेफिकीरीनं जगत असतो. ओशोंचं एक वचन आहे की, ‘‘उद्या वेळ मिळेल हा किती मोठा भ्रम आहे!’’ म्हणजे भौतिकातले प्रयत्न माणूस उद्यावर ढकलत नाही, पण साधना मात्र उद्यावर सहज ढकलतो. एखादा तरुण साधनेला लागला तर लोक त्याला सांगतात की, ‘‘हे काय वय आहे का? साधना काय म्हातारपणी करता येईल.’’ गमतीचा भाग असा की, हे सांगणारी काही वृद्ध मंडळी अद्याप उपासनेला लागलेली नसतात! तेव्हा काळानं काही निश्चित मुदतीची हमी दिलेली नाही. त्यामुळे जोवर देहात श्वास आहे, तोवर तो सत्कारणी लावा. सद्गुरू बोधानुसार आचरणाचा पाठ गिरवा. तो पाठ गिरवणं सोपं मात्र नाही; कारण सद्गुरूंचा बोध हा माझ्या मनाच्या भ्रामक ओढींवर आघात करणाराच असतो. त्यामुळे मन सहजासहजी त्या आज्ञेनुरूप आचरणात रुळत नाही. म्हणूनच एकनाथ महाराज सांगतात की, ‘‘एका जनार्दनीं। लाहो करा बळें। सर्वदा सर्वकाळें। लाहो करा।।’’ एका सद्गुरूंच्या बोधानुसार बळपूर्वक अभ्यासाला लागा!