चैतन्य प्रेम

कानांना ऐकण्याची क्षमता परमात्माच देतो; पण भोवतालच्या माणसांच्या बोलण्यातूनही तोच काही सांगत आहे, हे उमजण्याची आणि त्या साध्या बोलण्यातील नेमका बोध ऐकण्याची क्षमताही तोच देतो, असं गेल्या वेळी सांगितलं. त्या अनुषंगानं ‘पाहण्या’चं उदाहरण दिलं; आता ‘ऐकण्या’चं उदाहरणं पाहू. एकदा छोटय़ा गल्लीतून जाताना दोनजण पुढून चालत होते. त्यातला एक मित्राला म्हणाला, ‘‘आधीच ही गल्ली छोटी, त्यात लोकांनी दुतर्फा वाहनं उभी केली आहेत. या गर्दीतून वाट काढून चालणंही कठीण झालंय!’’ हे वाक्य ऐकताना वाटलं की, जणू सद्गुरू सांगत आहेत- आधीच आयुष्याची वाट लहान, त्यात आपण अनंत इच्छांची दुतर्फा अशी गर्दी करून ठेवतो, की उद्दिष्टाच्या दिशेनं चालणंही कठीण होतं! तेव्हा पाहणं, ऐकणं, रसास्वादन, बोलणं, गंध घेणं यांसारख्या विविध इंद्रियांकरवी विविध क्रिया हा परमात्माच घडवतो. या इंद्रियांना ज्या ज्या बाह्य़ विषयातून सुखानुभूती होते, त्या त्या गोष्टीतील ‘सुखा’च्या मुळाशी तोच परमात्मा असतो. त्यामुळे एका अर्थानं रसही तोच, रसनाही तोच आणि रसास्वादन करणाराही तोच! असं असताना, मधेच ‘मी’ निर्माण होतो. तो कर्ता बनतो आणि मग कर्मफळांचाही भोक्ता होतो! अंतरिक्ष राजा जनकाला सांगतो की, ‘‘जेवीं कां ऊंस बीजीं पडे। तो बाहेर ऊंसपणेंचि वाढे। जरी भिन्न भिन्न कांडें चढे। तरी मागें पुढें रस एकु॥१२८॥ तेवीं विषय आणि करणें। प्रकाशूनि एकपणें। मग विषयरस सेवणें। जीवपणें स्वयें सेवी॥१२९॥’’ म्हणजे ज्याप्रमाणे उसाचा तुकडा हाच उसाचं बीज ठरतो आणि उसाच्याच रूपानं वाढतो. त्या उसाची कांडं जरी वेगवेगळी दिसत असली तरी, त्या सर्व कांडांत वरपासून खालपर्यंत एकच रस भरून असतो. त्याप्रमाणेच ‘करणं’ म्हणजे देहाची उपकरणं- अर्थात इंद्रियं आणि त्यांचे त्यांचे विषय हे एकाच परमात्मसत्तेनं प्रकाशित होतात आणि त्या विषयांची रुची तो परमात्माच जीवरूपानं घेत असतो. पण त्याच वेळी त्या विषयसेवनानं जिवाचा जीवभाव जागा होतो, आसक्ती जागी होते आणि अहंभाव दृढ होतो (इंद्रियां आणि विषयांसी। सहजें अंतर्यामी प्रकाशी। जीव सेवूनि त्या विषयांसी। पावे आसक्तीसी अहंभावें।।१३०।।). त्या विषयांची आसक्ती वाढते, देहाभिमानामुळे वृत्ती पालटते, मूळचं सोहं स्फुरण मावळून अहं स्फूर्ती उसळू लागते आणि मोह-ममता स्थिती बळावते (इंद्रियां विषयांची आसक्ती। देहाभिमानें वाढे वृत्ती। मावळोनि मूळींची स्फूर्ती। मोहममतास्थिती दृढ वाढे।।१३२।।). मग देह म्हणजेच ‘मी’ आणि या देहाचे जे जे सगेसोयरे ते ‘माझे’ असं जीव मानू लागतो. या ‘मी’ आणि ‘माझे’च्या आसक्तीत विषयलोलुप प्रवृत्ती इतकी वाढते, की चित्ताला मूळ चिंतनासाठी क्षणभराचीदेखील उसंत उरत नाही! (मग मी म्हणे देहातें। देहसंबंधीं जें तें आप्तें। विषयांचिये लोलुपते। उसंतु चित्तें असेना।।१३३।।). मग कताणाच्या अहंकारात जीव बुडून जातो. हा अहंभाव अति उद्धट असतो. तो कुणालाच जुमानत नाही. त्यात अतिदुर्घट अशा मोहममतेची साथ असते. त्यामुळे जन्म आणि मरणाचं चक्र अविरत सुरू राहतं (देहअहंता अतिउद्धट। तेथें मोहममता अतिदुर्घट। तेणें जन्ममरणांची वाट। घडघडाट प्रवाहे।।१३५।।). अपूर्त वासनांच्या दु:खात मृत्यू आणि त्याच वासनांच्या पूर्तीच्या ओढीत जन्म, हेच ते चक्र!