चैतन्य प्रेम

कर्म आणि प्रारब्धाच्या नियमांनी माणसाचं जीवन बद्ध आहे आणि भगवंतमय दिव्य जीवन जगणं हीच समस्त बंधनातून मुक्ती आहे, हे ‘भागवता’चं मुख्य सूत्र आहे. ब्रह्मदेवानं मानसपुत्र नारदांना, नारद मुनींनी व्यासांना, व्यासांनी पुत्र शुकदेवांना आणि शुकदेवांनी राजा परीक्षिताला हे ‘भागवता’चं ज्ञान सांगितलं. सृष्टीसंचारी नारद एकदा वासुदेवाकडे आले, तेव्हा भगवंताच्या प्राप्तीचं ज्ञान देण्याची प्रार्थना त्यांनी अत्यादरपूर्वक नारदांकडे केली. तसंच भगवंताच्या प्राप्तीचा मार्ग- म्हणजेच भागवत धर्माविषयी वासुदेवानं प्रश्न केले. असेच प्रश्न फार पूर्वी राजा जनकानं नवनारायणांना विचारला होता. त्याचीच कथा सांगण्याच्या निमित्तानं नारदांनी जे विवेचन केलं, तो ‘भागवता’च्या ११ व्या स्कंधाचा आधार आहे. अवधूत स्थितीत वावरणारे नवनारायण हे राजा जनकाच्या यज्ञस्थळी आले आहेत. राजा जनक हा अपार वैभव आणि निशंक वैराग्याचा जणू संगम आहे. या नवनारायणांना- माया म्हणजे काय आणि त्या मायेतून तरून जाण्याचा उपाय कोणता, हा प्रश्न राजा जनकानं विचारला आहे. अवधूत वृत्तीचे नवनारायण एकेक करून राजा जनकाला भगवंताच्या भक्तीचा मार्गच उलगडून सांगत आहेत. ‘भागवता’च्या ११ व्या अध्यायाचा भावानुवाद म्हणजे संत एकनाथ महाराज यांचे ‘एकनाथी भागवत’! ब्रह्मदेवांपासून राजा परीक्षितापर्यंत, नवनारायणांकडून राजा जनकापर्यंत आणि नारदांकडून वसुदेवापर्यंत भगवंताच्या भक्तीचं जे ज्ञान प्रवाहित झालं, त्या विराट ज्ञानाचं नाथांनी अनुभवसिद्ध केलेलं दर्शन म्हणजे ‘एकनाथी भागवत’! बंधनात पाडतं ते मनच आणि बंधन झुगारून मुक्त होतं तेही मनच. माणसाचं ११ वं इंद्रिय असलेल्या या मनाला भक्तीचं वळण लावून बंधनमुक्त करण्यासाठीच नाथांनी ‘भागवता’चा ११ वा स्कंध निवडला! अनेक दशा भोगत दुखात फरफटत जगणारा माणूस जोवर एका परमात्म्याच्या भक्तीनं एक दशा प्राप्त करीत नाही, तोवर त्याची दुर्दशा टळत नाही, हे या ग्रंथाच्या निमित्तानं नाथांनी प्रेमामृतानं सिंचित शब्दांत मांडलं आहे. परमात्म्याची भक्ती म्हणजे नेमकं काय, त्या भक्तीनं जीवनात खरी निश्चिंती कशी लाभते, हेच नाथांनी सांगितलं आहे आणि तृतीय अध्यायात कर्म आणि प्रारब्ध या विषयांच्या अनुषंगाने मोठं मार्मिक मंथन सुरू झालं आहे. माया म्हणजे काय आणि तिच्या पकडीतून सुटून भक्तीपंथावर वाटचाल करणं कसं साधावं, यावरील चिंतनाच्या गाभ्याला आपण आता स्पर्श करणार आहोत. माणूस म्हटला की, त्याला कर्म काही सुटत नाही. काहीही न करणं, हेसुद्धा कर्मच आहे! आणि ‘मी’ भावनेतून होत असलेल्या प्रत्येक कर्माचा जो कर्मभोग आहे, त्यावाचून जीवाची सुटका नाही. म्हणजेच ‘मी’ भावनेतून सत्कर्म होवो वा दुष्कर्म; त्याचं फळ भोगावंच लागतं. ही र्कम माणूस भ्रम, मोह आणि आसक्तीतून करीत असतो आणि त्यामुळेच त्यांची अनंत बरी-वाईट कर्मफळं भोगता भोगता तो जन्म-मृत्यूच्या चक्रात सापडतो. त्यातून सुटण्याचा उपाय आता अंतरीक्षाच्या निमित्तानं एकनाथ महाराजच समजावणार आहेत. तो उपाय सांगताना त्यांनी डोळ्याला पट्टी बांधलेल्या आणि घाण्याला जुंपलेल्या बलाचं रूपक मांडलं आहे. मग, ‘‘तेवीं बांधोनि ज्ञानाचे डोळे। भोगूं जातां निजकर्मफळें। तंव जन्ममरणांचे सोहळे। भोगी आगळे अनिवार।।१४१।।’’ हे सांगून सामान्य माणसाची तशीच गत दाखवली आहे. यावरचा उपाय म्हणजे ज्ञानाच्या डोळ्यांवर बांधलेली पट्टी काढणं, हाच आहे!