05 April 2020

News Flash

३०८. जाळं!

पण मुळात आपण गुण किंवा सद्गुण म्हणून जे मानतो, ते आपल्या दुराग्रहाचंच रूप असू शकते.

 

संत एकनाथ महाराज यांच्या ‘एकनाथी भागवत’ या ग्रंथात यदुराजा आणि अवधूत योग्याच्या संवादातून चराचरांतलं गुरूत्व उलगडत आहे. पृथ्वी या पहिल्या गुरूकडून आपण शांती, समत्व आणि दातृत्व हे तीन गुण कसे ग्रहण केले, हे अवधूतानं सांगितलं. आता वायू या दुसऱ्या गुरूकडून समदृष्टी आणि अलिप्तपणा कसा शिकलो, हे अवधूत सांगत आहे. तो म्हणतो, ‘‘वायु सर्वातें स्पशरेनि जाये। परी अडकला कोठें न राहे। तैसें विषय सेवितां पाहें। आसक्तु नव्हे योगिया।।४२४।।’’ (अध्याय सातवा). वायू सर्वत्र स्पर्श करतो, पण अडकत कुठेच नाही! तो सरोवरावर तरंग उमटवतो, तसाच उकिरडय़ावरचा पालापाचोळाही उडवतो. पण म्हणून तो सरोवराशी वा उकिरडय़ाशी एकरूप होत नाही! सतत वाहतं राहणं, हाच त्याचा स्वभाव आहे! तसं योगी वृत्तीच्या साधकाचं मन कुठे अडकून पडत नाही. तो प्रपंचात दिसतो, प्रपंचातली कर्तव्यं पार पाडताना दिसतो, पण मनानं तो प्रपंचाशी एकरूप नसतो. प्रपंचात आसक्त नसतो. अवधूत म्हणतो, ‘‘असोनि इंद्रियांचेनि मेळें। तो विषयांमाजीं जरी खेळे। तरी गुणदोष आसक्तिमेळें। बोधू न मळे तयाचा।।४२५।।’’ सर्वसामान्य माणसाप्रमाणेच त्यालाही सर्व इंद्रियांनी युक्त असा देह लाभलेला असतो (‘असोनि इंद्रियांचेनि मेळें’). सर्वसामान्य माणसाप्रमाणेच तो डोळ्यांनी पाहताना, कानांनी ऐकताना, मुखानं बोलताना, जिव्हेनं रसग्रहण करताना, हाता-पायांनी कर्म करतानाही दिसतो (‘तो विषयांमाजीं जरी खेळे’). तरीही सामान्य माणसाप्रमाणे तो गुण-दोषांच्या आसक्तीनं बद्ध होत नाही, त्या आसक्तीत अडकून त्याच्या अंत:करणातला सद्गुरू बोध ‘मी’ भावानं मलीन होत नाही, मळत नाही (‘तरी गुणदोष आसक्तिमेळें। बोधू न मळे तयाचा।।’). आता कुणाला वाटेल की, दोषांत माणूस आसक्त असणं वाईट आहे, हे समजू शकतं. पण गुणांची आसक्ती किंवा आग्रह असण्यात काय गैर आहे? पण मुळात आपण गुण किंवा सद्गुण म्हणून जे मानतो, ते आपल्या दुराग्रहाचंच रूप असू शकते. हट्टाग्रहाला वा दुराग्रहाला आपण निर्धारीपणा मानू शकतो, हेकेखोरपणाला आपण सत्याग्रही मानू शकतो, उधळपट्टीला आपण उदारता मानू शकतो.. तेव्हा आपले सद्गुण हे खरेच सद्गुण आहेत की दुर्गुण आहेत, हेच आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे अशा सद्गुणांच्या आसक्तीतही वास्तवाचं भान लोपतंच. अर्थात, अंत:करणात थोडाफार शिरलेला सद्गुरू बोधही मलीन होतो. योगी मात्र इंद्रियांच्या संगतीत राहून विषयात वावरताना जरी दिसत असला, तरी गुण वा दोषांनी तो कधीच लिप्त होत नसल्यानं त्याचं आत्मज्ञान कधीही मलीन होत नाही. सगळ्यात असूनही योगी कशातही कसा अडकत नाही, हे स्पष्ट करताना एकनाथ महाराज आणखी एक बहारीचं रूपक वापरतात. ते म्हणतात, ‘‘जैसें वारेंनि जाळ उडे। परी जाळी वारा नातुडे। तेवीं भोग भोगिता गाढे। भोगी नातुडे योगिया।।४२७।।’’ वाऱ्यानं जाळं उडताना दिसतं, पण वारा त्या जाळ्यात अडकतो का? तर नाही! तसा योगीही प्रपंचजाळ्यात दिसतो, पण त्या जाळ्यात तो अडकलेला नसतो! तेव्हा वायू या दुसऱ्या गुरूकडून आपण काय काय शिकलो, हे अवधूतानं सांगितलं. या वायुतत्त्वानंतर आकाशतत्त्वाकडून आपण काय शिकलो, हे अवधूत आता यदुराजाला सांगणार आहे. अर्थात, पृथ्वी आणि वायूनंतरचा आकाश हा त्याचा  तिसरा गुरू आहे!

– चैतन्य प्रेम

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 23, 2020 3:36 am

Web Title: loksatta ekatmyog article 308 akp 94
Next Stories
1 ३०७. ऐक्यता साधावी चतुरी!
2 ३०६. ऐक्यभावना
3 ३०५. पंचप्राण
Just Now!
X