– चैतन्य प्रेम

‘मन्मना भव मद्भक्तो..’ हा श्लोक ‘गीते’त दोनदा आला आहे, हे गेल्या वेळी पाहिलं. आता तो दुसऱ्यांदा येण्यामागे जे कारण आहे, ते थोडं जाणून घेऊ. १८ व्या अध्यायापर्यंत भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला ‘गीता’ सांगितली. ज्ञानयोग, कर्मयोग, सांख्ययोग, भक्तियोग.. सारं सारं काही सांगितलं. जेव्हा कमी माहिती असते ना, तेव्हा मनाचा गोंधळ कमी असतो आणि निर्णयही पटकन करता येतो. पण जेव्हा माहिती वा शाब्दिक ज्ञानात मोठी भर पडते ना, तेव्हा आधीच भ्रमित असलेला जीव आणखीच गोंधळात पडतो. अर्जुनाची अशी स्थिती झाली असावी. कारण १८ व्या अध्यायापर्यंत ‘गीते’च्या निमित्तानं विपुल ज्ञान सांगून झाल्यावर भगवान अर्जुनाला म्हणाले, ‘‘इति ते ज्ञानमाख्यातं गुह्य़द्गुह्य़तरं मया। विमृश्यैतद् अशेषेण यथेच्छसि तथा कुरू।।’’ म्हणजे, ‘हे अर्जुना, गुह्य़त गुह्य़ असं ज्ञान मी तुला सांगितलंय. आता तू पूर्ण विचार कर आणि मग तुझ्या इच्छेनुसार तुला जे योग्य वाटेल ते कर!’ यानंतर जे घडलं आहे त्याचं वर्णन ‘गीते’त नाही; पण काय घडलं असावं, याचा सहज तर्क करता येतो. तर घडलं ते असं की, ‘यथेच्छसि तथा कुरू’ – म्हणजे मनाला येईल ते आता कर, ही मुभा म्हणजे मोठी धोक्याची घंटाच होती! कारण मनात येईल ते करीत राहिल्यानंच तर जीव जन्म-मृत्यूच्या चक्रात अडकून भटकत आहे! ‘पूर्ण विचार’ कसला करणार? जो जो विचार करावा तो तो अविचारात सहज परावर्तित होऊ शकतो. त्यामुळे अर्जुनानं निश्चितच विनवलं असलं पाहिजे की, ‘‘हे भगवंता, माझ्या मर्जीनं नव्हे तर तू सांगशील तसंच मी वागीन, हा माझा निश्चय आहे. तेव्हा मी नेमकं काय करू, ते तू मला सांग!’’ हा श्लोक ‘गीते’त नाही, पण तो असलाच पाहिजे. कारण, ‘जशी इच्छा तसं वाग,’ हे सांगणाऱ्या श्लोकानंतर लगेच, नेमकं कसं वाग ते भगवंत सांगतात! ते म्हणतात, ‘‘हे अर्जुना, तू माझा प्रिय सखा आहेस. त्यामुळे मी अत्यधिक गूढ वचन तुला सांगत आहे. ते तुझ्या हिताचं आहे म्हणून तू ऐक!’’ मग यानंतर श्लोक येतो.. ‘मन्मना भव मद्भक्तो..’! भगवंत सांगतात, ‘‘हे अर्जुना, सदोदित माझं चिंतन कर. माझ्यापासून मनानंदेखील विभक्त होऊ नकोस. मला पूज्य मानून स्वत: पूज्य म्हणजे शून्य हो! ‘मी’चा आकारच माझ्यात विलीन कर. मग हे अर्जुना, तू माझ्याशी सदैव एकरूप होशील. माझी ही प्रतिज्ञा आहे!’’ मग तो विख्यात बोध आहे.. ‘‘सर्वधर्मान् परित्यज्य माम एकं शरणं व्रज। अहं त्वां सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच:।।’’ म्हणजे, ‘‘हे अर्जुना, सर्व मनोधर्माचा अर्थात आवडी-नावडी आणि ओढींचा त्याग करून केवळ मलाच शरण ये, मग मी तुला सर्व पापांतून मुक्त करीन, चिंता करू नकोस!’’ आपण जगाला शरण आहोतच, ती शरणागती थांबवून जे परमतत्त्व आहे त्याला शरणागत व्हायचं आहे. सद्गुरू शरणागती म्हणजे सद्गुरूंच्या बोधाचं आचरणात काटेकोर पालन करणं. आज आपण मन मानेल तसं वागत असल्यानंच या मनुष्यजन्माच्या खऱ्या लाभापासून वंचित आहोत. जीवनध्येयाच्या विस्मरणाचं पापही त्यामुळेच आपल्याकडून घडत आहे. ते पापही या शरणागतीनं नष्ट होईल. हीच सर्व प्रक्रिया सद्गुरुमयतेचीही आहे. त्याची सुरुवात करताना माऊली म्हणतात, ‘तू मन हें मीचि करी!’ माझं मन हेच तुझं मन होवो. म्हणजे काय हो? तर सद्गुरूंची जी मनोधारणा आहे, मनोकामना आहे, मनोभावना आहे, तीच माझी व्हावी. माझं मन सद्गुरूंचंच मन झालं पाहिजे.