चैतन्य प्रेम

कर्ता, कर्म आणि कर्तेपणाच्या भ्रमानं माणसाचं जीवन व्यापून असतं. आपल्याकडून कर्मे होत असतात, ती कर्मे पार पाडणारी शक्ती आपल्यात अंतर्भूत असते, पण त्या शक्तीची प्राप्ती आपल्या हातात नसते. ती शक्ती किती काळ राहील, हेही आपल्या हातात नसतं. तरीही आपण स्वत:ला कर्ता मानतो, त्या कर्माचं कर्तेपण आपल्याकडे घेतो आणि मग कर्ता झाल्यानं प्रत्येक कर्माचं बरंवाईट फळ भोगत राहतो. ही कर्मसाखळी मग कधीच खंडित होत नाही. पण जर सद्गुरूंच्या कर्तेपणाकडे त्यांच्या चरणांकडे लक्ष राहीलं आणि ती ज्या मार्गावर आहेत त्या मार्गावरून लक्षपूर्वक वाटचाल सुरू ठेवली तर कर्तेपणाचा भ्रम संपतो. त्यानंतर नाथ सांगतात, ‘‘गाईमागिल कृष्णपाउलें। पाहतां कर्म कर्तेनिसीं गेलें। अकर्म म्हणणें नाहीं उरलें। ऐसें कर्म केलें निष्कर्म।। २६२।।’’ गाईमागील कृष्णपाउले! काय दिव्य रूपक आहे! गाय म्हणजे इच्छा. अर्थात साधकाच्या मनात इच्छा उत्पन्न होताच त्यांच्यापाठोपाठ कृष्णाची अर्थात सद्गुरूची पाउलंही दिसली पाहिजेत! ती पाहता पाहता कर्तेपणासकट इच्छाकर्मही नष्ट होतं, अर्थात निष्काम स्थिती येते आणि असं निष्काम कर्म तेवढं हातून घडतं की अकर्मतेचं कौतुकही कुणी करू नये! थोडक्यात मनात इच्छा उत्पन्न होताच, ती सद्गुरूंच्या मार्गाला, सद्गुरूबोधानुसारच्या वाटचालीला साजेशी आहे का, हा विचारही तत्काळ उत्पन्न होतो. मग माझ्या मनात उत्पन्न झालेली इच्छा पूर्ण होणं माझ्या हाती नाही. केवळ प्रयत्न करणं माझ्या हाती आहे. ती योग्य असेल, माझ्या हिताची असेल, तरच ती पूर्ण होईल, हा भावही मनात येतो. मग कर्म घडतं ते निष्काम भावनेनं. अर्थात त्यामागे अमुक एक घडावंच आणि घडलंच पाहिजे, अशी इच्छासक्ती नसते. आता कुणाला वाटेल की इच्छेशिवाय जर जीवनच नाही, तर मनात इच्छा येण्यात काय गैर आहे? आणि इच्छा आली तर तिच्या पूर्तीचे प्रयत्न निष्काम भावानं होणं कसं शक्य आहे? तर इथं सारा डोलारा हा ‘कृष्णपाउले’ दिसण्यावर अवलंबून आहे! म्हणजेच भले माझ्या मनात पूर्वकर्मसवयींनुसार इच्छा उत्पन्न होतच राहाणार, पण पूर्वी मनात इच्छा येताच त्यांच्या पूर्तीसाठी अंत:करणपूर्वक सगळे प्रयत्न अतिशय तळमळीनं होत असत. ती इच्छा हितकारक आहे की अहिताला वाव देणारी आहे, तिच्या पूर्तीचा मार्ग शुद्ध आहे की अशुद्ध आहे, त्यातून दुसऱ्याला त्रास होणार आहे की नाही; या कशाचाही विचार केला जात नसे. आता कृष्णपाउलांचं दर्शन घडत असल्यानं अर्थात सद्गुरू बोधाचा ठसा मनात उमटल्यानं मनात इच्छा जरी उत्पन्न झाली तरी ती हिताची नसेल, तर ती मनातून विरून जावी, अशीही प्रामाणिक भावना उदय पावते. अर्थात ती योग्य की अयोग्य हे कळत नसतं तोवर प्रयत्न होतात, पण त्या प्रयत्नांचं फळ सद्गुरू इच्छेवर सोपवलं जातं. इच्छेची पूर्ती झाली नाही, तरी पूर्वीइतकं वाईट वाटत नाही. कालांतरानं तर ती इच्छा पूर्ण न झाल्यानं ज्या अधिक लाभकारक गोष्टी घडल्या त्यांची जाणीवही स्पष्टपणे होते आणि मग सर्व जीवनव्यवहार हा सद्गुरूंच्या इच्छेवर सोपवला जाण्याची अत्यंत दीर्घ आणि अत्यंत सूक्ष्म अशी प्रक्रिया सुरू होते. मग नाथ सांगतात की, आपल्या अवतारसमाप्तीनंतरही जनांना भवसागर तरून जाण्यासाठी श्रीकृष्णानं आपल्या कीर्तीची नौका मागे ठेवली! ती नौका कल्पांतीदेखील बुडणारी नाही. त्या नौकेचा नुसता स्पर्श होताच भवसागर आटून जातो.