News Flash

९२. जिव्हेनें करावें नामस्मरण

खरं पाहता जिव्हेला काही चांगलंचुंगलं खायची गोडी नाही, ती मनालाच आहे.

(संग्रहित छायाचित्र)

चैतन्य प्रेम chaitanyprem@gmail.com

ज्या कानांना आत्मस्तुती आणि परिनदा ऐकण्याची गोडी सदोदित लागली असते, ते कान भगवंताच्या अर्थात सद्गुरूंच्या लीलांचं श्रवण आणि त्यांचा बोध ऐकण्यासाठी एकाग्र करायचे आहेत. जिवाचा कान करून ऐकणं म्हणतात ना? म्हणजे सगळी देहबुद्धी ज्या जिवाला चिकटलेली असते तो भौतिक कामनांमध्ये गुंतलेला जीव आता सद्गुरूबोधाच्या श्रवणात गोळा करायचा आहे, एकाग्र करायचा आहे. तर, मनानं सद्गुरूंच्या बोधाचं, कृतीचं ध्यान आणि कानांनी त्यांचंच गुणवर्णन आणि बोध ऐकायचा आहे. त्यानंतर सांगतात की, ‘जिव्हेनें’ करावें नामस्मरण। हरिकीर्तन अहर्निशीं! जिव्हेनं नामस्मरण करायचं आहे आणि हरीचं कीर्तन अहर्निशी करायचं आहे. खरं पाहता जिव्हेला काही चांगलंचुंगलं खायची गोडी नाही, ती मनालाच आहे. जिव्हेला कधीच वाटत नाही की, आज पक्वान्नं खावीत किंवा चमचमती खावं! ते वाटतं मनाला. जिव्हा फक्त पदार्थाची चव कळवून देणारं उपकरण आहे.. आणि माउली ‘अमृतानुभवा’त म्हणतात ना? की ज्या जिव्हेनं सर्व पदार्थाची चव कळते, त्या जिव्हेला स्वत:ची चव माहीत नाही! आणि यातच मोठं रहस्य आहे. जिला स्वत:ची चव नाही, तीच अन्य पदार्थाची खरी चव काय आहे, ते सांगू शकते. माणूस अलिप्त असतो तेव्हाच तो तटस्थपणे अन्य माणसाचं खरं अंतरंग जाणू शकतो. जेव्हा त्याच्या स्वत:च्या मनातच अनंत कामनांचा पसारा असतो तेव्हा ते अस्थिर आणि अशुद्ध मन अन्य माणसांचं आकलन शुद्धपणे करू शकत नाही. त्या आकलनात ‘मी’ मिसळतोच आणि त्या ‘मी’च्याच भिंगातून आपण अन्य माणसांबाबत मत तयार करीत असतो. तेव्हा जिव्हा ती अलिप्तताही शिकवते आणि अशी अलिप्तता आल्याशिवाय खऱ्या अर्थानं नामस्मरण घडत नाही आणि त्या नामाची खरी चव, खरी गोडी उमजत नाही, हेसुद्धा ती सांगते! आजारपणात आपण कसं म्हणतो की जिभेला चव नाही. म्हणजे काय, तर जीभ पदार्थाची चव ओळखू शकत नाही. अगदी त्याचप्रमाणे भवरोग जडल्यानं आपल्यालाही वास्तवाचं खरं आकलन होत नाही आणि ते आकलन करून देणाऱ्या साधनेची खरी गोडीही उमजत नाही. मग जसं औषध घेतलं की आजार जसजसा कमी होतो तसतशी जिभेलाही चव येते, त्याप्रमाणे भवरोगावरचं औषध घेत गेलं की हळूहळू भवरोग जसजसा ओसरत जाईल तसतशी साधनेची गोडी कळू लागेल, असं संत सांगतात. विशेष म्हणजे नाम हेच औषध आहे आणि भवरोग ओसरला की नाम हेच पक्वान्नही आहे! तर जिव्हेसारखं स्वत: बेचव झाल्याशिवाय म्हणजेच भौतिकातल्या वासनात्मक ओढींतली गोडी पूर्ण नष्ट झाल्याशिवाय वास्तवाचं खरं आकलन होत नाही. नाम म्हणजे ‘मी’चं अनाम होणं. ‘मी’चा तकलादूपणा जाणून तो निष्प्रभ होत जाणं. आता आपण जगात आणि व्यवहारात वावरत असल्यानं जगाकडून फसवले जाणार नाही इतपत ‘मी’ची ढाल ठेवावीच लागते आणि तो आपल्या हृदयात नसलेला, पण जगापुरता असलेला ‘मी’ कसा राखायचा, याचं ज्ञानही ते नामच करून देतं. जेव्हा अशी स्थिती होऊ लागते तेव्हाच खऱ्या अर्थानं अहोरात्र म्हणजे प्रत्येक क्षणी हरीचं म्हणजे समग्र भवदु:खाचं हरण करणाऱ्या सद्गुरूंचं स्मरण पक्कं आणि पक्व होऊ लागतं.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2019 1:18 am

Web Title: loksatta ekatmyog ekatmyog article number 92
Next Stories
1 ९१. कीर्तिश्रवण
2 ९०. ध्यानीमनी
3 ८९. मुख्य भजन
Just Now!
X