वाळिंबेची गोष्ट खोटी वाटावी इतकी खरी आहे. नवीन फुटपाथ झाला की त्यावर फेरीवाले जसे आपोआप उगवतात, तसा वाळिंबे आमच्या नाक्यावर एकदा उगवला. आणि फुटपाथला फेरीवाल्यांची होते तशी आम्हाला त्याची सवयही झाली. तसे आमच्या नाक्यावर अनेक नमुने ठाण मांडून होते. जितेंद्र होता. त्याचं आणि कुत्र्यांचं काहीतरी कनेक्शन होतं. त्यामुळे जितेंद्र जिथे जाई, तिथली कुत्री आपली सगळी कामंधामं सोडून त्याच्यामागे लागत. आणि ‘मागे लागत’ म्हणजे चावण्यासाठी किंवा ओरबाडण्यासाठी खूंखारपणे मागे लागतात तशी नाही. कुठलाही नवा बाबा किंवा महाराज उगवला की काही पिडलेले श्रद्धाळू जीव जसे आपोआप त्यांच्यामागे लागतात, तशी ही कुत्री जितेंद्रच्या पाठी लागत. नेत्याच्या मागून कार्यकर्त्यांनी चालावं तशी निमूट जितेंद्रच्या मागे चालत. बरं, तो त्यांना काही बिस्किटं वगैरे भरवायचा, किंवा ‘यू-यू’ करायचा असंही नाही. पण जितेंद्र निघाला की ऐन भाद्रपदातसुद्धा देखण्या कुत्रीचा माग सोडून सगळे श्वान याच्यामागे ओळीनं चालू लागायचे. जितेंद्र अमेरिकेच्या व्हिसासाठी एम्बसीत इंटरव्ह्य़ूला गेला तेव्हा एम्बसीच्या बाहेरची कुत्री हाकलताना तिथल्या सिक्युरिटीच्या नाकी नऊ आले होते असं म्हणतात.

आमचा ज्यूपिटर शेडगे. त्याचं खरं नाव- गुरुनाथ. पण गुरू म्हणून ज्यूपिटर. असा हा शेडगे कुलोत्पन्न! याला लोकांच्या लग्नात जाऊन फुकट जेवायची भारी खाज. घरची परिस्थिती वाईट होती, बाप उपाशी ठेवत होता अशातला भाग नाही. ज्यूपिटरचे वडील भाई शेडगे आमच्या गल्लीतल्या सिंगल विकेट क्रिकेट स्पर्धेत ‘बेस्ट बॅट्समन’ला एकशे एक रुपये दरवर्षी स्पॉन्सर करायचे. तात्पर्य, ज्यूपिटर खात्यापित्या घरातला होता. पण दुसऱ्याच्या लग्नात जाऊन जेवणं, ही त्याची ‘किक्’ होती. नेमका आकडा सांगणं जरा कठीण आहे, पण अशा फुकट पुख्ख्यांची सेंच्युरी तरी त्यानं नक्कीच पूर्ण केली असेल. त्यात एकदा पकडलाही गेला. नेमका त्या लग्नातला मुलाचा बाप मागच्याच एका लग्नात ज्यूपिटरच्या मांडीला मांडी लावून जेवला होता. आणि कसा कोण जाणे, त्याला ज्यूपिटरचा चेहरा लक्षात राहिला होता. ‘थ्री इडियटस्’ पाहून ज्यूपिटरनं मला रात्री साडेबाराला फोन केला होता.. ‘हिप्पोक्रसी भेंडी! अमीर खान ते करतो तेव्हा त्याला करिना पटते.. आपल्याला फटके!’

तर अशा अनेक नग आणि नमुन्यांनी आमचा नाका बहरलेला असायचा. त्यात वाळिंबे कधी आला, कसा मिसळला, कळलंच नाही. तो नेमका कोणाचा मित्र म्हणून नाक्यावर पहिल्यांदा उभा राहिला, हेही आठवत नाही. परवा नाक्यावरच्या मंडळींमध्ये फेसबुकवर यावर घमासान चर्चा झाली. (हल्ली नाक्यावर भेटणं होत नाही. नाकेकरी फेसबुकवरच भेटतात!) अनमोल जितेंद्रकडे बोट दाखवी.. तो तेच बोट ओढून समेळच्या छाताडावर ठेवी.. गंध्या गोखलेनं मला ‘कल्प्रिट’ ठरवला. मी हात वर केले. थोडक्यात काय, वाळिंबे नेमका कोणाच्या ओळखीनं आमच्या अड्डय़ात आला, हे जॉन केनेडीच्या हत्येमागचा खरा सूत्रधार कोण, या रहस्याइतकंच गूढ आहे. पाच फूट दहा इंच उंचीचा, रिमलेस चष्मा लावणारा, उन्हाळ्यातही फुलशर्ट घालून स्लीव्जची बटणं लावणारा वाळिंबे! हातात नेहमी एक पुस्तक. गंध्या गोखलेची आई गेली तेव्हा आम्ही त्याच्या घरी जमलो, तेव्हाही वाळिंबेच्या हातात पुस्तक होतंच. बरं, हे पुस्तक उघडून वाचताना मी त्याला कधीच पाहिलं नाही. पण हाताला एक वेगळं एक्स्टेन्शन फुटावं तसं ते पुस्तक सतत त्याच्या हातात असायचं. ‘हा अंघोळ करतानाही याच्या हातात पुस्तक असतं,’ असा ठाम दावा अनमोलनं केला होता. यावर त्याला ‘त्याची अंघोळ बघायला तू कशाला गेला होतास?’ असा तोडीस तोड प्रश्न विचारून गप्प करण्यात आलं होतं. तर, वाळिंबेबद्दल आमच्या सगळ्यांच्याच मनात अनेक प्रश्न होते. नाक्यावरच्या चर्चेत वाळिंबे सहभागी व्हायचा; पण त्याची बाजू नेमकी कुठली, ते कधीच कळायचं नाही. म्हणजे- कतरिना आणि प्रियंका यांच्या तौलनिक अभ्यासात आपण कतरिनाच्या नावानं उसासे टाकावेत, तर वाळिंबे म्हणायचा, ‘मला तिच्याबद्दल नितांत रिस्पेक्ट वाटतो! कुठलंही बॅकग्राऊंड नसताना आणि अभिनयही येत नसताना तिनं हे अचिव्ह केलंय.’ (तिच्यायला! आपण कोणाच्या तरी मनात नितांत आदराचं स्थान जागृत करून राहिलोय, हे त्या कतरिनाला कळेल तर ती उद्यापासून एकादशीचे उपवास करायला घेईल.) पण तेवढय़ात एखादा प्रियंकाप्रेमी तिची मापं मोजू लागला की वाळिंबे थ्री सिक्स्टी डिग्री अबाऊट टर्न मारायचा- ‘सात खून माफ बघा! रोल ऑफ द डेकेड!’ क्रिकेट, राजकारण, परिसरातल्या मुली.. सगळ्या जिव्हाळ्याच्या विषयांवर याचं असंच! त्यामुळे वाळिंबेशी चर्चा करताना आपण एको पॉइंटवर उभे आहोत असं वाटायचं. आपलीच मतं तो आपल्याला वेगळ्या वाक्यांत ऐकवायचा.

नाक्यावर चहा आणायला बऱ्याचदा वाळिंबेच जायचा. नंतर ‘डच’चे पैसे लोकांनी दिले तर निमूट घ्यायचा, नाही दिले तर मागायचा नाही. वाळिंबे दिवसा काय करतो? कुठे जातो? तो नेमका राहतो कुठे? त्याचा उद्योग काय? आजही आमच्यापैकी कुणालाच काहीही माहीत नाही. एकदा वाळिंबे तापानं फणफणला होता. मी म्हटलं, ‘मी तुला घरी सोडतो.’ म्हणाला, ‘नको.’ मी खनपटीला बसलो. म्हणाला, ‘स्टेशनपर्यंत सोड.’ स्टेशनला बाइक लावून मी त्याच्याबरोबर ब्रिजच्या दिशेनं चालू लागलो. म्हटलं, ‘चल- निदान तुला गाडीत बसवून तर देतो.’ तत्क्षणी वाळिंबेनं कपाळाला हात मारला. ‘अरे, माझा पास संपलाय आजच! थांब, तिकीट काढून आलो.’ तो कुठेतरी गर्दीत मिसळला. त्यानंतर तो मला दिसला ते थेट दोन दिवसांनी नाक्यावर! मी भयंकर संतापलो होतो. मी मूर्खासारखा याच्यासाठी स्टेशनवर थांबून राहिलो होतो त्या दिवशी. पण मी चढाई करायच्या आत वाळिंबे म्हणाला, ‘समोर ट्रेन दिसली रे.. गपकन् चढलो. सॉरी.’ तेव्हापासूनच मला शंका आली- हा जाणूनबुजून आपलं वैयक्तिक आयुष्य आपल्यापासून लपवतोय. असं का? याचे अनेक तर्क करून पाहिलेत; पण उत्तर सापडत नाही. एकदा घरातलं निर्माल्य ‘निर्माल्य कलशा’त टाकायला देवळात गेलो होतो. बाहेर पडलो. नाक्यावरून अंत्ययात्रा चालली होती. मी सवयीनं पाया पडलो. पुढे निघून गेलो. आणि अचानक स्ट्राइक झालं. तिरडीवरचा चेहरा ओळखीचा होता. मी वेडय़ासारखा धावत जाऊन त्या प्रेताचा चेहरा पाहू लागलो. तो वाळिंबेच होता. मला धक्का पचेना! गरगरल्यासारखं झालं. नंतर जाणवलं, ती अंत्ययात्रा म्हणजे अंत्य‘यात्रा’ नव्हतीच. शिकार केलेलं डुक्कर काठय़ांवर बांधून आणावं, तसे ते लोक वाळिंबेला घेऊन निघाले होते. मी विचारलं. एक जण म्हणाला, ‘कौन है पता नहीं. प्लेटफारम पर कल सुबह से पडा है. अभी नहीं ले जाएंगे तो सड जाएगा!’

नाक्यावर वाळिंबेबद्दल त्यानंतर अनेक महिने तर्कवितर्क सुरू राहिले. कुणी म्हणतं, तो सायको होता. लेलेला भीती.. ‘तो आतंकवादी असेल तर? साला आपण पण लटकू!’ गंध्या ठामपणे म्हणतो, ‘तो मुळात वाळिंबेच नव्हता! मी तुला बोललो होतो ना चिन्या.. त्याच्या मराठीचा अ‍ॅक्सेंट हिंदीचा होता.’ ज्युपिटर सिग्रेट पेटवत म्हणाला, ‘कुठूनतरी क्राइम करून पळाला असणार!’

.. हा सगळा घटनाक्रम अनेक वर्षांपूर्वीचा. आता नाकाच विस्कटून जवळजवळ दशक लोटत आलं. आजही पेपरमध्ये ‘रेल्वे प्लॅटफॉर्मवर बेवारशी अवस्थेत मृतदेह सापडला..’ असं वाचलं की वाळिंबेचा चेहरा डोळ्यांसमोर येतो. तो आमच्या नाक्यावर आमच्याबरोबर अडीच-तीन वर्ष नांदला. पण आजही आम्हाला कोणालाच त्याच्याबद्दल काहीही माहीत नाही! तुम्ही कुणी त्याला ओळखत असाल तर प्लीज कळवा.

चिन्मय मांडलेकर aquarian2279@gmail.com