वाईट सिनेमा कुणालाच बनवायचा नसतो. पण चांगला सिनेमा बनवू शकणारे फार कमी असतात. तरीही जगाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात जेव्हा एखादा लेखक कागदाला पेन किंवा की-बोर्डला बोट लावतो तेव्हा त्याला आपल्याला सलीम-जावेदच्या रांकेत बसवणारंच काहीतरी आपण लिहितोय असं वाटत असतं. त्याचं नशीब बलवत्तर असेल तर जगाच्या बाजारात त्याच्या मालाला उठाव मिळतो. लेखकाला एक दिग्दर्शक मिळतो, दिग्दर्शकाला निर्माता.. आणि मग एक कळप तयार होतो. मराठी चित्रपटांच्या बाबतीत म्हणायचं तर वर्षांकाठी जे खोऱ्यानं सिनेमे प्रदर्शित होतात, त्यातले बहुतांश सिनेमे बनवताना तो बनवणारे नेमका काय विचार करत असतील याचा विचार करून माझ्या डोक्याचा भुगा पडतो. दादर स्टेशनच्या बाहेर फेरीवाल्याकडून बनियन विकत घेणारा माणूसही ती बनियन तीनदा ताणून बघून, ‘इसका साठ रुपया बहुत जादा है, चालीस में दो, नहीं तो मैं आगे जाता है..’ अशी निकरानं घासाघीस करत असतो. पण बरेच निर्माते सिनेमानिर्मितीत करोडो रुपये ओतत असतानाही नेमका सिनेमा बनतो कसा, याबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ असतात. असे सिनेमे बनून, आपटून,   निर्मात्याला खड्डय़ात टाकून गेल्यानंतर एक वाक्य सार्वत्रिक ऐकू येतं- ‘प्रॉडक्शन मॅनेजरने लई छापले.’ निर्माता कुणीतरी मोठा उद्योगपती किंवा बिझनेसवाला असतो. त्याच्या डोळ्यासमोर फक्त प्रीमियरच्या दिवशी हीरो-हीरोइनच्या शेजारी आपण उभे आहोत, ते आपल्याला मित्रासारखे वागवतायत, पत्रकार आपल्याला आपल्या सिनेनिर्मितीच्या अनुभवांबद्दल अधीर प्रश्न विचारतायत असं एक धूसर, मोहक स्वप्न असतं. त्यात जर त्या निर्मात्याला आपल्या मुलाला, मुलीला, भावाला, मेहुण्याला, शेजाऱ्याला, पाळीव प्राण्याला ‘लाँच’ करायचं असेल तर त्याची अवस्था लग्नमंडपातल्या वधुपित्यासारखीच असते. पण आपला धंदा सांभाळत सिनेनिर्मितीच्या रोजच्या रामरगाडय़ात लक्ष घालायला त्याला उसंत नसते. कळत तर त्याहून नसतं. मग तो एक प्रॉडक्शन मॅनेजर नेमतो. आणि मग पुढे हाच प्रॉडक्शन मॅनेजर मुख्य अभिनेत्यांच्या तारखा मिळवण्यापासून ते फावल्या वेळात हेअर ड्रेसरचा हात पाहून तिचं भविष्य सांगण्यापर्यंत सर्व आघाडय़ांवर एकटा लढत असतो. सिनेमा बनत असताना ते घाण्याला जुंपलेल्या बैलासारखे बिचारे वाटतात. पण जेव्हा त्या सिनेमाचं सूप वाजून सगळी पांगापांग होते तेव्हा प्रॉडक्शन मॅनेजरनं काही पूज्य आपल्या खिशात सरकवल्याच्या वार्ता गप्पांच्या अड्डय़ांमधून दुमदुमत राहतात. पैसे न खाणारे, नियम पाळणारे, नीतिमत्ता सांभाळणारे सज्जन प्रॉडक्शन मॅनेजरही असतात; पण ते पैसे न खाणाऱ्या, नियम पाळणाऱ्या, नीतिमत्ता सांभाळणाऱ्या सज्जन राजकारण्यांइतकेच दुर्मीळ असतात.

२०११ साली अवधूत गुप्तेचा ‘झेंडा’ सिनेमा आला आणि गाजला. त्यानंतर मला नवीन कामांसाठी अनेक फोन्स आले. त्यातले बहुतांश फोन्सचा मथितार्थ एकच असायचा : ‘सॉलिड रोल आहे सर. गावचा पाटील असतोच एकदम डॅशिंग. एकदम ‘झेंडा’सारखा.’ ‘झेंडा’नंतर मी फक्त ‘झेंडा’सारख्याच भूमिका कराव्यात अशी बहुधा तमाम जगाची इच्छा दिसत होती. त्यातच एके दिवशी केमसेंचा फोन आला- ‘प्रॉडक्शन मॅनेजर केमसे बोलतोय पुण्याहून.’ हे शब्द आता मी अंदाजानं लिहितोय, कारण मूळ जो फोन आला होता त्यावर पलीकडे बोलणारा माणूस जेम्स बॉन्डला माहिती पुरवणाऱ्या परदेशी मदनिकेइतका कमी आणि खाजगी आवाजात बोलत होता. ‘हॅलो, मोठय़ानं बोला. ऐकू येत नाहीये.’ मी इथनं कोकललो. ‘केमसे बोलतोय पुण्याहून. प्रॉडक्शन मॅनेजर.’ वक्त्याच्या भाषणाच्या मधेच कुणीतरी खालून माईक अ‍ॅडजस्ट केल्यावर त्याचा आवाज भस्सकन् मोठय़ानं ऐकू येतो, तसं काहीसं झालं. ‘भेटायचं होतं एका मराठी चित्रपटासंदर्भात.’

kiran mane shares post about propaganda films
“छुपा मुस्लीमद्वेष परसवणाऱ्या प्रोपोगंडा चित्रपटांमध्ये…”, किरण मानेंची पोस्ट चर्चेत, घेतला महत्त्वाचा निर्णय
bhuvan bam comments on prathamesh parab recent video
प्रथमेश परबच्या व्हिडीओवर लोकप्रिय अभिनेत्याची कमेंट; म्हणाला, “क्षितिजा तुझा नवरा खूप…”
ice cream rice
सई ताम्हणकरप्रमाणे तुम्ही खाऊ शकता का आईस्क्रिम भात? विचित्र खाद्यपदार्थाचा व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
Try this amazing Spicy and Tasty Chicken Kharda You Will Love Note The Recipe
नॉनव्हेज प्रेमींना नक्की आवडेल झणझणीत पारंपरिक ‘चिकन खर्डा’; लगेच नोट करा रेसिपी…

आणि पुण्याला बालगंधर्वला नाटकाचा प्रयोग असताना केमसे पहिल्यांदा भेटायला आले. पाच फुटापेक्षा थोडी जास्त उंची. डोक्यावर र्अध टक्कल. पण पुढच्या भागात तुऱ्यासारखे उरलेले काही केस. त्या केसांवरून सतत हात फिरवत बोलण्याची लकब. अंगात अत्यंत साधा रेघा-रेघांचा फुलशर्ट आणि पायांवर चप्प बसलेली काळी पॅन्ट. धावपटूच्या गळ्यात मेडल लटकवावं तसा गळ्यात फोन लटकलेला. तो बैलाच्या गळ्यातल्या घंटेसारखा झुलत नसला तर शर्टाच्या वरच्या खिशात कोंबलेला असायचा. खिसे तर तऱ्हेतऱ्हेच्या कागदांनी सतत दुथडी भरून वाहत असायचे. त्यातून त्यांना हवा तो कागद कसा सापडायचा, त्यांचं त्यांनाच ठाऊक. गळ्याला शेंदराचा ठिपका लावलेला. आणि चेहऱ्यावर विठ्ठलाला पाहिल्यावर पुंडलिकाच्या चेहऱ्यावर आलं असेल असं कृतकृत्य हसू. केमसे बालगंधर्वच्या विंगेत नाटक संपल्यावर उभे होते. लांबूनच मला हेच केमसे असतील असा अंदाज आलाच होता. मी त्यांच्या जवळ जाऊ लागल्यावर तेच हीरोला मिठी मारायला दुडदुडणाऱ्या हीरोइनच्या अधीरतेनं पुढे आले. हात पुढे केला. ‘मी केमसे. प्रॉडक्शन मॅनेजर. फोन केलाता.’

आम्ही बालगंधर्वच्या कॅन्टीनमध्ये बसलो. केमसेंनी स्क्रिप्टचं एक बाड समोर ठेवलं. ‘एकदम कडक सब्जेक्ट आहे सर. तुम्ही नाही म्हणूच शकणार नाही. तुमचा रोल तर..’ ‘एकदम ‘झेंडा’मधल्या रोलसारखा आहे..’  मीच त्यांचं वाक्य पूर्ण केलं. जुन्या सिनेमातल्या निरुपा रॉय वगैरे आयांच्या डोळ्यांत आपला कुलदीपक ‘फर्स्ट क्लास फर्स्ट’ पास झाल्याचं कळल्यावर त्याला पाहून जशी नितळ माया दाटून यायची, तशी केमसेंच्या डोळ्यांत दाटून आली. ‘परफेक्ट सर! जुळलंच आपलं. आता फक्त तारखांचं ठरवू.’ केमसे अचानक दूध उतू जात असताना गृहिणी जशी घाई करते तशी घाई करू लागले. ‘मी स्क्रिप्ट वाचतो आधी. मग बोलूच आपण.’ मी एकदम अंग, बॅट सारं काही मधे आणून आपली विकेट वाचवणाऱ्या बॅट्समनसारखा डिफेन्सवर गेलो.

पुण्याहून परत आल्यावर मी ते स्क्रिप्ट वाचायला घेतलं. पहिल्या दोन पानांतच त्या क्रियेतला फोलपणा मला जाणवला. व्याकरणाच्या चुका हा त्यातला सगळ्यात कमी तापदायक भाग होता. एका प्रसंगाचा दुसऱ्याशी काही संबंध नव्हता. रेल्वेच्या वेटिंग रूममध्ये माणसं ये-जा करतात तशी पात्रं पटकथेच्या आत-बाहेर ये-जा करत होती. संवाद काही ठिकाणी सखाराम गटणेनं लिहिल्यासारखे होते, तर काही ठिकाणी ‘सत्या’मधल्या भिकू म्हात्रेनं. नमुना पाहा :

विजय : माझ्या जीवनातल्या काटेरी झाडावर बहरलेलं तू एक फूल आहेस.

मंजू : आणि तू माझ्या आयुष्याच्या घरटय़ात विसावलेला इवलासा मोर आहेस.

मोर..? आणि घरटय़ात? हे राम! पुढे हाच विजय आणि हीच मंजू..

विजय  : खुल्ला बोल्लो मी त्याला.. आम्ही गावच्या विहिरीचं पाणी घेणार म्हणजे घेणार.

मंजू : पाटील ज्याम डेंजर आहे विजू. जो त्याला आडवा जातो, त्याचा तो गेम करतो.

देवाशपथ सांगतो- मी याचि डोळा हे संवाद वाचले आणि संसदेच्या सदस्यांनी भोसकून मारलेल्या सीझरप्रमाणे बिछान्यावर मृतप्राय पडलो. दुसऱ्या दिवशी केमसेंचा फोन आला. ‘सर वाचलं का?’ माझ्या डोळ्यासमोर देवाला कौल लावायला उभे राहिल्यासारखे केमसे उभे राहिले. ‘सॉरी, मला नाही वाटत- मला हा सिनेमा करता येईल.’ मी आवाज शक्य तितका नरम करत म्हटलं. ‘का?’ काचेचं भांडं खळ्ळकन् फुटावं तशा आवाजात केमसे म्हणाले. इथं मी विचारात पडलो. खरं सांगून टाकावं की तारखा नाहीत वगैरे कारण सांगून वेळ मारून न्यावी. ‘स्क्रिप्ट अत्यंत भिकार आहे हो. कोणी लिहिलंय? आणि यावर कुणाला ही फिल्म का करायचीय?’ नाही नाही म्हणता माझ्या आवाजात आता मन:स्ताप डोकावू लागला होता. ‘ओह! एवढंच ना?’ एकदम केमसेंच्या आवाजात ‘या२२२हूं’ म्हणणाऱ्या शम्मी कपूरचा उत्साह संचारला. ‘ते मला माहीत होतं- तुम्हाला आवडणार नाही. फालतूच आहे ते. पण म्हटलं, चिन्मय सरच आहेत. नाही आवडलं तर कधीही बदलून ते आपले डायलॉक लिहितील की!’ मी खूर्चीतून पडायच्या बेतात होतो. ‘अहो, पण नुसते डायलॉग नाही, स्क्रीन-प्ले पण वाईट आहे.’ ‘तो पण तुम्ही लिहा.’ आता केमसे राजधानी ट्रेनच्या गतीनं सुटले होते. ‘अहो, पण स्टोरीत दम..’ ‘स्टोरी बदलू! तुम्ही आहात. मग काय प्रश्न आहे?’ ‘अहो, पण सगळंच बदलायचं तर मग हा सिनेमा कशाच्या बेसिसवर करायला घेतलाय तुम्ही?’ आता मी नम्रताबिम्रता  सगळं बासनात गुंडाळून ठेवत म्हणालो. ‘प्रोडय़ूसर! प्रोडय़ूसर आहे सर आपल्याकडे. त्यांना सिनेमा करायचाय. चांगला सिनेमा! आपण चांगली माणसं जोडली की चांगला सिनेमा आपोआप होणार. तुमचं सहकार्य पाहिजे फक्त- की होतंय सगळं.’ गोंद  लावून बंद केल्यासारखं माझं तोंड बंद करत केमसेंनी फोन ठेवला. ठेवता ठेवता ‘मुंबईला येऊन भेटतो परवा..’ ही धमकी द्यायला ते विसरले नाहीत.

या धमकीचं पुढे काय झालं, ते पुढच्या आठवडय़ात.

(क्रमश:)

– चिन्मय मांडलेकर

aquarian2279@gmail.com