मतदानोत्तर चाचण्यांमध्ये स.प. व ब.स.प. आघाडीस चांगल्या जागा मिळण्याची शक्यता सूचित झाल्यानंतर बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती व समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी सोमवारी चर्चा केली. उत्तर प्रदेशात या आघाडीच्या आशा मतदानोत्तर चाचण्यांनी उंचावल्या आहेत. अखिलेश यादव यांनी निवडणुकीच्या आधीच बसपा, रालोद यांच्याशी आघाडी केली होती. त्याचा उद्देश लोकसभा निवडणुकीत भाजपला रोखणे हा होता. अखिलेश यादव हे मायावती यांच्या निवासस्थानी गेले व त्यांनी सुमारे तासभर चर्चा केली.

शनिवारी तेलगु देसमचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी यादव व मायावती यांची लखनौत स्वतंत्रपणे भेट घेतली होती. त्यात त्रिशंकू लोकसभा निर्माण झाल्यास विरोधकांनी एकत्र येण्याबाबत चर्चा झाली होती. लोकसभा निवडणुकीत बसपने ३८, तर समाजवादी पक्षाने ३७ जागा लढवल्या असून तीन जागा रालोदला सोडण्यात आल्या होत्या. लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणीत एनडीएला ३०० हून अधिक जागा मिळतील असा अंदाज मतदानोत्तर चाचण्यात वर्तवला गेला आहे. असे असले तरी उत्तर प्रदेशातील सप, बसप महागठबंधन भाजपकडून अनेक जागा खेचून घेणार असल्याचा अंदाज आहे. गेल्या वेळी भाजपला ८० पैकी ७१ जागा मिळाल्या होत्या.

पक्षनेत्यांची बैठक : अखिलेश यादव यांनी लखनौतील पक्षाच्या कार्यालयात समाजवादी पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केली. मतदानोत्तर चाचण्यांनी आम्हाला आशादायक चित्र दाखविले आहे. तरीही आम्ही प्रत्यक्ष निकालापर्यंत वाट पाहू, असे पक्षनेते अजय प्रताप सिंह यांनी स्पष्ट केले.